महाराष्ट्राची खेलो इंडिया स्पर्धेत वर्चस्व गाजवत
सुवर्णाची दमदार वाटचाल!
तिरंदाजीत पदकांचा
‘षटकार’, मल्लखांबमध्ये
आघाडी, खोखोमध्ये
विजयाचे रणशिंग
भागलपूर/गया (बिहार): ७व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी
प्रचंड ताकदीने आपली छाप पाडताना सुवर्णपदकांची जोरदार घोडदौड सुरू केली आहे.
तिरंदाजी,
मल्लखांब आणि खोखो या प्रमुख खेळप्रकारांमध्ये
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कौशल्याचा झंझावात निर्माण केला आहे.
तिरंदाजी – सात पैकी सहा पदके निश्चित!
भागलपूरमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी स्पर्धेत
महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी विजयाची तोफ डागली आहे. मुलींच्या कम्पाऊंड प्रकारात
तेजल साळवे आणि प्रितिका प्रदीप यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे,
तर रिकर्व प्रकारात शर्वरी शेंडे आणि वैष्णवी पवार यांच्यात
सुवर्णासाठी टक्कर होणार आहे — म्हणजेच चारही पदके महाराष्ट्राच्याच खात्यात येणार
हे निश्चित!
मुलांच्या गटात उज्वल ओलेकर आणि मानव जाधव यांनी अंतिम फेरी
गाठत आणखी दोन पदकांची हमी दिली आहे. वैदेही जाधव कांस्यपदकासाठी खेळणार
असल्यामुळे तिरंदाजीत महाराष्ट्रासाठी सात पदकांची संधी निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, श्रावणी शेंडे, वैष्णवी पवार, तेजल साळवे, मानव जाधव या खेळाडूंनी दमदार उपांत्य फेरी जिंकून आपल्या
कौशल्याची झलक दाखवली. हरियाणाच्या आणि झारखंडच्या प्रतिस्पर्ध्यांना त्यांनी
नमवले,
तर पंजाबच्या खेळाडूवर मानवने अवघ्या एका गुणाने निसटता
विजय मिळवला!
मल्लखांब – सुवर्णासाठी मजबूत पाऊल
गया येथील आयआयएम संस्थेच्या सभागृहात सुरू असलेल्या
मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने आघाडी घेतली आहे. आयुष काळंगे,
निशांत लोखंडे, ओम गाढवे, निरंजन अमृते, आर्यन आबोडकर आणि प्रज्ञेश तावडे यांच्या संघाने तिन्ही
प्रकारांमध्ये सरस कामगिरी केली आहे.
अनुभवी खेळाडूंप्रमाणेच नवोदितांनीही लक्षणीय खेळ करत
पदकाच्या दिशेने पाऊले टाकली आहेत. सलग सातव्यांदा सुवर्णासाठी महाराष्ट्राची
मजबूत दावेदारी निर्माण झाली आहे.
खोखो – पंजाबचा धुव्वा,
महाराष्ट्राची विजयी
सलामी
मुलींच्या खोखो सामन्यात महाराष्ट्राने पंजाबवर ५८-९ असा एकतर्फी विजय मिळवत स्पर्धेची विजयी सुरुवात केली. या विजयात तन्वी भोसले, विश्वकरंडक विजेती अश्विनी शिंदे, दिव्या पालये, अमृता पाटील व सरिता दिवा यांनी अष्टपैलू कामगिरी करत विरोधकांचा धुव्वा उडवला.
महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या या विजयशृंखलेने खेलो इंडिया
स्पर्धेत ‘महाराष्ट्राचा शान’ पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. आगामी दिवसांत आणखी
किती सुवर्ण झळकतील, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे!
Post a Comment
0 Comments