Type Here to Get Search Results !

७ वी खेलो इंडिया युवा स्पर्धा, बिहार २०२५ जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राचा भरवशाचा संघ मैदानात सारा, अनुष्का, किमया, सनय, कौस्तुभ पदकांचे प्रबळ दावेदार!

 


७ वी खेलो इंडिया युवा स्पर्धा, बिहार २०२५
जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राचा भरवशाचा संघ मैदानात

सारा, अनुष्का, किमया, सनय, कौस्तुभ पदकांचे प्रबळ दावेदार!

 

नवी दिल्ली : खेलो इंडिया युवा स्पर्धेच्या सातव्या पर्वात महाराष्ट्राचा जिम्नॅस्टिक पथक जोशात असून, पदकांच्या शर्यतीत वर्चस्व गाजवण्यास सज्ज आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये जिम्नॅस्टिक प्रकाराला रविवारी जोरदार सुरुवात झाली आणि महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पात्रता फेरीत प्रभावी कामगिरी करत पदकांची जोरदार दावेदारी सादर केली.

 

मुलींच्या गटात सारा राऊळ, अनुष्का पाटील, शताक्षी टक्के, उर्वी वाघ, किमया कार्ले व यशश्री मोरे या खेळाडूंनी गत प्रशिक्षणात व सराव स्पर्धांमधून आपली चमक दाखवली असून, पदकांच्या शर्यतीत त्या आघाडीवर आहेत. याचप्रमाणे मुलांच्या गटात सनय किर्लोस्कर आणि कौस्तुभ अहिरे हे दोघेही गुणवान जिम्नॅस्ट्स पदक मिळवण्यासाठी सज्ज आहेत.

 

मागील वर्षीच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संयुक्ता काळे हिने पाच सुवर्णांसह एकूण १२ पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. यंदा तिचं वय स्पर्धेच्या अटींमध्ये नसल्यामुळे ती संघात नाही, पण तिच्या यशाचे प्रेरणास्थान घेऊन इतर खेळाडू नव्या उंचीवर झेप घेण्याच्या तयारीत आहेत.

 

यावेळी महाराष्ट्राकडून ११ मुले आणि ९ मुली असा एकूण २० जिम्नॅस्ट्सचा भक्कम पथक स्पर्धेत सहभागी झाला आहे. पात्रता फेरीत सर्वच खेळाडूंनी आत्मविश्वासाने आपली उपस्थिती नोंदवत मुख्य फेरीसाठी आशादायक चित्र निर्माण केलं आहे.

 

विशेष म्हणजे, किमया कार्ले ही मागील वर्षीच्या संघातील एकमेव पुनरागमन करणारी खेळाडू असून, तीने मागच्या स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्य जिंकले होते. यंदाही तिच्याकडून पदकाची मोठी अपेक्षा आहे.

 

महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक संघाची दमदार तयारी, आत्मविश्वास आणि कौशल्य पाहता यंदा पदकांची संख्या अधिक होण्याची दाट शक्यता आहे.


Post a Comment

0 Comments