जलतरणात महाराष्ट्राचा 'सुवर्ण' ठसा! – खेलो इंडिया युवा स्पर्धेत २९ पदकांसह उपविजेतेपदाची
चमक
गया (बिहार) : ७व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत
महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी पाण्यावर जलवा दाखवत २९ पदकांची कमाई करत जलतरण
प्रकारात सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. ७ सुवर्ण, ७ रौप्य आणि १५ कांस्य पदकांसह महाराष्ट्राने आपली दमदार
उपस्थिती नोंदवली, तर मुलींच्या
गटात कर्नाटकसोबत संयुक्त विजेतेपद मिळवत इतिहास रचला.
बिपार्ड जलतरण तलावावर पार पडलेल्या स्पर्धेत,
मुलांच्या गटात कर्नाटकने १३६ गुणांसह वर्चस्व राखले,
तर महाराष्ट्राने ६५ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला. आंध्र
प्रदेशने ६४ गुणांसह तिसरे स्थान घेतले. मुलींच्या गटात मात्र महाराष्ट्र व
कर्नाटक या दोघींनी प्रत्येकी १५६ गुणांची कमाई करत संयुक्त विजेतेपदावर कब्जा केला.
अखेरच्या दिवसाचा ‘शो स्टॉपर’ ठरली शनाया शेट्टी. तिने ३४.६७ सेकंद वेळेत शानदार जलतरण करत महाराष्ट्राला
दिवसातील एकमेव सुवर्णपदक मिळवून दिले. कर्नाटकच्या मानवी वर्मा आणि विहिथा
लोगनाथन यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पटकावले.
आदिती हेगडे हिनेही आपल्या जबरदस्त कामगिरीने चाहत्यांचे मन जिंकले. ४
सुवर्ण व १ रौप्यपदकानंतर अखेरच्या दिवशी कांस्य मिळवत तिने 'षटकार' लगावला!
२०० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात धरीती अहिररावने रौप्य (२:३३.१४ मिनिटे) आणि निर्मयी
आंबेटकरने कांस्य (२:२५.२१ मिनिटे) जिंकले. तमिळनाडूच्या रोशिनी बाळसुब्रमनियनने
२:२२.९७ मिनिटे वेळेत सुवर्ण मिळवले.
५० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात,
श्रीलेखा पारीक (२७.३९ सेकंद) आणि अल्फेया धनसुरा (२७.४१
सेकंद) यांनी रौप्य व कांस्य जिंकले. कर्नाटकच्या ऋजुला एसने २७.१२ सेकंद वेळेसह
सुवर्ण पटकावले.
१५०० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात आदिती हेगडेने पुन्हा बाजी मारत १८:२२.९७ वेळेत कांस्य
पटकावले. या प्रकारात कर्नाटकच्या आदिती मुळे (१८:०४.३९) व श्री चरणी तमू
(१८:१९.२९) यांनी सुवर्ण व रौप्य जिंकले.
एकूणच महाराष्ट्राच्या जलतरण संघाने बिहारच्या पाण्यातही
आपला वेग, संयम आणि कौशल्य सिद्ध करत पदकांचा पाऊस पाडला. तरुण
जलतरणपटूंनी दाखवलेली ही जिद्द आणि क्षमता भविष्यातील आंतरराष्ट्रीय यशाची ठोस
नांदी ठरेल, यात शंका नाही!

Post a Comment
0 Comments