Type Here to Get Search Results !

७ वी खेलो इंडिया युवा स्पर्धा, बिहार २०२५ वेटलिफ्टिंगमध्ये यशचा ‘सुवर्ण’ धडाका – टेनिसमध्ये अर्णव आणि ऐश्वर्याची दमदार घोडदौड!


 

७ वी खेलो इंडिया युवा स्पर्धा, बिहार २०२५
वेटलिफ्टिंगमध्ये यशचा ‘सुवर्ण’ धडाका – टेनिसमध्ये अर्णव आणि ऐश्वर्याची दमदार घोडदौड!

 

पाटणा | ११ मे २०२५ : बिहारमध्ये सुरू असलेल्या ७व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दुसऱ्या दिवशीही आपले वर्चस्व ठसवून दिले. वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीच्या यश खंडागळेने ६७ किलो वजनी गटात २६७ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर टेनिसमध्ये अर्णव पापरकर व ऐश्वर्या जाधव यांनी एकेरीत उपांत्य फेरी गाठून महाराष्ट्राचा झेंडा उंचावला.

 

यश खंडागळेचा ‘गोल्डन’ पराक्रम

राजगीर क्रीडा विद्यापीठात वेटलिफ्टिंग स्पर्धा रंगतदार झाली. सांगलीच्या यश खंडागळेने पहिल्याच प्रयत्नात स्नॅच प्रकारात १२२ किलो, तर क्लिन अ‍ॅण्ड जर्कमध्ये १४५ किलो असे एकूण २६७ किलो वजन उचलत सुवर्णपदक मिळवले. त्याच्या या पराक्रमास अधिकच वजन आहे, कारण मागील वर्षी यश आठव्या स्थानावर होता आणि त्याआधीच्या स्पर्धेसाठी पात्रही ठरला नव्हता. सध्या वडिलांचे सलून दुकान सांभाळत, मयुरा सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली यशने दोन वर्षे सातत्याने सराव करत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. "आता माझं लक्ष्य राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक आहे," असं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या यशने आज नव्या प्रेरणेसह महाराष्ट्राला अभिमान दिला.

 

टेनिसमध्ये अर्णव आणि ऐश्वर्याची झंझावती खेळी

पाटणामध्ये सुरू असलेल्या टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या अर्णव पापरकरने दिल्लीच्या रियान शर्मावर ७-६, ६-२ अशी सरळ सेट्समध्ये मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या सेटमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत अर्णवने आक्रमक स्मॅशेस आणि संयमी खेळाद्वारे आघाडी घेत दुसरा सेट सहज खिशात घातला.

 

कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवने कर्नाटकच्या कशवी सुनीलला ६-३, ६-२ असे पराभूत करत सलग दुसऱ्या वर्षी उपांत्य फेरी गाठली. एवढंच नव्हे, तर मुलींच्या दुहेरीतही ऐश्वर्या व आकृती सोनकुसारे या जोडीने उपांत्य फेरी गाठली.


अहमदाबादमधील अ‍ॅकॅडमीत सराव करणारी ऐश्वर्या गत स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते, मात्र यंदा तिचा फॉर्म पाहता सुवर्णाची आशा नक्कीच जागवली आहे.


Post a Comment

0 Comments