Type Here to Get Search Results !

मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा जय शंकर चौक आणि शिवकन्या मंडळ उपांत्यपूर्व फेरीत

 



मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

जय शंकर चौक आणि शिवकन्या मंडळ उपांत्यपूर्व फेरीत

 

मुंबई, मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या वतीने नेहरू नगर, कुर्ला (पूर्व) येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर सुरू असलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत जय शंकर चौकने द्वितीय श्रेणी गटात, तर शिवकन्या मंडळाने कुमारी गटात उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. या स्पर्धेचे आयोजन मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने संयोजन संस्था चारकोप यांच्या सहकार्याने आणि संचालिका नम्रता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.

 

जय शंकर चौकचा प्रभावी विजय

द्वितीय श्रेणी गटात जय शंकर चौकने अश्वमेध प्रतिष्ठानचा ३४-१२ असा एकतर्फी पराभव केला. पहिल्या डावात १४-०८ अशी आघाडी घेतल्यानंतर जय शंकरने दुसऱ्या डावात आणखी दमदार खेळ करत २४ गुणांच्या फरकाने विजय मिळवला. संघाच्या विजयाचे श्रेय सचिन जाधव आणि रोहित आरोटे यांच्या दमदार कामगिरीला जाते. अश्वमेध संघाच्या ओंकार मोरेने प्रयत्न केले असले, तरी दुसऱ्या डावात त्यांची चमक कमी पडली.

 

शिवकन्या मंडळाची उत्कृष्ठ कामगिरी

कुमारी गटातील सामन्यात शिवकन्या मंडळाने चेंबूर क्रीडा केंद्राचा २४-१५ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या सत्रात ०९-११ अशा पिछाडीवर असलेल्या शिवकन्याने दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळ केला आणि ९ गुणांनी सामना जिंकला. परी कोरी आणि मेहजबीन शेख यांनी उत्कृष्ट चढाई आणि पकडी करत संघाला यश मिळवून दिले. चेंबूर संघाच्या देवयानी नवले आणि गुंजन सुवर्णा यांनी प्रयत्न केले, पण दुसऱ्या सत्रात त्यांचा प्रतिकार कमी पडला.

 

महिला गटात वंदे मातरम् संघाचा विजय

महिला गटात वंदे मातरम् संघाने आकाश स्पोर्ट्सचा २२-०८ असा पराभव करत तिसऱ्या फेरीत मजल मारली. वंदे मातरम् संघाच्या प्रसिता पन्हाळकर आणि रिया निंबाळकर यांनी झंझावाती खेळ करून संघाचा विजय सोपा केला. आकाश स्पोर्ट्सच्या तनिष्का बद्रिकेने चांगली कामगिरी केली, मात्र संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

 


प्रथम आणि द्वितीय श्रेणी पुरुष गटातील सामने

प्रथम श्रेणी पुरुष गटात शितलादेवी संघाने गुरुकृपा संघावर २५-१४ असा विजय मिळवला आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.


द्वितीय श्रेणी गटात शिवरदेवने शिव मराठा संघाचा १७-१५ असा रोमांचक पराभव केला, तर संघर्ष संघाने के.आर.टी. संघाला २०-०९ असे हरवत तिसऱ्या फेरीत आपले स्थान निश्चित केले.


 


Post a Comment

0 Comments