महिला कुस्तीला समान सन्मान – देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय
स्पर्धेत ५० ‘लाडक्या पैलवान बहिणींच्या’ कुस्त्या
मुंबई, दि. १० (क्री.प्र.) – ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत जळगावच्या जामनेर तालुक्यात १६ फेब्रुवारी
रोजी होणाऱ्या ‘नमो कुस्ती महाकुंभ-२’ मध्ये देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महिला
कुस्तीलाही समान सन्मान दिला जाणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ चा नारा देत तब्बल ५० महिला पैलवानांच्या कुस्त्या रंगणार आहेत. याशिवाय, स्पर्धेचा प्रारंभ आणि समारोप महिला कुस्तीनेच केला जाणार
असून, हा
ऐतिहासिक सन्मान कुस्तीच्या इतिहासात प्रथमच दिला जात आहे,
अशी माहिती संयोजक समितीचे प्रमुख हिंदकेसरी रोहित पाटील यांनी दिली.
९ देशांचे मल्ल भिडणार!
या भव्य स्पर्धेत भारतासह ९ देशांचे नामवंत पुरुष आणि महिला मल्ल
एकाच मंचावर आपल्या ताकदीची चुणूक दाखवणार आहेत.
भारत,
फ्रान्स,
मोल्दोवा,
उझबेकिस्तान,
रोमानिया,
एस्टोनिया,
इराण,
ब्राझील आणि जॉर्जिया
येथील ऑलिंपियन, जागतिक विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, हिंद केसरी, रुस्तुम-ए-हिंद, भारत केसरी आणि महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान या स्पर्धेत
सहभागी होणार आहेत.
महिला कुस्तीपटूंच्या आंतरराष्ट्रीय लढती
भारताच्या नावाजलेल्या महिला कुस्तीपटू
परदेशी प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध
आपली ताकद आजमावणार आहेत. काही महत्त्वाच्या कुस्ती लढती पुढीलप्रमाणे :
- भाग्यश्री कोळी (ट्रिपल महिला महाराष्ट्र केसरी) वि. मार्टा पाजूला
(युरोपियन चॅम्पियन - एस्टोनिया)
- प्रतीक्षा बांगडी (पहिली महिला महाराष्ट्र केसरी) वि. अंजलीक गोन्झालेझ
(वर्ल्ड चॅम्पियन - फ्रान्स)
- अमृता पुजारी (महिला महाराष्ट्र केसरी) वि. कॅटालिना क्सेन्टने (ऑलिंपियन
- रोमानिया)
- वेदांतिका पवार (उपमहाराष्ट्र केसरी) वि. शिवानी मेटकर (राष्ट्रीय
विजेती)
- अपेक्षा पाटील (राष्ट्रीय विजेती) वि. सोनाली मंडलिक (राष्ट्रीय विजेती)
पुरुष कुस्तीपटूंच्या रोमांचक लढती
- विजय चौधरी (विश्वविजेता, ट्रिपल महाराष्ट्र केसरी) वि. सुक्सरोब जॉन (एशिया
विजेता - उझबेकिस्तान)
- सिकंदर शेख (महाराष्ट्र केसरी) वि. घेओघे एरहाण (युरोप चॅम्पियन -
मोल्दोवा)
- पृथ्वीराज मोहोळ (महाराष्ट्र केसरी) वि. जलाल म्हजोयूब (आशियाई पदकविजेता
- इराण)
- भूपिंदर सिंह (भारत केसरी - पंजाब) वि. युधिष्ठिर दिल्ली (राष्ट्रीय
विजेता - हरियाणा)
- सुमित मलिक (अर्जुन पुरस्कार विजेता,
ऑलिंपियन) वि.
पै. जस्सा (शेर ए पंजाब)
३०० स्थानिक पैलवानही दाखवणार दम
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्थानिक ३०० महिला आणि पुरुष पैलवानही आपली कुस्ती कौशल्ये
दाखवणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना भव्य रोख पारितोषिके, मानाची गदा आणि ‘देवाभाऊ केसरी’ हा प्रतिष्ठेचा किताब
प्रदान केला जाणार आहे.
कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
ही ऐतिहासिक स्पर्धा रविवार, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ८
वाजेपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला साजेसा हा कुस्ती महोत्सव
प्रत्यक्ष पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments