वासू परांजपेंची विनोदी बुद्धी म्हणजे क्रिकेटमधील एक अनमोल
ठेवा – दिलीप वेंगसरकर
स्पोर्ट्स फील्ड क्रिकेट क्लबचे
थरारक विजेतेपद, अर्णव शेलार सामनावीर
मुंबई, १२ एप्रिल : “वासू परांजपे यांच्या तल्लख विनोदी बुद्धीचा उपयोग ते
खेळाडूंच्या मनोबल वाढवण्यासाठी फार कुशलतेने करत असत. त्यांचं मार्गदर्शन
खेळाडूंना हसत खेळत प्रेरणा देणारे असायचं,” असे गौरवोद्गार भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी काढले.
दादर युनियन, माटुंगा येथे झालेल्या १३ वर्षाखालील पहिल्या वासू परांजपे
कप स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. वेंगसरकर म्हणाले, “अलीकडे काही प्रशिक्षक मोठ्याने ओरडून तर कधी रागवून युवा
खेळाडूंना शिकवण्याचा प्रयत्न करतात, पण वासू परांजपे यांनी संवेदनशीलतेने आणि हास्य-विनोदातून
खेळाडूंना प्रेरित केले, हा त्यांचा विशेष गुण होता.”
कार्यक्रमात वासू परांजपे यांच्या पत्नी ललिताजी परांजपे
यांनी विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली,
तर वासूंचे जिवलग सहकारी श्रीधर मांडले यांचीही उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
अंतिम फेरीत स्पोर्ट्स फील्ड सीसीचा थरारक विजय!
दादर युनियन मैदानावर पार पडलेल्या अंतिम सामन्यात
स्पोर्ट्स फील्ड क्रिकेट क्लबने
पटेल क्रिकेट क्लबचा अवघ्या ७ धावांनी पराभव करत चुरशीचा विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना स्पोर्ट्स फील्डने
३२.४ षटकांत १४८ धावा
केल्या. अर्णव शेलार (नाबाद ३७),
अमर बी.के. (३२), विराज जाधव (२३), आणि अरिश खान (१६) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
प्रतिस्पर्धी संघाकडून आदित्य पांडे (३/१८), अंश गुप्ता (३/२४) आणि अनुज सिंग (२/१९) यांनी अचूक मारा
केला.
१४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पटेल सी.सी. संघाने
चांगली झुंज दिली. आरव यादव (५३) आणि शिवम यादव (नाबाद २८) यांच्या खेळीमुळे सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. मात्र
अर्जुन जाधव (२/१६) आणि सुरज केवट
(२/१८) यांनी निर्णायक टप्प्यावर विकेट्स घेत स्पोर्ट्स फील्डचा विजय निश्चित केला.
अंतिम सामनावीर म्हणून अर्णव शेलार
याची निवड झाली.
स्पर्धेतील इतर गौरव :
सर्वोत्तम खेळाडू: आरव यादव (१५९ धावा, ४ बळी, ३ झेल, २ धावचीत) – पटेल सी.सी.
सर्वोत्तम फलंदाज: सिद्धार्थ भोसले (१८८ धावा) – न्यू हिंद
सर्वोत्तम गोलंदाज: अनुज सिंग (८ बळी) – पटेल सी.सी.
सर्वोत्तम क्षेत्ररक्षक: अद्वैत तिवारी – स्पोर्ट्स फील्ड सी.सी.
संक्षिप्त धावफलक :
स्पोर्ट्स फील्ड सी.सी. – १४८/१० (३२.४ षट.), (अर्णव शेलार नाबाद ३७, अमर बी.के. ३२; आदित्य पांडे ३/१८, अंश गुप्ता ३/२४)
पटेल सी.सी. –
१४१/१० (३४.५ षट.), (आरव यादव ५३, शिवम यादव नाबाद २८; अर्जुन जाधव २/१६, सुरज केवट २/१८)
सामनावीर – अर्णव शेलार

Post a Comment
0 Comments