“मल्लखांब लव्ह” ची दमदार वाटचाल – परंपरेला आधुनिकतेची जोड!
देवल दांपत्याची क्रीडासाधना;
गुरु दत्ताराम दुदम
यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सुरू झालेला मल्लखांबाचा व्यापक प्रवास
“मल्लखांब लव्ह” ची यशस्वी वाटचाल –
ज्येष्ठ क्रीडा
पत्रकार, सुहास जोशी
भारतीय परंपरेचा वारसा, शरीराची सर्वांगसुंदर साधना आणि कलात्मक ताकद यांचा अद्भुत
मिलाफ म्हणजे मल्लखांब. याच मातीच्या खेळाला नवी ओळख, नवे व्यासपीठ आणि नवा जोम मिळवून देण्याचे मोलाचे कार्य
गेल्या आठ वर्षांपासून बोरिवलीत आशिष देवल आणि संचिता पाटील–देवल हे राष्ट्रीय मल्लखांबपटू करत आहेत. “मल्लखांब लव्ह”
या त्यांच्या संस्थेने स्वर्गीय दत्ताराम दुदम यांच्या अखंड स्वप्नाला प्रत्यक्षात उतरविण्याचा ध्यास
घेतला आहे—मल्लखांब हा खेळ क्रिकेटप्रमाणे प्रत्येक गल्लीबोळात पोहोचला पाहिजे हाच
ध्यास!
देवल दांपत्याने २०१७ साली बीमा नगर एज्युकेशन सोसायटी
शाळेत पहिल सेंटर सुरू केला. फक्त पाच विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास
आज पाच
केंद्रांमध्ये ४०० हून अधिक खेळाडूं पर्यंत दिमाखात पोहोचला आहे. सुविद्या प्रसारक संघ,
मुंबादेवी विद्यानिकेतन, म. ह. चोगले शाळा यांसारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक
संस्थांमधून “मल्लखांब लव्ह” ची जाळी अधिक मजबूत होत आहे.
परंपरा + आधुनिकता = परिपूर्ण मल्लखांब प्रशिक्षण
येथील प्रशिक्षण पद्धती हा संस्थेचा सर्वात मोठे बलस्थान.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक शारीरिक व्यायामाची योग्य सांगड घालून
विद्यार्थ्यांचे कौशल्य घडवले जाते.
सुरुवातीला मल्लखांब पाहून घाबरणारी मुले काहीच महिन्यांत
त्यावर लीलया उड्या मारताना दिसतात, तेव्हा देवल दांपत्यांना मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.
त्यांच्यासाठी प्रत्येक विद्यार्थी “आमच्या मुलासारखाच”
आहे—हीच वाक्ये त्यांच्या क्रीडाप्रेमाला खरी ओळख देतात.
विशेष म्हणजे मूकबधिर, अंध, हायपरॲक्टिव्ह आणि फिजिकली चॅलेंज्ड
मुले देखील येथे आत्मविश्वासाने मल्लखांब शिकतात. त्यांच्या
पालकांनी अनुभवलेले बदल म्हणजे या संस्थेच्या कामाचा खरा पुरस्कार.
भारतातील पहिले मल्लखांब यूट्यूब चॅनल
“मल्लखांब लव्ह” ने भारतातील पहिल्यावहिल्या मल्लखांब
युट्यूब चॅनलची सुरुवात करून या खेळाच्या प्रसाराला डिजिटल पंख दिले. तंत्र,
प्रकार, बारकावे, पद्धती सर्व काही दस्तऐवजीकरण करून देशभरातील खेळाडूंना आणि
विशेषतः ग्रामीण भागातील प्रशिक्षकांना अमूल्य मार्गदर्शन मिळाले.
चमकणारी प्रतिभावंत पिढी
या केंद्रातून अनेक खेळाडूंनी जिल्हा,
राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश मिळवले आहे, निधी राणे,
निरंजन अमृते,
खुशी पुजारी,
त्रिशा खानविलकर,
देवांशी माळी,
ऋतुजा मांडवेकर,
प्रणिता पुंडे,
अमोलीका श्रोत्री,
रिया पुजारी,
सान्वी सावंत,
आर्या जाधव,
शौर्य नाईक,
शिवाई पोवार,
जियाना रजक,
गौरी मांणगांवकर,
परिहा कराडकर,
वैष्णवी घाडिगावकर
या उगवत्या तारकांनी “मल्लखांब लव्ह” चे नाव राज्यभर तेजोमय
केले. निधी राणेला तर मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा पुरस्कार
मिळाला आहे.
दुदम गुरुंचे संस्कार – मजबूत प्रशिक्षकांची टीम
दीपाली दुदम, मुकेश वेलोडे, मंदार आसेगावकर, नीलम राणे, उमेश साळवी आणि अंजली बारे यांसारखी प्रशिक्षक टीम
मल्लखांबच्या प्रसारात महत्त्वाचे योगदान देत आहे.
अडचणींना न जुमानणारी जोडी
करिअर म्हणून मल्लखांब प्रशिक्षण स्वीकारणे,
संस्था उभारणे, साहित्य, जागा, निधी आणि विद्यार्थ्यांची उपलब्धता ही सर्व मोठी आव्हाने
होती. पण आशिष आणि संचिता यांनी चिकाटी, मेहनत आणि क्रीडाप्रेमाच्या बळावर ही सर्व संकटे पार केली.
कुटुंबाचा पाठिंबा आणि क्रीडाप्रेमींचे प्रोत्साहन या सर्वांनी “मल्लखांब लव्ह” ला
आजच्या उंचीवर पोहोचवले.
संचिता पाटील–देवल या राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षिका आहेत.
तर आशिष देवल तब्बल १३ वर्ष राष्ट्रीय विजेता,
२०१०चा राज्य शासन जिल्हा क्रीडा
पुरस्कार विजेता तसेच स्वामी विवेकानंद युवा पुरस्काराने सन्मानित
व्यक्तिमत्त्व. सध्या ते मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब
संघटनेचे मानद कार्यवाह आहेत.
भविष्यासाठी भक्कम संकल्प
देवल दांपत्याचा संकल्प मोठा आणि प्रेरणादायी “मुंबई उपनगरात ‘मल्लखांब लव्ह’ ची केंद्रे सर्वत्र सुरू करण्यासाठी
धडपड.” त्यांची क्रीडासाधना,
निष्ठा आणि अविरत परिश्रम पाहता,
हे स्वप्न पूर्ण होईल याबाबत शंका नाही.
“मल्लखांब लव्ह” ची ही प्रेरणादायी वाटचाल नव्या क्रीडा
संस्कृतीची सुरुवात आहे. परंपरा
जपत आधुनिकतेकडे झेप घेणारी, उंच भरारी घेण्यासाठी सज्ज झालेली!
.jpeg)


.jpeg)
Post a Comment
0 Comments