३५ वी किशोर/किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी
स्पर्धा - मनमाड, नाशिक २०२५
नाशिक व परभणी कबड्डीत अजिंक्य
पिंपरी चिंचवड दोन्ही गटांत उपविजेते
मनमाड (नाशिक): नाशिक शहर आणि परभणी संघांनी ३५व्या
किशोर/किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत धमाकेदार विजयांची
नोंद केली. यजमान नाशिक शहराने किशोरी गटात आणि परभणीने किशोर गटात उपविजेत्यांना
धक्का देत विजेतेपदावर ताबा मिळवला, तर पिंपरी चिंचवड संघाने दोन्ही गटांमध्ये उपविजेतेपद
प्राप्त केले.
नाशिक शहराच्या किशोरी गटाने पिंपरी चिंचवडचा कडवा प्रतिकार
मोडून काढत ४३-३८ अशा रोमांचक सामन्यात विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयामुळे नाशिक
शहरने "स्व. सौ. राजश्री चंदन पांडे फिरता चषक" आणि "आम. सुहास
(अण्णा) कांदे कायमस्वरूपी चषक" मिळवला. याशिवाय नाशिक शहर संघाला ₹५,००,०००/- (पाच लाख रुपये) रोख पारितोषिक देखील मिळाले.
पिंपरी चिंचवडच्या संघाने सुरुवातीला चांगली लढत दिली,
मात्र नाशिक शहराच्या बिंदिशा सोनार,
ईशा दारोळे आणि हेतल हिरे यांच्या अटीतटीच्या खेळामुळे
नाशिकने सामन्यात वर्चस्व ठेवले. अंतिम क्षणांत नाशिकच्या उत्कृष्ट डिफेन्सने
पिंपरी चिंचवडचा आघाडी कायम राखण्याचा प्रयत्न विफल केला.
तर किशोर गटाच्या अंतिम सामन्यात,
परभणीने पिंपरी चिंचवडला ४४-२४ अशी एकतर्फी पराभव देत
"स्व. नारायण नागो पाटील फिरता चषक" आणि "आम. सुहास (अण्णा) कांदे
कायमस्वरूपी चषक" आपल्याच नावे केला. सुरुवातीला परभणीने दोन लोण देत चांगली
आघाडी घेतली आणि उत्तरार्धात त्या आघाडीला वाढवले. आर्यन पवार,
किशोर जगताप यांच्या तुफानी चढाया आणि सोमेश्वर खोसेच्या
भक्कम बचावामुळे हा विजय सहज संपादन झाला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आम. सुहास (अण्णा) कांदे,
सौ. अंजुमताई कांदे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे मंगल पांडे,
नाशिक जिल्हा कबड्डी असो.चे कार्याध्यक्ष राजाभाऊ पगारे आणि
सचिव मोहन (अण्णा) गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडला.
या विजयानंतर नाशिक आणि परभणीच्या संघांतील काही खेळाडूंनी राष्ट्रीय
स्पर्धेसाठी दावेदारी निश्चित केली आहे, आणि त्या स्पर्धेत या दोन संघांतील खेळाडूंचा खरा कस लागणार
असला तरी महाराष्ट्रातील इतर संघातील निवड झालेले खेळाडू त्यांना कशी साथ देतात
त्यावर महाराष्ट्राची कामगिरी दिसून येईल.



Post a Comment
0 Comments