Type Here to Get Search Results !

योगासनात महाराष्ट्राचा दुहेरी धमाका! ७व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत रिदमिक पेअर स्पर्धेत सुवर्ण-रौप्याचा सोनेरी कब्जा


योगासनात महाराष्ट्राचा दुहेरी धमाका!
७व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत रिदमिक पेअर स्पर्धेत सुवर्ण-रौप्याचा सोनेरी कब्जा

 

गया (बिहार) : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या ७व्या पर्वात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी योगासनात दमदार कामगिरी करत विजयाची झेंडा फडकवला. रिदमिक योगासन पेअर स्पर्धेत मुलांच्या आणि मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अनुक्रमे २ सुवर्ण आणि २ रौप्य पदकं पटकावत योगभूमीवर निर्विवाद वर्चस्व सिध्द केलं!

 

मुलांचा गट – डबल धमाका!

रोहन तायडे आणि अंश मयेकर या जोडीने १२९.५० गुणांसह सुवर्ण पदक जिंकत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या, तर प्रणव साहू आणि आर्यन खरात या दुसऱ्या महाराष्ट्रीयन जोडीने १२९.२० गुण मिळवत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. यजमान बिहारच्या सरांश कुमार व अभिषेक कुमार यांनी १२७.३७ गुणांसह कांस्य पदक जिंकलं.

 

मुलींच्या गटातही महाराष्ट्राची एकहाती सत्ता!

रुद्राक्षी बावे आणि प्रांजळ व्हान्ना या जोडीने अप्रतिम सादरीकरण करत १३१.१९ गुणांसह सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केलं. त्यांना तगडी टक्कर देत तृप्ती डोंगरे व देवांशी वाकले या दुसऱ्या महाराष्ट्रीयन जोडीने १३०.४४ गुणांसह रौप्य पदक पटकावलं. आसामच्या स्पृहा कश्यप व भावना बोरा जोडीने १२७.२६ गुण मिळवत कांस्यपदकावर समाधान मानलं.

 

खेळाडूंचं यश म्हणजे संगमनेरचा गौरव!

या सर्व पदक विजेत्या खेळाडूंचं प्रतिनिधित्व संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलकडून झालं. त्यांना मंगेश खोपकर, विष्णू चक्रवर्ती, प्रवीण पाटील आणि अमृता चिनकर या प्रशिक्षकांची मार्गदर्शक साथ लाभली. खेलो इंडिया स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजित ८ दिवसीय विशेष सराव शिबिरामुळेच ही अफाट कामगिरी शक्य झाली, असं संघाचे प्रशिक्षक स्वप्नील जाधव यांनी सांगितलं.

 

महाराष्ट्राचा आत्मविश्वास उंचावला!

पहिल्याच दिवशी ४ पदकं मिळवत महाराष्ट्राने योगासनात आपली ताकद ठसवून दिली आहे. या विजयानं आगामी दिवसांत अधिक यशस्वी कामगिरीसाठी उत्साह निर्माण केला आहे.

 

 

 


Post a Comment

0 Comments