Type Here to Get Search Results !

श्री मावळी मंडळाच्या सुवर्णस्पर्धेत ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब, आकाश स्पोर्ट्स क्लब, जय भारत स्पोर्ट्स क्लब, होतकरू मित्र मंडळाच्या संघांची दमदार आगेकूच!


श्री मावळी मंडळाच्या सुवर्णस्पर्धेत ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब, आकाश स्पोर्ट्स क्लब, जय भारत स्पोर्ट्स क्लब, होतकरू मित्र मंडळाच्या संघांची दमदार आगेकूच!

 

ठाणे : श्री मावळी मंडळ संस्थेच्या शताब्दी वर्ष आणि १०० व्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित ७२ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा रंगतदार वातावरणात संपन्न होत आहे. तिसऱ्या दिवशी महिलांमध्ये ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब, आकाश स्पोर्ट्स क्लब, जय भारत स्पोर्ट्स क्लब, होतकरू मित्र मंडळ, तसेच डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब यांनी उप-उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. पुरुष गटातही वीर परशुराम कबड्डी संघ, शिवशंकर क्रीडा मंडळ, स्वस्तिक क्रीडा मंडळ, चेंबूर क्रीडा केंद्र, सतेज संघ (बाणेर पुणे) आणि जय भवानी तरुण मंडळ (कर्जवडे) यांनी तिसऱ्या फेरीत आपली मजल मारली.

 

महिला गटातील थरारक सामन्यांचे जल्लोषपूर्ण चित्र!

पहिल्या सामन्यात ठाण्याच्या ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब संघाने मुंबई उपनगरच्या स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाचा ६ गुणांनी पराभव केला. वैष्णवी साळुंखेच्या जादुई चढायांनी मध्यंतराला संघाला ७ गुणांची आघाडी मिळवून दिली. श्रणीता घारावेंच्या शानदार पकडीने या आघाडीला भक्कम आधार दिला.

 

दुसऱ्या सामन्यात, होतकरू मित्र मंडळ (ठाणे) ने स्वराज्य स्पोर्ट्स अकॅडमी (चिपळूण) संघावर १० गुणांनी दणदणीत विजय मिळवला. रिया पारकर आणि साक्षी मकवाना यांच्या आक्रमक खेळीमुळे हा विजय साध्य झाला.

अन्य निकाल:

आकाश स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध स्नेहविकास क्रीडा मंडळ (३३-१८)

 

ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब (ठाणे) विजयी विरुद्ध हीड इंडिया निवारा (४७-२१)

 

स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध जॉयकुमार स्पोर्ट्स क्लब (ठाणे) (३८-१५)

 

पुरुष गटातील जोरदार टक्कर!

पुरुष गटातील सामन्यांमध्येही प्रेक्षकांनी रोमहर्षक क्षणांचा अनुभव घेतला:

 

चेंबूर क्रीडा केंद्र (मुंबई उपनगर) ने ठाण्याच्या आत्माराम क्रीडा मंडळावर १० गुणांनी विजय मिळवला. कुणाल पवार व आकाश कदम यांच्या धारदार चढाया आणि शुभम घारेच्या पक्कड्यांमुळे हा विजय शक्य झाला.

 

वीर परशुराम कबड्डी संघाने ठाण्याच्या उजाला क्रीडा मंडळावर केवळ २ गुणांनी निखालस विजय मिळवत पुढचा टप्पा गाठला. सामन्याच्या अखेरच्या क्षणात निखिलेश गावडेच्या निर्णायक चढायांनी संघाला विजय मिळवून दिला.

 

अन्य निकाल:

श्री समर्थ क्रीडा मंडळ (कालावार ठाणे) विजयी विरुद्ध दत्त सेवा संघ (मुंबई उपनगर) (३५-२५)

 

सतेज संघ (बाणेर पुणे) विजयी विरुद्ध उत्कर्ष क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर) (३२-२०)

 

विशेष सन्मान आणि गौरव सोहळा

स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी अर्जुन पुरस्कार विजेते सदानंद शेट्ये, माया आक्रे, छत्रपती पुरस्कार प्राप्त मीननाथ धानजी, मीनल सावंत, ज्येष्ठ पत्रकार नवनाथ दांडेकर, सुनील सकपाळ, कबड्डी संघटक शशी राऊत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

दिवसाचे सर्वोत्तम खेळाडू

महिला गट : वैष्णवी साळुंखे (ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब, ठाणे)


पुरुष गट : शार्दूल पाटील (गुडमॉर्निंग स्पोर्ट्स क्लब, मुंबई शहर)

 


Post a Comment

0 Comments