Type Here to Get Search Results !

खेलो इंडिया युथ गेम्स, बिहार २०२५ महाराष्ट्राचा संघ रवाना – पदकांसाठी सज्ज!

 


खेलो इंडिया युथ गेम्स, बिहार २०२५
महाराष्ट्राचा संघ रवाना – पदकांसाठी सज्ज!

 

पुणे : देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या युवा क्रीडा स्पर्धेच्या सातव्या पर्वासाठी खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ ला ४ मेपासून बिहारमध्ये भव्य सुरुवात होणार आहे. यासाठी महाराष्ट्राचा संघ विमान प्रवासाने पहिल्या टप्प्यात पटनाकडे रवाना झाला असून, मैदानात उतरल्यावर ‘जय महाराष्ट्र’चा जयजयकार दुमदुमणार, असा आत्मविश्वास क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी व्यक्त केला.

 

महाराष्ट्राचं 'विमान' आत्मविश्वासाचं!

महाराष्ट्राने कायमच खेलो इंडिया स्पर्धेत आपल्या खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा देण्याचा ध्यास घेतला आहे. याच परंपरेनुसार विमान प्रवासाची सोय करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. यंदाही विमान खर्च जास्त असतानाही शासनाने अतिरिक्त निधी मंजूर करून खेळाडूंना दिलेला प्राधान्यक्रम अधोरेखित केला आहे.

 

विविध खेळांतील १९० खेळाडू रवाना

महाराष्ट्राच्या एकूण ५६५ जणांच्या पथकातील १९० खेळाडू (प्रशिक्षक, व्यवस्थापकांसह) पहिल्या टप्प्यात आर्चरी, कबड्डी, गटका, ज्यूदो, मल्लखांब, जलतरण, खो-खो, सेपकटकरा यांसारख्या खेळांसाठी रवाना झाले आहेत.


पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात कसून सराव केलेल्या या खेळाडूंना सहसंचालक सुधीर मोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पथकप्रमुख महादेव कसगावडे, सहाय्यक संचालक चंद्रशेखर साखरे, क्रीडाधिकारी विकास माने, अरुण पाटील व गीता साखरे उपस्थित होते.

 

पदक जिंकण्याचा निर्धार

"सहा पर्वांपैकी चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या महाराष्ट्राने गतवर्षी तामिळनाडूत १५८ पदकांसह निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. यंदा देखील केवळ विजेतेपद राखण्याचा नव्हे तर अधिकाधिक पदकं मिळवण्याचा निर्धार करून खेळाडू मैदानात उतरतील," असा विश्वास पथकप्रमुख महादेव कसगावडे यांनी व्यक्त केला.

 

पुढील टप्पे आणि दिल्लीतील स्पर्धा

पुण्यात सध्या हॉकी, बॅडमिंटन, टेबलटेनिस, टेनिस, रग्बी व सायकलिंग शिबिरे सुरू आहेत. शेवटच्या टप्प्यात अ‍ॅथलेटिक्स संघ रवाना होणार आहे. दिल्ली येथे नेमबाजी, जिम्नॅस्टिक्स आणि सायकलिंगच्या स्पर्धा रंगणार आहेत. नेमबाजीसाठी महाराष्ट्राचा १३ खेळाडूंचा संघ ५ मे रोजी रवाना होईल.

 

छायाचित्र ओळ: आर्चरी संघाला शुभेच्छा देताना सहसंचालक सुधीर मोरे. सोबत पथकप्रमुख महादेव कसगावडे, क्रीडाधिकारी विकास माने व अरुण पाटील.


Post a Comment

0 Comments