Type Here to Get Search Results !

सुवर्णमहोत्सवी कुमार व मुली (जुनिअर) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा आजपासून धाराशिवमध्ये

 


राज्यातील २४ कुमार आणि २४ मुलींचे संघ सहभागी

राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ कुमार आणि मुलींचे संघ निवडणार

सुवर्णमहोत्सवी कुमार व मुली (जुनिअर) राज्य अजिंक्यपद  व निवड चाचणी

खो-खो स्पर्धा आजपासून धाराशिवमध्ये 

 


मुंबई, (क्रि. प्र.), २७ ऑक्टोबर. : सुवर्ण महोत्सवी ५० वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धा रविवारपासून (दि. २७) धाराशिवमध्ये सुरू होत आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत कुमारांमध्ये सोलापूरने तर मुलींमध्ये धाराशिवाने विजेतेपद मिळवले होते.  

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आणि उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा ३० ऑक्टोबरपर्यंत जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर होईल. यासाठी ३ मैदाने तयार करण्यात आली असून, ही स्पर्धा सकाळी, सायंकाळी आणि रात्री विद्युत झोतातही होणार आहे. प्रेक्षकांसाठी भव्य गॅलरी बांधण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांची निवास आणि भोजन व्यवस्था उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

या स्पर्धेत राज्यातील २४ कुमार आणि २४ मुलींचे संघ भाग घेणार आहेत. या स्पर्धेतून प्रशांत कदम (सातारा), रमेश नांदेडकर (नांदेड), संदीप चव्हाण (पुणे) आणि भावना पडवेकर (ठाणे) हे निवड समिती सदस्य महाराष्ट्राचे कुमार आणि मुली संघ निवडणार आहेत. हे संघ २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत भाग घेणार आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि. २७) सायंकाळी ५.३० वाजता धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते आणि लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आव्हान महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव आणि उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अनिल खोचरे व सरचिटणीस प्रवीण बागल यांनी कळविले आहे.

ही स्पर्धा सुरवातील साखळी व नंतर बाद पद्धतीने होणार आहे. सलामीच्या दिवशी होणारे सामने साखळीतील या प्रमाणे होणार आहेत.



सकाळ सत्र:

  • कुमार: सोलापूर-जालना, परभणी-बीड, धाराशिव-सिंधुदुर्ग, सांगली- जळगाव, नाशिक-हिंगोली, रत्नागिरी-लातूर, धुळे-छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर-नांदेड.
  • मुली: धाराशिव-परभणी, नाशिक-नंदुरबार, सांगली-सिंधुदुर्ग, जालना-हिंगोली, पालघर-जळगाव, सोलापूर-बीड, रत्नागिरी-नांदेड.

सायंकाळ सत्र:

  • कुमार: पालघर-जालना, पुणे-बीड, रायगड-सिंधुदुर्ग, सातारा-जळगाव, नंदुरबार-हिंगोली, मुंबई-लातूर, ठाणे-छत्रपती संभाजी नगर, मुंबई उपनगर-नांदेड.
  • मुली: लातूर-रायगड, सातारा-परभणी, छत्रपती संभाजी नगर-नंदुरबार, धुळे-सिंधुदुर्ग, ठाणे-हिंगोली, मुंबई उपनगर-रायगड, पुणे-जळगाव, अहमदनगर-बीड, मुंबई-नांदेड.

Post a Comment

0 Comments