Type Here to Get Search Results !

टायगर हिल विजयाची पावले! फिटिस्तानचे 'कारगिल टायगर हिल स्टेप चॅलेंज २०२५' — ७० कोटी पावलांचे भव्य लक्ष्य


 

टायगर हिल विजयाची पावले! फिटिस्तानचे 'कारगिल टायगर हिल स्टेप चॅलेंज २०२५' — ७० कोटी पावलांचे भव्य लक्ष्य

 

मुंबई, शौर्य, श्रद्धा आणि स्वास्थ्याचा संगम साधणाऱ्या कारगिल टायगर हिल स्टेप चॅलेंज २०२५’ साठी फिटिस्तान या संस्थेने यंदा तब्बल ७० कोटी पावलांचे लक्ष्य जाहीर केले आहे. ३ मे ते २६ जुलै या ८५ दिवसांच्या कालावधीत भारतभरातील नागरिकांनी चालणे किंवा धावणे या माध्यमातून योगदान द्यावे, असा उत्साही उपक्रम साकारण्यात येत आहे.

 

१९९९ मध्ये कारगिल युद्धात शहीद झालेल्या ५२७ वीर सैनिकांच्या सन्मानार्थ आणि लोकांमध्ये निरोगी जीवनशैलीची प्रेरणा निर्माण करण्यासाठी या चॅलेंजचे आयोजन केले जाते. हा उपक्रम केवळ आरोग्यासाठी नव्हे तर देशप्रेमाच्या ठेचांनी भरलेला एक सामाजिक आणि सांस्कृतिक समर्पण आहे.

 

गेल्या वर्षी १६ हजार सहभागींच्या जोडीने ४२ कोटी पावले नोंदवली गेली होती. यंदा ही संख्या दुप्पट होण्याची अपेक्षा फिटिस्तानचे संस्थापक मेजर सुरेंद्र पूना यांनी व्यक्त केली.

 

मिस इंडिया वर्ल्ड २०१३ आणि फिटिस्तानच्या सह-संस्थापक शिल्पा भगत म्हणाल्या, “या स्टेप चॅलेंजच्या माध्यमातून आम्ही केवळ शरीर नव्हे, तर हृदयालाही संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करतोय. दररोज थोडं चालणं — आरोग्यासाठी आणि देशासाठीही!”

 

एसबीआयच्या सुरक्षा विभागाचे ब्रिगेडियर (निवृत्त) प्रवीण शिंदे यांनी सांगितले की, बँकेच्या सर्व १७ सर्कल्समध्ये यंदा सहभागी होण्याचे नियोजन असून, हा उपक्रम खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्तरावर पोहोचतो आहे.

 

यावर्षीच्या चॅलेंजमध्ये व्यक्तींना दररोज किंवा केवळ एका दिवशी सहभाग घेता येणार आहे. फिटिस्तान अॅपवर नोंदणी सतत खुली राहणार आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही २६ जुलै – कारगिल विजय दिवस हा दिवस १५००० पावलांच्या लक्ष्याने साजरा केला जाणार आहे.


Post a Comment

0 Comments