Type Here to Get Search Results !

संधीचा लाभ न घेतल्यास जबाबदारी तुमचीच – वेंगसरकर यांचा तरुण खेळाडूंना संदेश ड्रीम ११ कप – १२ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचा जल्लोष, गणेश पालकर क्रिकेट क्लब अजिंक्य


संधीचा लाभ न घेतल्यास जबाबदारी तुमचीच – वेंगसरकर यांचा तरुण खेळाडूंना संदेश

ड्रीम ११ कप – १२ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचा जल्लोष, गणेश पालकर क्रिकेट क्लब अजिंक्य

 

मुंबई : मिळालेल्या संधीचं सोनं करा, नाहीतर पराभवासाठी इतरांना दोष देता येणार नाही. यासाठी तुम्हीच जबाबदार असाल,असा स्पष्ट संदेश भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी तरुण खेळाडूंना दिला. ओव्हल मैदान, चर्चगेट येथे पार पडलेल्या ड्रीम ११ कप १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.

 

वेंगसरकर क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित या स्पर्धेमुळे खेळाडूंना कौशल्य दाखविण्याची संधी मिळते आणि या संधीचे सोने करणे प्रत्येक खेळाडूच्या हातात असते, असे ते म्हणाले. यावेळी माजी क्रिकेटपटू मेहेरनोश दारूवाला यांनी पारंपरिक लाल चेंडूच्या क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.

 

गणेश पालकर क्रिकेट क्लबचा शानदार विजय

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गणेश पालकर क्रिकेट क्लबने गोएंका असोसिएट्स एजुकेशनल ट्रस्ट संघाचा ८ गडी राखून पराभव केला.

गोएंका संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ ८१ धावांत गारद झाला. आदित्य जरे (३ बळी), वरद गोवारी (२ बळी) आणि झैब शेख (२ बळी) यांच्या अचूक माऱ्यापुढे विरोधी संघ टिकू शकला नाही.

 

वेद पावणेकर (२९), लीला संघवी (२३) आणि मानस कारखानीस (नाबाद १२) यांच्या दमदार खेळीने गणेश पालकर क्रिकेट क्लबने १६.३ षटकांतच लक्ष्य गाठले आणि स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

 

उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव

सामनावीर : आदित्य जरे (१० धावांत ३ बळी)

स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज : आदित्य जरे (९ बळी)

सर्वोत्तम फलंदाज व खेळाडू : रुद्र पाबळे – पटेल C.C. (३ डावांत २१७ धावा)

सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : अर्जुन खेडकर – वेंगसरकर अकादमी, माहुल

 

स्पर्धेतील विजेत्यांना वेंगसरकर, दारूवाला, मनोज जोगळेकर आणि ड्रीम स्पोर्ट्सचे प्रशांत तायडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 

फोटो ओळ :

ओव्हल मैदान, चर्चगेट येथे झालेल्या ड्रीम ११ कप क्रिकेट स्पर्धेत विजेते ठरलेल्या गणेश पालकर क्रिकेट क्लब संघाचे छायाचित्र. सोबत दिलीप वेंगसरकर, मेहेरनोश दारूवाला, मनोज जोगळेकर, प्रशांत तायडे आणि प्रशिक्षक अमित जाधव यांचा मनमोहक क्षण.


Post a Comment

0 Comments