Type Here to Get Search Results !

मनमाडच्या आकांक्षाचे सुवर्ण ‘लिफ्ट’ – ठाण्याच्या वेदिकाचे कांस्य तेज! खेलो इंडिया युवा स्पर्धा, बिहार २०२५ मध्ये महाराष्ट्राची दमदार कामगिरी

 


मनमाडच्या आकांक्षाचे सुवर्ण ‘लिफ्ट’ – ठाण्याच्या वेदिकाचे कांस्य तेज!
खेलो इंडिया युवा स्पर्धा, बिहार २०२५ मध्ये महाराष्ट्राची दमदार कामगिरी

 

राजगीर (बिहार) : राजगीरच्या मैदानात महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने फडकला! ७व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत मनमाडच्या आकांक्षा व्यवहारेने वेटलिफ्टिंगच्या ४५ किलो गटात सुवर्णपदक पटकावत संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उज्वल केले. तर ठाण्याच्या वेदिका टोळेने कांस्य पदकाची चमक गाठली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दिलेला हा झंझावात पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा वर्षाव केला.

 

स्नॅचमध्ये ६८ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ८० किलो असा एकूण १४८ किलो वजन उचलत आकांक्षाने निर्विवादपणे आपले वर्चस्व सिद्ध केले. विशेष म्हणजे, गतवर्षी दुखापतीमुळे चौथ्या स्थानी समाधान मानावे लागलेल्या आकांक्षाने या वर्षी जबरदस्त पुनरागमन करत सुवर्णपदक आपल्या झोळीत टाकले. यापूर्वी २०२३ च्या मध्यप्रदेश स्पर्धेतही तिने सुवर्ण पटकावले होते.

 


वेदिका टोळेनेही आपल्या सशक्त कामगिरीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. स्नॅचमध्ये ६० किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ७० किलोचा प्रयत्न करत तिने १२७ गुणांची कमाई केली आणि कांस्य पदक पटकावले. केवळ १ गुणांनी तिचे रौप्यपदक हुकले, पण तिच्या जिद्दीला सर्वांनी दाद दिली. पंजाबच्या लव्हजोत कौरने १२८ गुणांसह दुसरे स्थान पटकावले.

 

मनमाडच्या जय भवानी व्यायामशाळेत सराव करणारी आकांक्षा ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारी खेळाडू आहे. तिच्या मार्गदर्शक प्रवीण व्यवहारे यांच्या प्रशिक्षणाखाली तीने १९ वर्षांखालील राष्ट्रकुल स्पर्धेतही पदक मिळवले आहे. “माझं अंतिम ध्येय ऑलिम्पिक सुवर्णपदक आहे,” असं आत्मविश्वासाने आकांक्षाने सांगितलं.

 

यशाची ही परंपरा आकांक्षाच्या कुटुंबीयांनी अखंड राखली आहे – कारण गेल्या वर्षी तिच्या भावानेही खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.

 

वेदिकाच्या यशामागेही मजबूत कुटुंबीय पार्श्वभूमी आहे. तिचे आई-वडील – दोघेही वेटलिफ्टर, तर आई मधुरा सिंहासने ही सांगलीची राष्ट्रीय विजेती खेळाडू. “माझ्या आवडीसाठी मी हा खेळ निवडला आणि हे पदक म्हणजे माझ्यासाठी बोनस आहे,” असं वेदिकाने आनंदाने सांगितलं.

 

राजगीरच्या मंचावर महाराष्ट्राच्या ‘शक्ती’चा जलवा अनुभवायला मिळाला आणि खेळातील या उभारत्या ताऱ्यांनी राज्याच्या शौर्यगाथेत नवे सुवर्णपान जोडले!


Post a Comment

0 Comments