खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२५ : मल्लखांबात निशांतचे
सुवर्ण झळकले, गटका खेळात महाराष्ट्राला ऐतिहासिक रौप्य!
देशी खेळांमध्ये महाराष्ट्राचा दबदबा कायम,
पदकांची हॅट्ट्रिक
पूर्ण
गया (बिहार) – सातव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने देशी
खेळांमध्ये आपला दबदबा ठासून दाखवला. मल्लखांबात निशांत लोखंडेने सुवर्णपदक जिंकत
महाराष्ट्रासाठी सुवर्णाचे खाते उघडले, तर गटका या पारंपरिक खेळातही मुलींच्या संघाने प्रथमच रौप्य
पदक पटकावत इतिहास रचला.
मल्लखांबात मराठमोळा झेंडा डौलाने फडकला.
टांगता मल्लखांब प्रकारात मुंबईच्या निशांत लोखंडेने ८.५० गुण मिळवत सुवर्ण पदक
जिंकले. वैयक्तिक सर्वसाधारण गटातही निशांतने २५ गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली.
याशिवाय,
सांघिक गटात त्याने रौप्यपदकही पटकावले. या तिहेरी यशामुळे
निशांतने स्पर्धेत पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली.
मुलींच्या गटातही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सरस कामगिरी
केली. आर्या
साळुंकेने वैयक्तिक रौप्य तर तनश्री जाधवने कांस्यपदक पटकावले. या दोघींनी सांघिक गटात तन्वी दवणे,
सई शिंदे, हदया दळवी व हिरण्या कदम यांच्या सोबतीने
रौप्यपदकाची कमाई केली.
गटका खेळात महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी!
पंजाबमधील पारंपरिक गटका खेळात यंदा महाराष्ट्राने अखेर
आपली छाप सोडली. मुलींच्या सांघिक प्रकारात सेजल गालिंदे, तन्मयी पाटील व श्रमिका पाटील यांच्या नेतृत्वाखालील
महाराष्ट्र संघाने रौप्य पदक जिंकले. मध्यप्रदेश व तामिळनाडूसारख्या बलाढ्य संघांवर दणदणीत विजय
मिळवल्यानंतर अंतिम सामन्यात झारखंडकडून पराभव पत्करावा लागला. मात्र,
सेजलने हात सुजलेला असतानाही खेळणे सुरू ठेवत
संघासाठी पराकाष्ठा केली.
या यशामागे आरती चौधरी, मंथन पवार व आकाश थोरात यांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले.
खेलो इंडियामध्ये गटका खेळातील हे
महाराष्ट्राचे पहिले पदक ठरले.
मराठमोळ्या खेळाडूंच्या या जबरदस्त कामगिरीमुळे
महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा स्पर्धेत देशी खेळांमध्ये आपली बाजू भक्कम केली
आहे.



Post a Comment
0 Comments