Type Here to Get Search Results !

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन व सुधीर मोरे मित्र मंडळ आयोजित ४४ वी मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा निवारा हिड इंडियाचा धडाका; महिलांत उपउपांत्य फेरीत प्रवेश! जय भवानी, अमरज्योत, शिवनेरी क्रीडा, श्री सिद्धिविनायक प्रथम श्रेणी पुरुषांत विजयी


मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन व सुधीर मोरे मित्र मंडळ आयोजित

४४ वी मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा  

निवारा हिड इंडियाचा धडाका; महिलांत उपउपांत्य फेरीत प्रवेश!

जय भवानी, अमरज्योत, शिवनेरी क्रीडा, श्री सिद्धिविनायक प्रथम श्रेणी पुरुषांत विजयी

 

मुंबई : आक्रमक चढाया, भक्कम पकडी आणि सांघिक खेळाच्या जोरावर मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत संघांनी आगेकूच सुरू केली आहे. महिलांच्या गटात निवारा हिड इंडिया संघाने प्रतिस्पर्ध्याला निष्प्रभ करीत उपउपांत्य फेरीत धडक दिली, तर प्रथम श्रेणी पुरुषांत जय भवानी, अमरज्योत, शिवनेरी क्रीडा आणि श्री सिद्धिविनायक यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आणि सुधीर मोरे मित्र मंडळ यांच्या संयुक्त आयोजनाखाली सुरू असलेल्या ४४व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत विजयी संघांनी आपली ताकद दाखवून दिली.

 

निवारा हिड इंडियाची एकतर्फी झेप!

महिला गटात निवारा हिड इंडिया संघाने सिद्धार्थ क्रीडा संघाचा सहज पराभव करीत उपउपांत्य फेरी गाठली. आक्रमक सुरुवात करणाऱ्या हिड इंडियाने मध्यंतरालाच २४-८ अशी भक्कम आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. उत्तरार्धातही त्याच वेगाने आणि आक्रमकतेने खेळ करीत प्रतिस्पर्ध्याला पुनरागमनाची संधी दिली नाही. तनुजा लाड आणि इशिका थोपकर यांच्या जोशपूर्ण चढाया आणि प्रभावी खेळाने हिड इंडियाचा विजय सुकर केला. सिद्धार्थ क्रीडाकडून वैष्णवी गुरव हिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र संघाला विजयाच्या मार्गावर आणण्यासाठी तिची झुंज अपुरी ठरली.

 

जय भवानीचा उत्तरार्धात टॉप गिअर!

प्रथम श्रेणी पुरुषांच्या सामन्यात जय भवानी संघाने स्वयंभू मंडळावर मात केली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ करीत १२-१२ अशी बरोबरी साधली होती. मात्र उत्तरार्धात जय भवानीने खेळाचा वेग वाढवत सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. केतन शिंदे आणि आकाश पवार यांनी चढाईत आक्रमकता दाखवत प्रतिस्पर्ध्याच्या बचावफळीवर दडपण आणले आणि विजयाचा मार्ग मोकळा केला. स्वयंभू मंडळाकडून सागर माने आणि संदेश करंबळे यांचा उत्तरार्धातील खेळ अपेक्षेप्रमाणे बहरला नाही. मध्यंतरानंतर जय भवानीने मिळविलेल्या वर्चस्वामुळे स्वयंभूला पराभव स्वीकारावा लागला.

 

अमरज्योतचा चतुरस्त्र खेळ; संभाजी मंडळ पराभूत

अमरज्योत मंडळाने संभाजी मंडळाचा पराभव करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. अमरज्योतच्या विजयात संकेत मोरे आणि दीपक मांढरे यांच्या चतुरस्त्र खेळाचा मोलाचा वाटा राहिला. चढाई आणि बचाव या दोन्ही आघाड्यांवर प्रभावी कामगिरी करीत त्यांनी प्रतिस्पर्ध्याला अडचणीत आणले. संभाजी मंडळाकडून गोरख घडशी याने चांगला खेळ करीत प्रतिकार केला; मात्र सहकाऱ्यांची अपेक्षित साथ न मिळाल्याने संभाजीचे आव्हान संपुष्टात आले.

 

शिवनेरी क्रीडाची पकड-चढाईत बाजी

शिवनेरी क्रीडा संघाने सक्षम स्पोर्टस् संघावर मात करीत आगेकूच केली. रिषभ सिंग आणि प्रथमेश जावळे यांच्या चढाई-पकडीतील प्रभावी खेळाने शिवनेरीला विजय मिळवून दिला. प्रतिस्पर्ध्याच्या चढाईपटूंना रोखतानाच गुण मिळविण्याची रणनीती शिवनेरीने यशस्वीपणे राबविली. सक्षम स्पोर्टस्चा निलेश बांडे याने चांगला खेळ करीत संघासाठी संघर्ष केला; मात्र शिवनेरीच्या एकत्रित कामगिरीसमोर त्याचा प्रयत्न अपुरा ठरला.

 

श्री सिद्धिविनायकची २६-१९ अशी विजयी आगेकूच

श्री सिद्धिविनायक संघाने साई स्पोर्टस् संघाला २६-१९ असे नमविले. ओम कवळे आणि ओमकार मोरे यांच्या चौफेर खेळाने श्री सिद्धिविनायकला विजय मिळवून दिला. चढाईतील गुणांसोबत बचावातही प्रभावी कामगिरी करीत त्यांनी सामन्यावर पकड कायम ठेवली. साई स्पोर्टस्चा प्रतीक वाडकर याने चमकदार खेळ करीत प्रतिस्पर्ध्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला; परंतु श्री सिद्धिविनायकने सांघिक खेळाच्या जोरावर विजय निश्चित केला.

 


मुंबई उपनगरच्या किशोर संघाचे नेतृत्व साहिल यादवकडे

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे १ डिसेंबरपासून होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई उपनगरचा किशोर गटाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी साहिल यादवकडे सोपविण्यात आली आहे.

किशोर गट – मुंबई उपनगर संघ : साहिल यादव (संघनायक) साहिल यादव (संघनायक), स्मित गुदडे, रुद्र क्षीरसागर, नमन राठोड, जयेश शितकर, उमेर खान, मयंक केणे, सोहम घरत, स्मित पयेर, भावेश शितकर, भावेश बोऱ्हाडे, हर्षद कस्तुरे, अतिष साळुंखे आणि विग्नेश भगत.

प्रशिक्षक : हेमंत तोडणकर | व्यवस्थापक : शैलेश गावडे

 

राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई उपनगरचा संघ दमदार कामगिरी करीत जिल्ह्याचा नावलौकिक उंचावण्यासाठी मैदानात उतरणार आहे. साहिल यादवच्या नेतृत्वाखाली संघातील खेळाडूंकडून सांघिक एकजूट आणि आक्रमक कबड्डीची अपेक्षा आहे.

 


Post a Comment

0 Comments