वरळीच्या नवमित्र क्रीडा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी कबड्डी
स्पर्धेत ओम् साईनाथ, महालक्ष्मी,
विजय बजरंग आणि शताब्दी स्पोर्टस् यांची धडाकेबाज आगेकूच!
मुंबई : वरळी स्पोर्टस् क्लबच्या 'स्व. यशवंत साळवी मॅट'वर
कबड्डीच्या जोरदार हल्लाबोलात आज नवमित्र क्रीडा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी
द्वितीय श्रेणी स्पर्धेत ओम् साईनाथ ट्रस्ट, महालक्ष्मी मंडळ,
विजय बजरंग सेवा मंडळ आणि शताब्दी स्पोर्टस् यांनी दमदार विजय
मिळवून दुसरी फेरी गाठली. "स्व. दीपक वेर्लेकर
चषक" साठी सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक
चढाईला आणि पकडीला वरळीचा मातीचा सुगंध लाभलेला दिसला.
साईनाथच्या झंझावातापुढे संताजींचा प्रतिकार कोलमडला
दिवसाच्या सुरुवातीला ओम् साईनाथ ट्रस्टने आपला दबदबा दाखवत
वीर संताजी मंडळावर ४२-२७ असा एकतर्फी विजय मिळवला. पहिल्या डावातच दोन लोण घेऊन
२६-७ अशी मजबूत आघाडी घेणाऱ्या साईनाथ संघाने उत्तरार्धातही संयम राखला. सुशांत
कदम आणि अक्षय सावंत यांच्या वीजेसारख्या चढायांनी आणि अचूक पकडींनी मैदान गाजवले.
संताजी संघाकडून ओमकार चव्हाणने जोरदार प्रयत्न केला, पण साईनाथच्या वादळापुढे टिकू शकला नाही.
महालक्ष्मीच्या सुशांतने केलेले 'सुपर रेड' ठरले
निर्णायक
दुसऱ्या सामन्यात महालक्ष्मी मंडळाने भवानीमाता
प्रतिष्ठानवर २८-२४ अशी मात केली.
पहिला डाव अत्यंत चुरशीचा गेला, विश्रांतीला
केवळ एका गुणाची आघाडी महालक्ष्मी संघाला मिळाली होती. मात्र, सुशांत फकिराच्या एका दमदार चढाईत चार गडी टिपत सामन्याचा रंग बदलला!
परशुराम पाटीलच्या भक्कम पकडीने या विजयाला बळ दिले. भवानीमाताचे दर्शन तांबट आणि
संतोष सावंत यांनीही शेवटपर्यंत झुंजार लढत दिली, पण नशिबाची
साथ लाभली नाही.
विजय बजरंगने दाखवली परिपक्वता
विजय बजरंग सेवा मंडळाने हिंद केसरी मंडळाचा दमदार प्रतिकार
२७-२१ अशा गुण फरकाने मोडीत काढत पुढील फेरी गाठली. समीर तोडणकर आणि अनिकेत रामाणे
यांच्या जोडीने चढाई आणि पकडी दोन्हीमध्ये जुगलबंदी दाखवत विजयावर शिक्कामोर्तब
केले. हिंद केसरी संघाने सुरुवातीला लोण देऊन रंगत आणली होती, मात्र उत्तरार्धात सातत्याचा अभाव त्यांना
महागात पडला.
शताब्दी स्पोर्टस् ने नेताजींना नमवले
दिवसाच्या अखेरच्या सामन्यात शताब्दी स्पोर्टस् ने वीर
नेताजी मंडळावर ३३-१८ असा दणदणीत विजय मिळविला. करण जैसवाल आणि साहिल कदम यांच्या
आक्रमक चढाया आणि मजबूत पकडीने नेताजी संघाचा प्रतिकार मोडला. नेताजी संघाचा शिरीष
पांगम एकटा झुंज देत राहिला, पण
संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
शिवछत्रपती कुटुंबाची उपस्थिती, स्पर्धेला लाभला वेगळाच झळाळा
स्पर्धेच्या रंगतदार दुसऱ्या दिवशी विशेष आनंददायी क्षण आला, जेव्हा शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त जया
शेट्टी, छाया शेट्टी (बांदोडकर) आणि गौरव शेट्टी यांनी
मैदानावर उपस्थिती लावली. त्यांच्या आगमनाने खेळाडूंमध्ये उत्साह संचारला आणि
संपूर्ण स्पर्धेचे वातावरण अधिक प्रेरणादायी बनले.
Post a Comment
0 Comments