Type Here to Get Search Results !

किशोर-किशोरी गटात उपांत्य फेरीचा थरार! आठ संघांची आगेकूच एकता काल्हेर, श्रीसाई कृष्णाई, श्री स्वामी समर्थ, ओम् वर्तकनगर किशोर गटात दाखल किशोरी गटात स्व. राकेशदादा, रा. फ. नाईक, ज्ञानविकास, विरांगना मंडळाची उपांत्य फेरीत धडक


किशोर-किशोरी गटात उपांत्य फेरीचा थरार! आठ संघांची आगेकूच

एकता काल्हेर, श्रीसाई कृष्णाई, श्री स्वामी समर्थ, ओम् वर्तकनगर किशोर गटात दाखल

किशोरी गटात स्व. राकेशदादा, रा. फ. नाईक, ज्ञानविकास, विरांगना मंडळाची उपांत्य फेरीत धडक

 

ठाणे : विजयासाठी शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली झुंज, मध्यंतरातील पिछाडीवरून केलेली दमदार पुनरागमने आणि अवघ्या एका-दोन गुणांनी ठरणारे निकाल... अशा चुरशीच्या लढतींनी ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या किशोर-किशोरी गट निवड चाचणी स्पर्धेचा रंग अधिकच गडद केला आहे. किशोर गटात एकता काल्हेर, श्रीसाई कृष्णाई, श्री स्वामी समर्थ आणि ओम् वर्तकनगर, तर किशोरी गटात स्व. राकेशदादा, रा. फ. नाईक, ज्ञानविकास आणि विरांगना मंडळ यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. रा. फ. नाईक स्पोर्ट्स आणि ग्रीफिन्स जिमखाना यांच्या संयुक्त सहकार्याने कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.

 

एकताची एका गुणाने निसटती बाजी!

किशोर गटातील पहिल्या चुरशीच्या लढतीत एकता काल्हेरने मारुती मंडळाचा ४८-४७ असा अवघ्या एका गुणाने पराभव केला. युग तरे आणि दैवीक भोईर यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर एकताने मध्यंतराला २६-१७ अशी नऊ गुणांची भक्कम आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात मारुतीच्या अंकुश म्हात्रे आणि साहिल कदम यांनी आक्रमक खेळ करीत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. अखेर वेळेचे गणित चुकल्याने मारुतीला एका गुणाने पराभव स्वीकारावा लागला.

 

पिछाडीवरून श्रीसाई कृष्णाईचा संघर्षवर विजय

दुसऱ्या सामन्यात श्रीसाई कृष्णाईने संघर्ष मंडळावर ४४-४० अशी मात केली. मध्यंतराला १६-२२ अशा सहा गुणांनी पिछाडीवर असलेल्या श्रीसाई कृष्णाईने उत्तरार्धात जोरदार पुनरागमन केले. अमिर खान आणि दीपक राठोड या विजयाचे शिल्पकार ठरले. संघर्षकडून विराज बर्गे आणि लक्ष्मण धुरीणी यांनी दिलेला प्रतिकार उत्तरार्धात कमी पडला.

 

श्री स्वामी समर्थची दोन गुणांनी सरशी

तिसऱ्या सामन्यात श्री स्वामी समर्थने बाळ गोपाळ मंडळाला ४४-४२ असे नमवून उपांत्य फेरी गाठली. मध्यंतराला श्री स्वामी समर्थ २३-२४ अशा एका गुणाने पिछाडीवर होता. मात्र उत्तरार्धात आश्रफ अली आणि ऋषिकेश शेळके यांनी चढाई-पकडीचा प्रभावी खेळ करीत विजय खेचून आणला. बाळ गोपाळकडून अब्दुल शेख आणि अनु चौहान यांनी उत्कृष्ट खेळ केला.

 

ओम् वर्तकनगरकडून यजमान ग्रीफिन्सचा पराभव

शेवटच्या किशोर गटाच्या सामन्यात ओम् वर्तकनगरने यजमान ग्रीफिन्स जिमखान्याचा ३४-३२ असा पराभव केला. वृषभ यादव आणि पवन कदम यांनी चमकदार कामगिरी करीत ओम् वर्तकनगरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ग्रीफिन्सकडून ऋषिकेश गाजे आणि विरल खरात यांनी शेवटपर्यंत कडवी झुंज दिली.

 

रा. फ. नाईकचे पिछाडीवरून दणदणीत पुनरागमन

किशोरी गटात सहयजमान रा. फ. नाईक संघाने शिवकन्या कबड्डी संघाचा ३४-२५ असा पराभव केला. मध्यंतराला ९-१२ अशा तीन गुणांनी पिछाडीवर असलेल्या रा. फ. नाईकने उत्तरार्धात खेळाचा वेग वाढवला. अमृता नागरगोजे आणि अमृता पाटील यांनी दमदार खेळ करीत संघाला विजय मिळवून दिला. शिवकन्याकडून वैदेही रायते आणि प्रियांक्षी म्हात्रे यांनी शेवटपर्यंत लढत दिली.

 

रोशनी चव्हाणच्या तुफानी खेळाने स्व. राकेशदादा विजयी

दुसऱ्या सामन्यात स्व. राकेशदादा संघाने ज्ञानशक्ती युवा संघावर ५२-४३ अशी मात केली. रोशनी चव्हाण हिने तुफानी खेळ करीत विजयात निर्णायक योगदान दिले. ज्ञानशक्ती युवाकडून रोहिता कालेकर हिने चमकदार कामगिरी केली.

 

ज्ञानविकासची कालिमातावर मात

तिसऱ्या लढतीत ज्ञानविकासने कालिमाता मंडळाला २७-१५ असे पराभूत केले. राधिका पिलाणे आणि वैभवी सिंग यांच्या चतुरस्त्र खेळामुळे ज्ञानविकासने एकतर्फी विजय नोंदवला. कालिमाताकडून सिद्धी मोहिते हिने चांगली लढत दिली.

 

विरांगना मंडळाची संघर्षवर सहज मात

शेवटच्या सामन्यात विरांगना मंडळाने संघर्ष मंडळाचा ४७-२६ असा मोठ्या फरकाने पराभव केला. मानवी खामकर आणि मालती शेलार यांच्या झंझावाती खेळाने विरांगनाचा विजय सुकर केला. संघर्षकडून हेमल हिने चांगला खेळ केला. या निकालांमुळे दोन्ही गटांतील उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले असून, आता अंतिम फेरीच्या दिशेने कोणते संघ आगेकूच करणार, याची उत्सुकता कबड्डीप्रेमींना लागली आहे.


Post a Comment

0 Comments