कुमार- कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
२०२५
कोल्हापूर, ठाणे शहर, सांगली,
रायगड यांची कुमार गटात विजयी सलामी तर कुमारी विभागात ठाणे शहर आणि
अहिल्यानगरची दमदार सुरुवात
पिंपरी-चिंचवड, ४१ वी कुमार- कुमारी राज्य अजिंक्यपद निवड
चाचणी व आमदार चषक कबड्डी स्पर्धा थरारात सुरू झाली असून पहिल्याच साखळी सामन्यांत
कोल्हापूर, ठाणे शहर, सांगली, रायगड यांनी कुमार गटात तर ठाणे शहर व
अहिल्यानगर यांनी कुमारी विभागात विजयी सलामी देत स्पर्धेत आपापल्या गटात आघाडी
घेतली.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुणे
जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली राकेशभाऊ घुले कबड्डी संघ व युवा
प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने दिवंगत श्रीरंग धोदाडे क्रीडानगरी, बोपखेल येथे ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित
करण्यात आली आहे.
कुमार गट : रायगड, कोल्हापूर, ठाणे शहर आणि सांगलीची दमदार
कामगिरी
रायगड संघाने पालघरवर मात करीत आपला पहिला विजय नोंदविला.
रायगडच्या निरज मिसाळ आणि निरद सुरणकर यांनी सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमणाची
धडाकेबाज लय पकडली. समिर हिरवेने उत्तम पकडी घेत साथ दिली. पालघरच्या समवेद पाटील
व जसमित राऊत यांनी संघर्ष केला, तर
निर्भय केणे व राजसिंग यांनी सुरेख पकडी केल्या.
कोल्हापूर संघाने धुळेवर मोठ्या फरकाने विजय मिळवित आपल्या
गटात आघाडी घेतली. कोल्हापूरच्या शुभम रेपे व आदित्य मासाळ यांच्या सततच्या
आक्रमणामुळे सामना कोल्हापूरकडे झुकला. भुषण पाटील व हर्षद पन्हाळकर यांनी प्रभावी
पकडी घेतल्या. धुळे संघाच्या यमन अन्सारीने एकहाती लढत दिली.
ठाणे शहरने मुंबई उपनगरवर मात केली. मनिष धनावडे व विवेक
शिंदे यांच्या वेगवान आक्रमणाने ठाणे शहरने सामना आपल्या नियंत्रणात ठेवला. वेदांत
धुमालेच्या पकडी उल्लेखनीय ठरल्या. मुंबई उपनगरच्या चिराग पाटील व विराज मर्गज
यांनी चांगला प्रतिकार केला.
सांगली संघाने नांदेडवर मोठ्या फरकाने विजय मिळविला.
पहिल्याच डावात ओम शिंदे आणि साइना लोहार यांनी तीन लोन लावून ३५-९ अशी भक्कम
आघाडी मिळवली. अथर्व पांढरेने पकडीत चमक दाखवली. नांदेडच्या रविंद्र जाधव व आकाश
जाधव यांनी उत्तरार्धात चांगला प्रयत्न केला.
कुमारी गट : ठाणे शहर व अहिल्यानगरची सुरेख सुरुवात
ठाणे शहर संघाने ठाणे ग्रामीण संघावर मात करीत विजयी
प्रारंभ केला. भावना पालवच्या आक्रमक खेळामुळे विजय सोपा झाला. निधी राजोलेने
उत्तरार्धात प्रभावी लढत दिली.
अहिल्यानगर संघाने रत्नागिरीवर विजय मिळविला. वैष्णवी काळे
व आरती कोळसे यांच्या आक्रमक खेळाने सुरुवातीपासूनच आघाडी राखली. रत्नागिरीच्या
चिन्मयी ढगळे व सलोनी महाडीक यांनी प्रतिकार केला, तसेच शौरी कांबळीने चांगल्या पकडी केल्या.
स्पर्धेतील आणखी सामन्यांमुळे पुढील दिवस अधिक रोमांचक
होणार असून प्रत्येक गटात शर्यत तीव्र होत आहे. पिंपरी-चिंचवडच्या प्रेक्षकांसाठी
कबड्डीचा उत्साह पेटला असून राज्यातील भविष्यातील तारे या मैदानातून घडणार यात
शंका नाही.
.jpeg)

Post a Comment
0 Comments