बोरीवलीत रंगणार ‘खासदार श्री’चा थरार
३० नोव्हेंबरला मुंबईतील पीळदार शरीरसौष्ठवपटूंच्या
संघर्षात पाच लाखांच्या रोख बक्षिसांचा वर्षाव
मुंबई, मुंबईतील होतकरू आणि व्यावसायिक
शरीरसौष्ठवपटूंना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्या मेहनतीला
योग्य सन्मान मिळावा यासाठी कायम पुढाकार घेणारे क्रीडाप्रेमी खासदार व
केंद्रिय वाणिज्य व व्यापार मंत्री पीयुष गोयल यांच्या संकल्पनेतून येत्या ३०
नोव्हेंबर रोजी वैभवशाली ‘खासदार श्री’ शरीरसौष्ठव
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मुंबईतील
शरीरसौष्ठवाचे अस्सल दमदार तेज उजळणार असून विजेत्यांवर पाच लाख रुपयांच्या रोख
बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे.
ही स्पर्धा बोरीवली (पश्चिम), महावीर नगर, वसंत
कॉम्प्लेक्स शेजारील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात सायंकाळच्या प्रकाशझोतात दिमाखात पार पडणार आहे. ‘खासदार
क्रीडा महोत्सवातील सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या या स्पर्धेकडे
संपूर्ण क्रीडा जगताचे लक्ष लागले आहे.
१५० हून अधिक खेळाडूंची पोझयुद्धातील झुंज
मुंबई आणि उपनगरांतील नामांकित तसेच उदयोन्मुख १५०
पेक्षा अधिक खेळाडू या विशेष मंचावर आपली मेहनत सिद्ध करण्यासाठी सज्ज होत
आहेत. एकापेक्षा एक अशा शरीरसौष्ठवपटूंच्या पोझयुद्धाचा अनोखा आणि रोमांचक थरार
मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे, अशी
माहिती स्पर्धेचे संयोजक आणि निमंत्रक कुणाल केरकर यांनी दिली.
विजेते होतील लखपती — बक्षिसांची मोठी मेजवानी
स्पर्धेत एकंदर सात वजनी गटांमध्ये (५५, ६०, ६५, ७०, ७५, ८० व ८० किलोवरील) दमदार संघर्ष होणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या पाच
विजेत्यांसाठी आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे. १०,००० / ८,००० / ६,००० / ५,००० / ४,००० रुपये याशिवाय, स्पर्धेतील
सर्वोत्कृष्ट खेळाडू ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ म्हणून निवडला जाईल, ज्याला १ लाख रुपयांचा
मानाचा पुरस्कार आणि प्रतिष्ठेचा ‘खासदार श्री’ किताब खासदार पीयुष गोयल यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. उपविजेत्याला
५० हजार, तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला २५
हजार रुपये मिळणार आहेत.
महिला आणि मेन्स फिजीकने वाढणार आकर्षण
या भव्य कार्यक्रमात महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेचा
स्वतंत्र गटही आयोजित केला गेला असून, अव्वल १० महिला स्पर्धकांचा सहभाग निश्चित आहे,
असे मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी
सांगितले. तसेच युवा वर्गात विशेष लोकप्रिय असलेल्या मेन्स फिजीक स्पर्धा दोन
गटांमध्ये रंगणार आहेत, ज्यामुळे स्पर्धेचे आकर्षण आणखी
वाढणार आहे.
संस्मरणीय आणि ग्लॅमरस सोहळा निश्चित
शरीरसौष्ठवाच्या या हंगामातील पहिलीच लाखमोलाची ग्लॅमर
स्पर्धा बोरीवलीत रंगणार आहे. प्रत्येक वजनी गटात चुरशीची झुंज अपेक्षित
असल्यामुळे खासदार श्री २०२५ हा थरारक, संस्मरणीय आणि विक्रमी स्पर्धात्मक सोहळा ठरेल, अशी
खात्री क्रीडावर्तुळात व्यक्त केली जात आहे.
घाम, मेहनत,
शिस्त, शक्ती आणि सौंदर्य यांच्या संगमातून
शरीरसौष्ठवाची खरी श्रीमंती या मंचावर दिसणार आहे. ३० नोव्हेंबरला बोरीवली निघणार
पीळदार तेजाने उजळून!
स्पर्धेची माहिती व संपर्क : राजेश सावंत – ८४५४०८५५५५, विशाल परब –
८९२८३१३३०३, सुनील शेगडे – ९२२३३४८५६८

Post a Comment
0 Comments