5वी अर्जुन मढवी स्मृती महिला चषक स्पर्धा
पय्याडेच्या विजयात माही ठक्करचा अष्टपैलू ठसा
ठाणे: कर्णधार माही ठक्करच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर
पय्याडे स्पोर्ट्स क्लबने भारत क्रिकेट क्लबवर तीन विकेट्सने मात करत पाचव्या
अर्जुन मढवी स्मृती महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली. डॉ. राजेश
मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित या सामन्यात भारत क्रिकेट क्लबने दिलेले १८३ धावांचे आव्हान पय्याडेने ३१.५
षटकांत ७ विकेट्स गमावत पूर्ण केले.
भारत क्रिकेट क्लबच्या डावात यष्टीरक्षक आणि सलामीवीर
धनश्री वाघमारे तसेच कर्णधार केतकी धुरे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. केतकीने
अर्धशतक झळकावत ५३ धावा केल्या, तर
धनश्रीने ३८ आणि श्रुतिका पाटीलने २२ धावा जोडल्या. पय्याडेकडून दिशा लोटेने ३ बळी
मिळवले, तर क्रितीका यादवने २ बळी घेतले. माही ठक्कर,
जिया मांदरवडकर, आणि रिद्धी कोटेचाने
प्रत्येकी १ फलंदाज बाद केला.
लक्ष्याचा पाठलाग करताना पय्याडे स्पोर्ट्स क्लबची सुरुवात
खराब झाली. मात्र, कर्णधार
माही ठक्करने संघाची धुरा सांभाळत आक्रमक फलंदाजी केली. तिने ४२ चेंडूत १२ चौकार
आणि ३ षटकारांच्या मदतीने ७६ धावांची शानदार खेळी साकारली. ललिता यादवने २६ धावा
केल्या, तर आश्लेषा बरारने नाबाद २१ धावांची खेळी करत
विजयावर शिक्कामोर्तब केले. भारत क्रिकेट क्लबकडून लक्ष्मी सरोजने पाच बळी घेत
उत्कृष्ट कामगिरी केली, तर साक्षी गुरवने २ फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक:
भारत क्रिकेट क्लब: ३७.५ षटकांत सर्वबाद १८३
धनश्री वाघमारे ३८, केतकी धुरे ५३, श्रुतिका पाटील २२; दिशा लोटे ३-२८-३, क्रितीका यादव ७.५-२४-२, माही ठक्कर ६-३८-१, जिया मांदरवडकर ५-२०-१, रिद्धी कोटेचा ८-३७-१
पय्याडे स्पोर्ट्स क्लब: ३१.५ षटकांत ७ बाद १८४
माही ठक्कर ७६, ललिता यादव २६, आश्लेषा बरार नाबाद २१; लक्ष्मी सरोज ८-६९-५, साक्षी गुरव ७.५-३६-२
सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू: माही ठक्कर (पय्याडे स्पोर्ट्स क्लब).
Post a Comment
0 Comments