"प्रतिक
वाईकर: महावितरणचा वरिष्ठ
तंत्रज्ञ ते भारतीय खो-खो
संघाचा कर्णधार एक प्रेरणादायक प्रवास"
प्रतिक किरण वाईकर, महाराष्ट्र राज्यातील एक अत्यंत
यशस्वी आणि प्रतिष्ठित क्रीडापटू, ज्याने आपल्या
क्रीडाप्रतिबद्धतेने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशाची शिखरे
गाठली आहेत. वयाच्या ८ व्या वर्षी खेळाला सुरुवात करणाऱ्या प्रतिकने लहानपणापासूनच
लंगडी आणि गोल खो-खो खेळले, पण त्याच्या क्रीडाप्रतीच्या
निष्ठेने आणि मेहनतीने त्याला खो-खो मध्ये एक वेगळी ओळख मिळवून दिली. नुकत्याच
दिल्ली येथे संपन्न झालेल्या पहिल्या जागतिक खो-खो स्पर्धेत भारताने विजेतेपद
मिळवले त्यात भारतीय संघाचा कर्णधार म्हणून प्रतिक वाईकरने संपूर्ण स्पर्धेवर
आपल्या खेळाचा ठसा उमटवला होता.
महावितरणचा यशात मोठा वाटा
त्याने १२ व्या वर्षी पहिली जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा खेळली
आणि नंतर १३ व्या वर्षी पहिली राष्ट्रीय खो-खो स्पर्धा खेळली. त्याच्या या
प्रारंभिक यशामुळे व खो-खो मुळे त्याला पुढे महावितरण मध्ये नोकरी मिळाली आणि
सध्या तो वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे. येथे त्याला खो-खो साठी त्याच्या
वरिष्ठ अधिकारी व सहकारी कर्मचारी यांच्याकडून नेहमीच प्रोत्साहन मिळत असते.
माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सरावासाठी व खेळासाठी नेहमी प्रोत्साहन देऊन नेहमीच मदत केली आहे.
प्रतिकच्या क्रीडा जीवनात अनेक तज्ञ मार्गदर्शकांचा हात
आहे. सुरुवातीच्या काळात अरविंद पटवर्धन सर आणि दिनकर सर यांचे मार्गदर्शन त्याला
मिळाले, आणि नंतर सनात वाईकर, श्रीरंग इनामदार, आशुतोष गैकेवरी, सचिन गोडबोले,
शिरीष राणे, शिरीन गोडबोले, तुषार चित्राव इ. प्रशिक्षकांनी
त्याच्या खो-खो खेळाला वळण व दिशा दिली. त्यामुळेच प्रतिकला खो-खो मध्ये अतिउच्च
शिखरे सर करता आली.
घरच्यांचे प्रोत्साहन व सहकार्य
घरच्यांचा नेहमीच मला नेहमीच खेळासाठी प्रोत्साहन
व सहकार्य केले आहे. लहानपणा पासूनच घरचे सर्व सामने पाहायला यायचे. काही हव नको ते बघायचे. सुरवातीला आर्थिक स्थिती
फारशी चांगली नसताना देखील मला खेळासाठी व शिक्षण पूर्ण करण्यासाठी घरच्यांनी
नेहमीच सहकार्य केले व प्रोत्साहन दिले. त्यावेळी त्यांचे एव्हढेच सांगणे असायचे
कि अभ्यास करून खेळ कर.मोठा भाऊ कुणाल याला मी खेळातील माझा आयडॉल मानतो.
या सगळ्या मध्ये मित्रांनी दिलेली साथ नेहमीच लक्षात राहते.
माझे बहुतेक मित्र हे लहानपणी माझ्या संघातून खेळलेले आहेत आणि ते अजून सुधा
माझ्या सोबत आहेत. खूप मित्रांनी मला मोठा व्हावं यासाठी प्रयत्न केलेत. म्हणून हे
यश मी फक्त माझ नसून त्या सर्वांचं आहे अस मानतो.
प्रमुख क्रीडासंस्कार आणि गौरव
प्रतिक वाईकरने आपल्या खेळाच्या कारकिर्दीत अनेक
महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवली. २०१६ मध्ये
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत गुवाहटीत सुवर्ण पदक जिंकून त्याने क्रीडाजगतात
आपली छाप पडली. तसेच, २०१८
मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत ३-० ने मालिका जिंकून भारताचे नाव उंचावले.
या खो-खो मालिकेत प्रतिकने आपली छाप पाडली होती.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतील उत्कृष्ट कामगिरी
प्रतिक वाईकरने ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत
गुजरातमध्ये सुवर्ण पदक जिंकले, तसेच
३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्तराखंडमध्येही सुवर्ण पदक मिळवले. त्याने
विविध राष्ट्रीय खो-खो चॅम्पियनशिपमध्ये पाच वेळा सुवर्ण व चार वेळा रौप्य पदक
मिळवले. ५६ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो २०२३-२४ स्पर्धेत
महाराष्ट्राला दिल्लीमध्ये सुवर्ण पदक जिंकून देऊन त्याने आपल्या
क्रीडाप्रतिबद्धतेला अजून एक ठसा उमठवला.
फेडरेशन कप राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी
प्रतिक वाईकरने २०११ ते २०२० पर्यंत फेडरेशन कप राष्ट्रीय
स्पर्धांमध्ये सात वेळा सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. तसेच स्पर्धेतील अष्टपैलू
खेळाडू म्हणून सुध्दा त्याला गौरविले गेले. त्याच्या खेळाची शिस्त, मेहनत आणि उत्कृष्टतेचा दृष्टीकोन त्याला
या पुरस्कारांमध्ये प्राविण्य प्राप्त करायला कारणीभूत ठरला.
कर्णधार म्हणून नेतृत्व
प्रतिक वाईकर महाराष्ट्र खो-खो संघाचा कर्णधार होता आणि
त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने विविध राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत उत्कृष्ट
कामगिरी केली आहे. त्यांच्या कर्णधार पदाखाली, २०१० मध्ये महाराष्ट्र संघाने जूनियर राष्ट्रीय खो-खो चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक
जिंकले होते. यावर कळस चढवताना पहिल्या जागतिक खो-खो स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक
मिळवून दिले होते.
सन्मान आणि पुरस्कार
प्रतिक वाईकरने 'एकलव्य पुरस्कार' आणि महाराष्ट्र शासनाचा
‘शिवछत्रपती पुरस्कार' मिळवून खो-खो ला व त्याचा परिवार,
क्लब व प्रशिक्षकांना सन्मानित केले आहे असेच म्हणावे लागेल. त्याच्या खो-खो तील
योगदानामुळे त्यांचे स्थान भारतीय क्रीडाजगतात अत्यंत आदरणीय ठरत आहे.
प्रतिक वाईकरची खो-खो प्रती असलेली निष्ठा आणि कर्तृत्व हे नवीन
खो-खो खेळाडूंना नेहमीच प्रेरणा देत राहील. त्याच्या यशामुळे, नवीन खेळाडूंना उत्कृष्टतेच्या मार्गावर
चालण्यासाठी मार्गदर्शन मिळेले आणि भारतीय क्रीडाजगतात त्याचे नाव सदैव
सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.


.jpeg)

Post a Comment
0 Comments