Type Here to Get Search Results !

जे.जे. रुग्णालयाचे बुजुर्ग क्रिकेटपटू चंद्रकांत नाईक सेवानिवृत्त

 


जे.जे. रुग्णालयाचे बुजुर्ग क्रिकेटपटू चंद्रकांत नाईक सेवानिवृत्त

 

मुंबई: जे.जे. रुग्णालय क्रिकेट संघाचे अनुभवी सलामीवीर आणि यष्टीरक्षक चंद्रकांत नाईक यांना सेवानिवृत्तीनिमित्त भावपूर्ण निरोप देण्यात आला. या प्रसंगी त्यांच्या सहकाऱ्यांसह क्रिकेट क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या दीर्घ सेवेला व क्रिकेटमधील योगदानाला सलाम केला. जे.जे. हॉस्पिटल प्रशासकीय भवनातील या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे डॉ. शुभांगी दळवी होत्या. त्यांनी चंद्रकांत नाईक यांच्या ३५ वर्षांच्या सेवेला मानवंदना दिली.

 

शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त लीलाधर चव्हाण यांनी चंद्रकांत नाईक यांच्या रुग्णालयीन संघातील भरीव कामगिरीबद्दल आणि क्रिकेटमधील योगदानाबद्दल कौतुक केले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक गौरविण्यात आले.

 

चंद्रकांत नाईक यांनी १९८९ मध्ये जे.जे. हॉस्पिटलमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून सेवा सुरू केली होती. त्यांनी रुग्णालयीन क्रिकेट संघात सलामीवीर आणि यष्टीरक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने प्रतिष्ठेची गिरनार क्रिकेट स्पर्धा जिंकली. त्यांनी या स्पर्धेत तीन शतके ठोकून आपली क्रिकेट कौशल्ये सिद्ध केली.

 

त्यांच्या कारकिर्दीत टाइम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धा, गिरनार क्रिकेट स्पर्धा, महाराष्ट्र शासनाची थळे शिल्ड क्रिकेट स्पर्धा, कांगा लीग, आणि आयडियल रुग्णालयीन टी-२० क्रिकेट स्पर्धा यांसारख्या विविध स्पर्धांमध्ये योगदान दिले. टेनिस क्रिकेटमध्ये "दाजी" या टोपणनावाने ते धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखले जात.

 

निरोप समारंभात उपस्थितांनी त्यांच्या वक्तशीरपणा, प्रामाणिक सेवा आणि हसऱ्या स्वभावाची विशेष दखल घेतली. या प्रसंगी डॉ. राजश्री बोगडे, सौ. कल्पना नाईक, सुनील व्हिलियम, मयुरेश नाईक, योजना नाईक, सागर मोरे यांच्यासह क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, प्रदीप मसुरकर, भरत पेडणेकर, अनिल शेलार, निलेश पारकर, नरेश शिवतरकर, गुरुनाथ हळदणकर, संजय पाटील, सुभाष शिवगण उपस्थित होते.

चंद्रकांत नाईक यांची रुग्णसेवा व क्रिकेटमधील अतुलनीय कारकीर्द साऱ्या सहकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.


Post a Comment

0 Comments