धाराशिवच्या छत्रपती मंडळाने सोलापूरच्या किरण स्पोर्टस्ला
हरवून झिंकला कर्मवीर चषक!
बार्शी – कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या
जयंतीनिमित्त आयोजित विभागीय निमंत्रित खो-खो स्पर्धेत धाराशिवच्या छत्रपती
व्यायाम प्रसारक मंडळाने सोलापूरच्या किरण स्पोर्टस्ला 16-14 असा दोन गुणांनी रोमांचक पराभव करत विजेतेपद जिंकले!
कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या कर्मवीर मैदानावर झालेल्या अंतिम
सामन्यात धाराशिवने मध्यंतरापर्यंत 13-8 अशी निर्णायक आघाडी घेतली होती. धाराशिवच्या कणखर खेळाडूंनी
मैदानावर अप्रतिम संयम, सामर्थ्य आणि तंत्राचा संयोग साधला. अनिकेत पवार,
रोहित चव्हाण, विजय शिंदे आणि रोहन गुंड यांच्या उत्तम खेळीमुळे त्यांना
विजय मिळवता आला.
अनिकेत पवारने (1.00,
1.40 मिनिटे संरक्षण व 3 गुण) व रोहित चव्हाणने
(1.30 मि. व 4
गुण) यांनी अष्टपैलू खेळ करत विजयात मोलाचा हातभार लावला तर विजय शिंदे (2.00.
1.30 मि.) संरक्षणाची व तर रोहन गुंडने (4 गुण) आक्रमणाची बाजू सांभाळत विजय निश्चित केला. किरण
स्पोर्टसच्या अक्षय इंगळे (1.10 मिनिटे व 3 गुण) व निरज कोळी (1.00 मिनिटे व 3 गुण) यांनी दिलेली निकराची लढत अपुरी ठरली.
तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात,
धाराशिवच्या श्री तुळजाभवानी क्रीडा मंडळाने वेळापूरच्या
अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाला 22-17 असे नमवले.
स्पर्धेचे आयोजन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी,
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आणि सोलापूर खो-खो असोसिएशन
यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते
पारितोषिक वितरण करण्यात आले.
स्पर्धेतील प्रमुख खेळाडू म्हणून रोहित चव्हाण (अष्टपैलू),
विजय शिंदे (संरक्षक) आणि अक्षय इंगळे (आक्रमक) यांना
गौरवण्यात आले.
Post a Comment
0 Comments