Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र खो-खो संघाच्या यशामागे तांत्रिक कौशल्य आणि संघटित प्रयत्न - प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव

 


महाराष्ट्र खो-खो संघाच्या यशामागे तांत्रिक कौशल्य आणि  संघटित प्रयत्न - प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव

 

४३व्या कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने सलग दहाव्यांदा दुहेरी सुवर्ण मुकुट पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मुलांनी सलग १९वे आणि मुलींनी सलग १०वे विजेतेपद पटकावून खो-खोच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद घेतली आहे. मुलांसाठी हे ३५वे आणि मुलींसाठी २६वे राष्ट्रीय विजेतेपद ठरले आहे.

 

ग्रामीण भागातील धाराशिवच्या जितेंद्र वसावेला "वीर अभिमन्यू" पुरस्कार, तर सुहानी धोत्रेला "जानकी" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंनी खो-खोमध्ये उल्लेखनीय प्रगती केली असून, शहरी व ग्रामीण भागातील स्पर्धा अधिक तीव्र होत आहे.

 

ओडीसाच्या सुविधांचा आदर्श आणि महाराष्ट्राचा दृढ निर्धार:

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी या यशाचे श्रेय संघाच्या मेहनतीला, प्रशिक्षकांच्या कल्पकतेला आणि तांत्रिक कौशल्याला दिले आहे. त्यांनी ओडीसाच्या प्रगत सुविधांचा उल्लेख करत सांगितले की, “ओडीसामध्ये उच्च गुणवत्ताकेंद्र सुरू करण्यात आली आहेत, आणि खो-खो नियमितपणे मॅटवर खेळला जातो. महाराष्ट्रात अशा सुविधा नसतानाही खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली आहे.”

 

ते पुढे म्हणाले, “प्रशिक्षकांनी खेळाडूंना योग्य मार्गदर्शन दिले, नियोजनबद्ध सराव आणि तांत्रिक युक्त्यांमुळे संघाने हा विजय मिळवला आहे. प्रशिक्षक, खेळाडू आणि व्यवस्थापक यांचा संघटित प्रयत्न या यशामागे आहे.”

 

महाराष्ट्र सरकारचे प्रोत्साहन आणि उच्च गुणवत्ता केंद्राची गरज :

प्रा. जाधव यांनी शासनाच्या थेट नोकर भरती, ५% आरक्षण, राष्ट्रीय व खेलो इंडिया स्पर्धांतील पारितोषिक योजना यामुळे खेळाडूंना मिळणाऱ्या प्रोत्साहनाचे कौतुक केले. “हे उपक्रम खेळाडूंना मैदानाकडे वळायला प्रवृत्त करत आहेत. मात्र, महाराष्ट्रात उच्च गुणवत्ता केंद्र सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा मिळतील आणि ते राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करू शकतील,” असे त्यांनी सांगितले.

 

महाराष्ट्राचा दृढ निश्चय आणि भविष्यातील आव्हाने :

महाराष्ट्राचा हा विजय निष्ठा, कौशल्य आणि मेहनतीचे प्रतीक आहे. प्रा. चंद्रजीत जाधव यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन या यशामागे महत्त्वपूर्ण ठरले आहे. महाराष्ट्र संघ भविष्यातही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली विजयी परंपरा कायम ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


Post a Comment

0 Comments