Type Here to Get Search Results !

एमसीए महिला क्रिकेट लीग (डायना एडुलजी ट्रॉफी) भामा सीसीचा ४२ धावांनी विजय; कर्णधार वृषाली भगतची अष्टपैलू चमक! ९६ चेंडूंत १०६ धावांची झंझावाती शतकी खेळी गोलंदाजीतही दोन विकेट घेत विजयात मोलाचा वाटा

एमसीए महिला क्रिकेट लीग (डायना एडुलजी ट्रॉफी)

भामा सीसीचा ४२ धावांनी विजय; कर्णधार वृषाली भगतची अष्टपैलू चमक!

९६ चेंडूंत १०६ धावांची झंझावाती शतकी खेळी

गोलंदाजीतही दोन विकेट घेत विजयात मोलाचा वाटा

 

मुंबई, २५ नोव्हेंबर : फलंदाजीत शतकी तडाखा, गोलंदाजीत निर्णायक विकेट आणि नेतृत्वात संघाला विजयाची दिशा... कर्णधार वृषाली भगत हिने अष्टपैलू कामगिरीचा असा प्रभावी ठसा उमटवला की, भामा सीसीने ग्लोरियस सीसीला ४२ धावांनी नमवत एमसीए महिला क्रिकेट लीगच्या (डायना एडुलजी ट्रॉफी) दुसऱ्या फेरीत दणदणीत विजय नोंदवला. वरळी स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या या सामन्यात वृषालीच्या शतकी खेळीने भामा सीसीच्या डावाला भक्कम आकार दिला आणि नंतर गोलंदाजीतही तिने दोन विकेट मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

वृषालीचे शतक; भामा सीसीची २४४ धावांची भक्कम मजल

प्रथम फलंदाजी करताना भामा सीसीने ३९ षटकांत ८ बाद २४४ धावा उभारल्या. सलामीला उतरलेल्या वृषाली भगतने ९६ चेंडूंत १०६ धावा फटकावत ग्लोरियसच्या गोलंदाजीवर आक्रमण केले. तिच्या खेळीत १४ चौकार आणि एक षटकार होता. तुशी शाहने ३४ धावा करत तिला चांगली साथ दिली. ग्लोरियसकडून स्वरा जाधवने २० धावांत ३ विकेट, तर वैष्णवी पालवने ३७ धावांत २ विकेट घेतल्या.

 

स्वरा जाधवचा प्रतिकार; ग्लोरियसचा डाव २०२ धावांवर

२४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ग्लोरियस सीसीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली; मात्र ४० षटकांत ८ बाद २०२ धावांपर्यंतच मजल मारता आली. स्वरा जाधवने ७५ धावांची आक्रमक खेळी करत विजयासाठी संघर्ष केला. भामा सीसीकडून कृतिका यादवने २९ धावांत २ विकेट, तर वृषाली भगतने ३१ धावांत २ विकेट घेत प्रतिस्पर्ध्यांच्या धावगतीला लगाम घातला.

 

दहिसर एससीचा दोन धावांनी थरारक विजय

दुसऱ्या चुरशीच्या लढतीत दहिसर एससीने रीगल सीसीवर अवघ्या दोन धावांनी निसटता विजय मिळवला. दहिसरचा डाव ३६.२ षटकांत ११८ धावांत संपला. सोनाक्षी सोलंकीने ४१ धावा करत डावाला आकार दिला. रीगलच्या गौरी मांजरेकरने २८ धावांत ४ विकेट, प्रियदर्शनी सिंगने २२ धावांत २ विकेट आणि चेतना बिषाने २३ धावांत २ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात रीगलचा संघ ४० षटकांत ११६ धावांवर बाद झाला. सृष्टी नाईकने ३२ धावा केल्या; दहिसरकडून नष्नव देसाईने २४ धावांत ३ विकेट, तर प्रिया मिसाळने १३ धावांत २ विकेट घेत विजय खेचून आणला.

 

अन्य सामन्यांत फलंदाज आणि गोलंदाजांची चमक

अन्य सामन्यांत साईनाथ सीसी, राजवाडी सीसी, भारत सीसी आणि दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन यांनी विजय मिळवले.

 

जॉन ब्राइट सीसी – २०८/५ (४० षटके) : रोमा शर्मा ५३, श्रद्धा शेट्टी ४६, मिताली म्हात्रे ३८; श्रावणी पाटील ३/४५. पराभूत. साईनाथ सीसी, विरार – २११/६ (३८.२ षटके) : भूमी ठाकूर ४१, किंजल कुमारी ४१, श्रावणी पाटील ३४; ज्ञानेश्वरी येरुनार २/३८, कर्णिका बावकर २/४०.

 

माटुंगा जिमखाना – १४१ (४० षटके) : गार्गी बांदेकर ४६, महेक पती ३३; तनिषा शर्मा २/३२, दीक्षा पवार २/३८. पराभूत. राजवाडी सीसी – १४६/५ (२७.३ षटके) : दीक्षा पवार ५१; अनन्या शेट्टी ३/३४, समीक्षा चांदे २/१५.

 

भारत सीसी – १९२/९ (४० षटके) : चिन्मयी चिली ७५, राजसी नागोसे ३०; गगना मुलकाला ४/५१, झील डी'मेलो २/२०. विजयी. फोर्ट यंगस्टर्स – १६७ (३६ षटके) : जान्हवी काटे ४१; निर्मिती राणे २/२३, पर्शती छेडा ३/४०.

 

व्हिक्टरी सीसी – १४० (२८.२ षटके) : खुशी भाटिया ४६; लकिशा लब्धे ३/२६, फातिमा जाफर २/१७, मंजीर गावडे २/१९. पराभूत. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन – १४१/४ (२७.२ षटके) : शाहीन रझाक ४२, फातिमा जाफर ५३; नियती जगताप २/४१.

 

भामा सीसीच्या विजयात कर्णधार वृषाली भगत चमकली.




Post a Comment

0 Comments