४थी फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा – अमरावती,
२०२५
महाराष्ट्राची झुंज
थरारक पण व्यर्थ; रेल्वेला रोखले, तरी स्वप्नभंग!
अमरावती : “शेवटपर्यंत झुंज दिली पण विजय नजरेसमरून निसटला!”
हे महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचे वर्णन ठरेल.
७१व्या राष्ट्रीय कबड्डी
स्पर्धेतील उपविजेता भारतीय रेल्वे संघ बरोबरचा सामना ३६-३६ अशा बरोबरीत राखत महाराष्ट्राने ताकदीची झलक दाखवली. पण
राजस्थानकडून झालेल्या नाट्यमय पराभवामुळे
महाराष्ट्राचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.
संत गाडगे महाराज समाधी मंदिर मैदानावर रात्री उशीरा
रंगलेला हा ब गटातील सामना चुरशीचा ठरला. पहिल्या सत्रात महाराष्ट्र २०-२१ अशा पिछाडीवर असतानाही
दुसऱ्या सत्रात त्यांनी ताकदीची मुसंडी मारली आणि शेवटच्या क्षणापर्यंत दोन
गुणांनी आघाडी घेतली. पण शेवटच्या मिनिटात संयम ढळल्यामुळे बरोबरीवर समाधान मानावे
लागले.
चढाया-पकडींचा झंझावात:
आदित्य शिंदे व शिवम पठारे यांच्या कल्पक चढाया
संघनायक संकेत सावंत याची भक्कम पकड, या त्रयीने रेल्वेसमोर धडाडीचे आव्हान उभे
केले होते.
पुन्हा तीच जुनी चूक:
राजस्थानविरुद्धच्या सामन्यातही महाराष्ट्राने
१० गुणांची आघाडी गमावून पराभव पत्करला होता. तोच संयमाचा अभाव आणि शेवटच्या क्षणाची निष्काळजीपणा
पुन्हा डोकावला, आणि उपांत्य फेरीचे स्वप्न धूसर झाले.
विदर्भवर गाजवलेली विजयश्री:
या आधीच्या सामन्यात महाराष्ट्राने यजमान विदर्भ संघावर
४७-१६ अशी दणदणीत मात केली होती. शिवम पठारे व संकेत सावंतच्या जोडीने रक्षण व आक्रमणात
तडाखा दिला होता.
भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने व विदर्भ कबड्डी
असोसिएशनच्या आयोजनात ही स्पर्धा रंगली असून, महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलेला झुंजार खेळ
भविष्यकाळासाठी आशादायक मानला जात आहे.

Post a Comment
0 Comments