Type Here to Get Search Results !

मल्लखांबमध्ये महाराष्ट्राची सलग सातवे पदक! खेलो इंडिया स्पर्धेत सांघिक गटात रूपेरी यश


 

मल्लखांबमध्ये महाराष्ट्राची सलग सातवे पदक!

खेलो इंडिया स्पर्धेत सांघिक गटात रूपेरी यश


गया : मल्लखांब या पारंपरिक आणि साहसी खेळात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपली छाप सोडत खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या रंगमंचावर रूपेरी झळाळी मिळवली आहे. मुलांच्या सांघिक गटात महाराष्ट्राच्या संघाने तब्बल १२२.५० गुणांची कमाई करत चुरशीच्या लढतीत रौप्यपदकावर नाव कोरले, आणि या प्रकारात सलग सातव्या वर्षी पदक जिंकण्याचा पराक्रम साधला.

 

गया येथील आयआयएम  संस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या या सांघिक स्पर्धेत महाराष्ट्राने छत्तीसगडवर केवळ ०.४५ गुणांची आघाडी घेत दुसरे स्थान पटकावले. मध्यप्रदेशने १२३.६० गुणांसह सुवर्ण, तर छत्तीसगडने १२२.०५ गुणांसह कांस्यपदक मिळवले.

 

महाराष्ट्राच्या संघात आयुष काळंगे, निशांत लोखंडे, ओम गाढवे, निरंजन अमृते, आर्यन आबोडकर आणि प्रज्ञेश तावडे यांचा समावेश होता. या सर्वांनी सांघिक मल्लखांबच्या तिन्ही प्रकारांमध्ये नेत्रदीपक प्रदर्शन करत महाराष्ट्रासाठी पदक निश्चित केले.

 

दरम्यान, मुलींच्या गटातही महाराष्ट्राच्या मल्लखांबपटूंनी आश्वासक खेळी करत पदकाच्या दिशेने ठोस पावले टाकली आहेत. तनश्री जाधव, आर्या साळुंके, सई शिंदे, तन्वी दवणे, हदया दळवी व हिरण्या कदम यांनी दोरीवरच्या मल्लखांबात सादर केलेल्या अचूक आणि थरारक प्रात्यक्षिकांमुळे महाराष्ट्राने आघाडी कायम राखली आहे.

 

महाराष्ट्राच्या या सातत्यपूर्ण यशामुळे राज्यातील मल्लखांब चळवळीस नवे बळ मिळाले असून, या पारंपरिक खेळातील मराठमोळ्या ताकदीची पुन्हा एकदा देशभर दखल घेतली जात आहे.

 

Post a Comment

0 Comments