४थी फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा,
अमरावती
महाराष्ट्राच्या पुरुषांना संमिश्र यश!
अमरावती : संत गाडगेबाबा समाधी मैदानावर आजपासून रंगलेल्या
४थ्या फेडरेशन कप पुरुष व महिला गट
कबड्डी स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली असून, महाराष्ट्राच्या पुरुष संघाने आपल्या मोहीमेची सुरूवात
संमिश्र यशाने केली आहे. राजस्थानकडून अवघ्या दोन गुणांनी झालेल्या पराभवानंतर,
महाराष्ट्राने पंजाबवर
मोठा विजय मिळवत बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
पहिल्या सामन्यात निसटता पराभव – संयम गमावल्याची किंमत!
उद्घाटनाच्या सामन्यात महाराष्ट्राने आक्रमक सुरुवात करत
पहिल्याच डावात राजस्थानला लोण दिला आणि २५-१२ अशी भक्कम आघाडी मिळवली.
विश्रांतीला ही आघाडी २५-१६ अशी कायम होती. मात्र दुसऱ्या डावात राजस्थानने जोरदार
पुनरागमन केले. शेवटच्या काही मिनिटांत ३८-३८ अशी बरोबरी निर्माण झाली. अखेर संयम
गमावल्यामुळे महाराष्ट्राला ४०-४२ असा निसटता पराभव पत्करावा लागला.
महाराष्ट्राकडून आदित्य शिंदे व जयेश महाजन यांची झुंजार खेळी सुद्धा पराभव टाळू शकली नाही.
दुसऱ्या सामन्यात पंजाबवर दणदणीत विजय!
पराभवाच्या धक्क्यातून सावरत महाराष्ट्राने दुसऱ्या
सामन्यात पंजाबला ५८-३३ असे चकवले. नुकत्याच पार पडलेल्या ७१व्या राष्ट्रीय स्पर्धेत पंजाबकडून
झालेल्या पराभवाची ही महाराष्ट्राने चोख परतफेड केली. पहिल्या डावात २२-१६ अशी
आघाडी घेत सावध सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या डावात महाराष्ट्र आक्रमक झाला. अक्षय
सूर्यवंशी याच्या धारदार चढाया, तसेच संकेत सावंत व ऋषिकेश बनकर यांच्या भक्कम बचावामुळे हा दणदणीत विजय शक्य झाला.
महाराष्ट्र ब गटात - आव्हान अजूनही खुले
महाराष्ट्राचा समावेश ‘ब’ गटात असून,
या गटात रेल्वे, राजस्थान, पंजाब आणि विदर्भ हे संघही आहेत. दुसऱ्या विजयामुळे महाराष्ट्राच्या बाद
फेरीतील प्रवेशाच्या आशा उंचावल्या आहेत.
कबड्डीच्या रिंगणात महाराष्ट्राची पुनरागमनाची तयारी झालेली
आहे – आता नजर आहे पुढच्या निर्णायक सामन्यांवर!

Post a Comment
0 Comments