किशोरी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा
पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिक ग्रामीणची उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच
मनमाड, नाशिक: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि नाशिक
जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित ३५व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी
स्पर्धेत किशोरी गटातील उपउपांत्यपूर्व फेरीत पिंपरी चिंचवड,
सांगली आणि नाशिक ग्रामीण या संघांनी आपली जागा निश्चित
केली आहे.
स्व. माणकचंद ललवाणी इस्टेट (हेलिपॅड) मैदानावर सुरू
असलेल्या या स्पर्धेत पिंपरी चिंचवडने रत्नागिरीवर ४५-२१ असा एकतर्फी विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीलाच त्यांनी
दमदार खेळ करत तीन लोण मिळवले आणि २९-१२ अशी आघाडी घेत अर्धी लढाई जिंकली. संतोषी थोरवे आणि समृद्धी लांडगेच्या आक्रमक चढायांनी आणि
सिद्धी लांडगेच्या अचूक पकडींनी संघाला सहज विजय मिळवून दिला. रत्नागिरीकडून श्रेय हुंबेने
मात्र लढत दिली.
दुसऱ्या सामन्यात सांगलीने ठाणे शहरचा ४३-३२ असा पराभव
केला. सामना अटीतटीचा होत असतानाही विश्रांतीपूर्वी
सांगलीने १९-१६ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रात सानिका पाटील आणि श्रेया भिलवडे यांच्या
संयमी चढायांनी आणि तबसुम पठाणच्या प्रभावी पकडींनी सांगलीचा विजय निश्चित केला.
ठाणे शहरकडून भक्ती पालवे, सोनम पंडित आणि श्रद्धा गोडसे यांनी कडवी झुंज दिली.
तिसऱ्या सामन्यात यजमान नाशिक ग्रामीणने रायगडला ३२-२९ अशा निसटत्या फरकाने
हरवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिल्या सत्रात नाशिकने १८-०९ अशी आघाडी घेतली होती,
मात्र रायगडने नंतर जोरदार पुनरागमन करत सामना अटीतटीचा
केला. नाशिकच्या सायली खटाळे, संजल काकडे, अन्वी नांगरे आणि वैष्णवी गजरे यांच्या प्रभावी खेळाने
संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. रायगडकडून मलिक शिंदे,
अदिती पानवलकर आणि प्रभा सूर्यकर यांनी दमदार खेळ करत
संघाला पुनरागमन घडवून दिले, मात्र शेवटी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
बाद फेरीसाठी पात्र संघ:
रात्री उशीरा झालेल्या साखळी सामन्यांनंतर खालील संघ बाद
फेरीसाठी पात्र ठरले –
अ गट: मुंबई उपनगर पूर्व, जालना, ब गट: नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, क गट: ठाणे शहर, मुंबई उपनगर पश्चिम, ड गट: परभणी, रत्नागिरी, इ गट: पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, फ गट: पुणे ग्रामीण, सांगली, ग गट: रायगड, नंदुरबार, ह गट: अहमदनगर, पुणे शहर
स्पर्धेतील रंगत दिवसेंदिवस वाढत असून आता उपांत्यपूर्व
फेरीत कोणते संघ अंतिम फेरी गाठणार, याकडे कबड्डीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments