Type Here to Get Search Results !

महेक पोकरच्या शतकाने व्हिक्टरी क्रिकेट क्लबचा धडाकेबाज विजय


 

महेक पोकरच्या शतकाने व्हिक्टरी क्रिकेट क्लबचा धडाकेबाज विजय


ठाणे: महेक पोकरच्या कर्णधारपदाला साजेशी शतकी खेळीने व्हिक्टरी क्रिकेट क्लबने स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लबवर दणदणीत विजय मिळवला. डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत हा विजय नोंदवण्यात आला. २९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लबला केवळ ९१ धावांत गुंडाळत व्हिक्टरीने मोठा विजय साजरा केला.

 

सेंट्रल मैदानावर झालेल्या पाचव्या सामन्यात महेक आणि अलिना मुल्ला या सलामीवीरांनी संघासाठी भक्कम सुरूवात केली. या जोडीने १५५ चेंडूंत ३० चौकार आणि १ षटकारासह १८४ धावांची भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. अलिनाने ६१ धावा करत अर्धशतक झळकावले, ज्यात ११ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. महेकने १०१ चेंडूत २० चौकार ठोकत भक्कम ११२ धावांची खेळी साकारली. क्रितिका यादवनेही महत्त्वपूर्ण ४८ धावा केल्या. स्पोर्ट्सफिल्डकडून आकृती भोईरने २ गडी बाद केले, तर पलक धरमशी आणि दीपिका भारियाने प्रत्येकी १ बळी घेतला.

 

स्पोर्ट्सफिल्ड क्लबने मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरूवातीपासूनच दडपणाखाली खेळ केला. फलंदाजांपैकी प्रियंका राठोड (३१) आणि पलक धरमशी (२९) यांनाच थोडासा प्रतिकार करता आला. प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत टाकत व्हिक्टरीच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. अलिनाने ३ बळी घेतले, तर प्रिशा देवरुखकर, विधी मथुरिया आणि तन्वी परब यांनी प्रत्येकी १ फलंदाज बाद केला. शतकवीर महेक पोकरला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

संक्षिप्त धावफलक:

व्हिक्टरी क्रिकेट क्लब: ४० षटकांत ४ बाद २९३

महेक पोकर ११२, अलिना मुल्ला ६१, क्रितिका यादव ४८; आकृती भोईर ८-५९-२, पलक धरमशी ८-५९-१, दीपिका भारिया ३-२२-१

 

स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लब: ३०.१ षटकांत सर्वबाद ९१

प्रियंका राठोड ३१, पलक धरमशी २९; अलिना खान ८-१-२७-३, क्रितिका यादव ७-१-१८-१, प्रिशा देवरुखकर ६-१-२०-१, विधी मथुरिया २.१-३-१, तन्वी परब १-६-१

 

सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू: महेक पोकर (व्हिक्टरी क्रिकेट क्लब).


Post a Comment

0 Comments