Type Here to Get Search Results !

श्री मावळी मंडळाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पुरुष गटात सतेज, स्वस्तिक, चेंबूर व शिव शंकर संघांची उपांत्य फेरीत दमदार मजल

 


श्री मावळी मंडळाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

पुरुष गटात सतेज, स्वस्तिक, चेंबूर व शिव शंकर संघांची उपांत्य फेरीत दमदार मजल

 

ठाणेराज्यातील क्रीडारसिकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आणि श्री मावळी मंडळाच्या शताब्दी वर्ष व १०० व्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित ७२ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी रंगलेल्या सामन्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली. पुरुष गटात सतेज (पुणे), स्वस्तिक (मुंबई उपनगर), चेंबूर क्रीडा केंद्र (मुंबई उपनगर) आणि शिव शंकर क्रीडा मंडळ (ठाणे) यांनी दमदार खेळ सादर करत उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली. महिला गटात होतकरू मित्र मंडळ (ठाणे), डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर), शिवशक्ती महिला संघ (मुंबई शहर व धुळे) यांनी उपांत्य फेरी गाठली.

 

पुरुष गटातील सामन्यांचा आढावा :

पुरुष गटातील पहिल्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात पुण्याच्या सतेज संघाने मुंबई शहरच्या जयभारत क्रीडा मंडळाचा ४९-२४ असा आरामात पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. या सामन्यात जयभारत क्रीडा मंडळाने सतेज संघावर पहिल्या ५ मिनिटातच लोन टाकत अतिशय आक्रमक सुरुवात केली. परंतु पहिल्या लोननंतर सतेज संघाच्या पृथ्वीराज शिंदे व आदित्य गोरे यांनी खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या भराभर वाढवली. मध्यंतराला  २०-१४ अशी १४ गुणांची आघाडी सतेजकडे होती. शिंदे-गोरे यांना अक्षय जाधवने सुरेख पक्कडी करुन चांगली साथ दिली. पराभूत संघाच्या अनिकेत मिटलेची लढत एकाकी ठरली.

 


पुरुष गटातील दुसऱ्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या चेंबूर क्रीडा केंद्राने ठाण्याच्या श्री समर्थ क्रीडा मंडळाचा चुरशीच्या लढतीत ३६-३१ असा ५ गुणांनी पराभव करुन उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात आकाश कदम व कुणाल पवार ह्यांच्या धमाकेदार चढायांमुळे चेंबूर क्रीडा केंद्राने  मध्यन्तराला ९ गुणांची आघाडी घेतली होती.  तिचं निर्णायक ठरली. मध्यन्तरानंतर  श्री समर्थ क्रीडा मंडळाच्या प्रणित पाटीलने खोलवर चढाया करुन बरेच गुण मिळवले. परंतु त्याला इतर खेळाडूंची साथ न मिळाल्यामुळे श्री समर्थ क्रीडा मंडळाने हा सामना गमावला.

 

स्वस्तिक क्रीडा मंडळाने श्री शिवाजी उदय मंडळ (पुणे) संघावर ४२-१८ असा एकतर्फी विजय मिळवला.

 

शिव शंकर क्रीडा मंडळाने बंड्या मारुती सेवा मंडळाला ३६-३२ अशा चुरशीच्या लढतीत पराभूत केले.

 

महिला गटातील संघर्ष :

महिला विभागात पहिल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात धुळ्याच्या शिवशक्ती महिला संघाने ठाण्याच्या ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब संघाचा अटीतटीच्या सामन्यात २९-२७ असा २ गुणांनी पराभव केला. या सामन्यात शिवशक्ती महिला संघाच्या विद्या डोलताडे, प्रज्ञा बाबर यांनी सामन्याच्या पहिल्या चढाईपासून आक्रमक चढाया करीत मध्यन्तरापर्यंत आपल्या संघाला ९ गुणांची आघाडी मिळवून दिली. विश्रांती नंतर ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब संघाच्या  वैष्णवी साळुंखेने शानदार चढाया करुन आपल्या संघाची गुणसंख्या भराभर वाढवू सामन्यात रंगत आणली. सामन्यातील शेवटचे १ मिनिट शिल्लक असताना शिवशक्ती महिला संघाने वैष्णवी साळुंखेची पक्कड करुन हा सामना २ गुणांनी जिंकला.

 


दुसऱ्या सामन्यात ठाण्याच्या होतकरू मित्र मंडळाने मुंबई उपनगरच्या आकाश स्पोर्ट्स क्लब संघाचा २८-२० असा सहज पराभव करुन उपांत्य फेरी गाठली. विजयी संघाच्या ऐश्वर्या राऊत व रिया पारकर यांच्या तुफानी चढायांमुळे  मध्यंतराला होतकरू मित्र मंडळाने ९ गुणांची आघाडी घेतली होती. होतकरूच्या नंदिनी बईतने सुरेख पकडी केल्या. पराभूत संघाकडून धनश्री कोकाटे छान खेळली.

 


डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबने जय भारत स्पोर्ट्स क्लबला ५१-१९ तर शिवशक्ती (मुंबई शहर) संघाने जय अंबे क्रीडा मंडळाला ४४-६ अशा भेदक फरकाने पराभूत केलं.

 

मान्यवरांचा गौरव :

स्पर्धेच्या चौथ्या दिवशी खेळ क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेल्या जीवनगौरव पुरस्कारप्राप्त शकुंतला खटावकर, अर्जुन पुरस्कार प्राप्त मोनिका नाथ-बाक्रे, छत्रपती पुरस्कार प्राप्त चित्रा नाबर, प्रताप शेट्टी, राजेश पाडावे, कृष्णकुमार कोळी, जिजामाता पुरस्कार प्राप्त सुषमा सहस्रबुद्धे, राष्ट्रीय खेळाडू वासंती बोर्डे, भूषण पाटील, अशोक कोळी आदींचा विशेष सन्मान करण्यात आला. या गौरवाने स्पर्धेला एक वेगळीच सांस्कृतिक उंची प्राप्त झाली.


Post a Comment

0 Comments