परभणीच्या अद्या बाहेतीची जागतिक टेबल टेनिस युवा
मालिकेसाठी निवड!
परभणी : महाराष्ट्राच्या टेबल टेनिस क्षेत्रासाठी अभिमानास्पद
बातमी! परभणीची
उदयोन्मुख टेबल टेनिसपटू अद्या पूजा महेश बाहेती हिची वडोदरा, गुजरात येथे होणाऱ्या जागतिक टेबल टेनिस युवा मालिकेसाठी
निवड झाली आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२५ या
कालावधीत समा क्रीडा संकुल, वडोदरा येथे पार पडणार आहे.
राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय यशस्वी कामगिरीचे फलित :
अद्या बाहेती ही महाराष्ट्रातील आघाडीच्या टेबल
टेनिसपटूंपैकी एक असून, भारतातील अव्वल १० खेळाडूंमध्ये तिचा समावेश आहे.
यंदाच्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना नामांकन स्पर्धांमध्ये
अद्याने चमकदार कामगिरी करत ६ स्पर्धांपैकी ४ सुवर्ण आणि १ कांस्य पदक जिंकून राज्य
अजिंक्यपद मिळवले आहे.
भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या मान्यतेने झालेल्या
६ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने
एका अंतिम फेरीपर्यंत मजल मारत रौप्यपदक पटकावले,
तर उर्वरित ४
स्पर्धांमध्ये ती उप-उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचली. तिच्या या सातत्यपूर्ण उत्कृष्ट खेळामुळेच तिला जागतिक युवा
मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
सातत्यपूर्ण मेहनतीचा मोठा यशस्वी टप्पा :
गेल्या ५ वर्षांपासून अद्याला प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांचे
मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या प्रशिक्षणामुळेच ती आज आंतरराष्ट्रीय स्तरावर
चमकण्याच्या तयारीत आहे.
अद्याच्या निवडीबद्दल मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव :
अद्याच्या निवडीबद्दल भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सरचिटणीस कमलेश मेहता,
महाराष्ट्र टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष प्रवीण लुंकड,
सरचिटणीस यतिन टिपणीस, संजय कडू, ॲड. अशीतोष पोतनीस, आशिष बोडस तसेच परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे,
राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे,
कल्याण पोले, क्रीडा अधिकारी नानकसिंह बस्सी,
सुयश नाटकर, रोहन औढेंकर, परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष समशेर वरपुडकर,
सचिव गणेश माळवे, डॉ. माधव शेजुळ, संतोष सावंत, परभणी क्लबचे सचिव डॉ. विवेक नावंदर यांनी अभिनंदन करून
तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अद्या बाहेतीच्या या चमकदार यशामुळे परभणीच्या क्रीडा
क्षेत्राला नवा सन्मान प्राप्त झाला असून, तिच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाची संपूर्ण
महाराष्ट्राला उत्सुकता आहे!

Post a Comment
0 Comments