रॅपीडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेत संजय मणियार - राहुल बर्वे विजेते
असोसिएशनच्या ७० व्या वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने
राज्यातील पंच व पदाधिकारी यांच्यासाठी विशेष आयोजित केलेली रॅपीडो कॅरम सुपर
सिक्स स्पर्धा रविवारी सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर येथे पार पडली. महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यातुन ६६ पंच व
पदाधिकारी स्पर्धेत खेळण्यासाठी मुंबईत आले होते. 'अ' आणि 'ब' गटात या खेळाडूंची विभागणी करण्यात आली होती. खुल्या एकेरीच्या 'अ' गटात मुंबई उपनगरच्या संजय माणियारने अंतिम विजेतेपद पटकविताना मुंबईच्या अमोल शिंदेंवर १०-९,
२२-५ असा सहज विजय मिळविला. तर खुल्या एकेरीच्या 'ब' गटात अतिशय चुरशीची लढत बघायला मिळाली. रत्नागिरीच्या राहुल बर्वेने मुंबई
उपनगरच्या प्राजक्ता नारायणकर विरुद्ध अंतिम सामन्यात पहिला सेट २-२५ असा सहज
गमावला होता. त्यामुळे हा सामना एकतर्फी होणार असे वाटू लागले. परंतु दुसरा सेट
राहुलने २३-४ असा सहज जिंकत सामन्यात रंगात आणली. तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये
राहुलने आक्रमक खेळ करत सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि हा सेट १८-७ असा जिंकून या
गटाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.
आंतर राष्ट्रीय कॅरमपटू, राष्ट्रीय विजेता व शिव छत्रपती पुरस्कारार्थी कॅरमपटू
संदीप देवरुखकर यांच्या हस्ते विजेत्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष मंजूर अहमद मेहमूद खान,
खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, स्पर्धेचे प्रमुख पंच व राज्याचे सहसचिव योगेश फणसळकर
उपस्थित होते. अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या
युट्युब चॅनलवरून करण्यात आले होते. सामने पाहण्यासाठी व खेळाडूंचा उत्साह
वाढविण्यासाठी आंतर राष्ट्रीय विजेती कॅरमपटू अनुपमा केदार,
राष्ट्रीय विजेता संजय मांडे, राष्ट्रीय खेळाडू सिद्धांत वाडवलकर सारख्या खेळाडूंसह अनेक मान्यवरांनी आपली हजेरी लावली होती. स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता प्रतिवर्षी अशा प्रकारची स्पर्धा
आयोजित करण्याची मागणी पंच व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. शिवाय राष्ट्रीय
स्तरावरील इतर राज्यातील पंच व पदाधिकाऱ्यांसाठी अशी स्पर्धा आयोजित करण्याबाबत
विचारणा केली जात आहे.
सोबत : विजेत्यांचा फोटो डावीकडून अमोल शिंदे,
संजय मणियार,
प्रमुख पाहुणे संदीप
देवरुखकर, राहुल बर्वे आणि प्राजक्ता नारायणकर

Post a Comment
0 Comments