Type Here to Get Search Results !

भारतीय टेनिसचा ‘रॉकस्टार’… दोन दशकांची संघर्षमय, तेजस्वी आणि प्रेरणादायी सफर - ज्येष्ठ क्रीडा‌ पत्रकार, सुहास जोशी


भारतीय टेनिसचा अढळ आधारस्तंभ – रोहन बोपन्ना

दोन दशकांची तेजस्वी कारकीर्द संपुष्टात; मिश्र व पुरुष दुहेरीला नवी ओळख देणाऱ्या महानायकास क्रीडा‌विश्वाचा सलाम!

भारतीय टेनिसचा ‘रॉकस्टार’… दोन दशकांची संघर्षमय, तेजस्वी आणि प्रेरणादायी सफर - ज्येष्ठ क्रीडा‌ पत्रकार, सुहास जोशी

 

भारतीय टेनिसच्या दीर्घ वाटचालीत काही व्यक्तिमत्त्वे अशी उभी राहतात, ज्यांच्या कामगिरीचा प्रभाव केवळ त्यांच्या कोर्टवरील यशापुरता मर्यादित राहत नाही; तर त्या खेळाच्या संस्कृतीला नवी दिशा, नवी अर्थवत्ता आणि नवा आत्मविश्वास देतात. रोहन बोपन्ना हे असेच एक विराट नाव. भारतीय टेनिसचा ‘आधारस्तंभ’ म्हटले तर अतिशयोक्ती ठरू शकत नाही.

 

भारतीय टेनिसचा खांब… हृदयात घर करणारा योद्धा!

भारतीय टेनिसमध्ये ‘दुहेरी’ या प्रकाराचं स्वतंत्र साम्राज्य उभारणारा, टेनिस रॅकेटला आपल्या आयुष्याचं शस्त्र मानून दोन दशकांपेक्षा जास्त काळ देशाचं नाव उज्ज्वल करणारा ४५ वर्षीय रोहन बोपन्ना, अखेर व्यावसायिक आंतरराष्ट्रीय टेनिसला निरोप देऊन निवृत्त झाला. मैदानावरून तो दूर जात असला, तरी भारतीय टेनिसप्रेमींच्या मनात त्याचे स्थान अढळ आहे, अजरामर आहे.

 

दुहेरी प्रकाराचा ‘गेम चेंजर’!

रोहन बोपन्नाने भारतीय टेनिसला काय दिलं, तर दुहेरी प्रकारात नवी उंची, नवा आत्मविश्वास, नवी ओळख आणि नवा विजयी अध्याय! मिश्र दुहेरी आणि पुरुष दुहेरी या प्रकारांना नवा चेहरा देणारे नाव म्हणजे रोहन बोपन्ना. त्याच्या आक्रमक सर्विसिंग, नेटप्लेतील प्रभुत्व आणि कणखर मानसिकतेमुळे भारतीय टेनिसमध्ये दुहेरी प्रकाराची लोकप्रियता नव्या उंचीवर पोहोचली.

 

दुबई असो, ऑस्ट्रेलियन ओपन असो अथवा हंगामातील इतर ग्रँड स्लॅमस्—बोपन्नाच्या सर्व्हिसचा वेग, नेटवरील आक्रमकता आणि जोडीदाराला दिलेले उत्कृष्ट ‘रीडिंग’ हे अजूनही जागतिक पातळीवरील दुहेरीच्या खेळातील अत्युच्च दर्जाचे मानले जाते.

 

लीनिअर सिंगल्स-केंद्रित दृष्टिकोनातून भारतीय टेनिस बाहेर काढून दुहेरीला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यामागे बोपन्नाचे योगदान निर्णायक आहे. महेश भूपतीनंतर ज्याने भारतीय डबल्सला नवा श्वास दिला तो खेळाडू म्हणजे बोपन्ना. आंतरराष्ट्रीय सर्किटवर भारतीय तिरंगा वारंवार उंचावण्यामागे त्याचा ‘हंग्री फॉर मोअर’ दृष्टिकोन प्रमुख ठरला. हे यश केवळ वैयक्तिक नाही, तर भारतीय टेनिसच्या मानसिकतेत झालेला सकारात्मक बदल आहे.

 

वयाला हरवणारा ‘फायटर’! तुम्ही तंदुरुस्त आणि अपडेट राहिलात तर वयही झुकतं”— हे त्याने जगासमोर सिद्ध केले.

शरीर तंदुरुस्त आणि मन अपडेट ठेवा… वय हा खेळाचा अडथळा नसतो,” हे बोपन्नाने आपल्या आचरणातून सिद्ध केले. ३७व्या वर्षी फ्रेंच ओपनमध्ये गॅब्रिएला डेवोज्कीसोबत पहिला ग्रँड स्लॅम, आणि ४४व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीत मॅथ्यू हेडनबॅडनसोबत दुसरा ग्रँड स्लॅम जिंकणारा हा चॅम्पियन, वय वाढलं तरी यशाची भूक कमी होत नाही याचं जिवंत उदाहरण आहे.

 


वयाला हरवणारे विक्रम

३७ व्या वर्षी फ्रेंच ओपन मिश्र दुहेरी विजेतेपद, ४४ व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी विजेतेपद, इतक्या उशिरा सर्वोच्च स्तरावर पोहोचणारे खेळाडू जगात मोजकेच आणि त्यात रोहन अभिमानाने उभा! कारकिर्दीचा दुसरा टप्पा तर जणू सुवर्णयुगच. नवनव्या विक्रमांनी त्याने जागतिक टेनिसला चकित केले.

 

खडतर वाटेतून शिखरावर

खुर्द-मदारपूरच्या साध्या वातावरणातून रोहनचा प्रवास सुरू झाला.
लाकूडतोड्याचे काम करत खांदे मजबूत करणे, कॉफी मळ्यात धाऊन फिटनेस वाढवणे हा कठोर सराव त्याच्या खेळाची खरी पायाभरणी ठरला. शालेय, जिल्हा, राज्य अशा सर्व पातळ्यांवर चमक दाखवत तो राष्ट्रीय संघात पोहोचला. २०व्या वर्षी व्यावसायिक टेनिसची निवड करताना त्याची स्वप्ने मोठी होती आणि त्याने ती एकेक करून पूर्ण केली. या सर्वांची शिदोरी घेऊन बोपन्ना जागतिक पातळीवर अव्वल ठरला.

 

विक्रमांची चकाकणारी मालिका : २ ग्रँड स्लॅम विजेतेपद, ६ ग्रँड स्लॅममध्ये उपविजेतेपद, २६ एटीपी किताब, ६ एटीपी मास्टर्स 1000 विजेतेपद, आफ्रो-आशियाई व आशियाई स्पर्धांत प्रत्येकी २ सुवर्ण पदके, ३ ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व, ५३९ विजय आणि ४१० पराभवांचा गौरवशाली इतिहास, डेव्हिस कपमध्ये दोन दशकांचे प्रतिनिधित्व.

 

इंडो-पाक एक्सप्रेस’ या नावाने जागतिक टेनिसस्थळी धुमाकूळ घालणारी त्याची आणि ऐसान-कुरेशीची जोडी आजही चाहत्यांच्या स्मरणात कायम आहे.

 

टेनिससारख्या खेळात सातत्याने ‘एलिट लेव्हल’वर खेळणे आणि स्वतःची कामगिरी सिद्ध करणे हे कोणत्याही देशासाठी मोठा अभिमान आहे. आज जागतिक खेळविश्वात भारताची प्रतिमा ज्येष्ठ, स्थिर आणि प्रबळ टेनिस राष्ट्र म्हणून निर्माण होताना जी माणसे प्रमुख ठरतात, त्यात रोहन बोपन्नाचे नाव अग्रस्थानी आहे.

 

खेळाडूपेक्षा मोठ्या मनाचा माणूस!

रोहन बोपन्ना म्हणजे आक्रमक सर्व्हिस, अप्रतिम नेट-प्ले, कणखर मानसिकता, विनयशीलता आणि खेळाडूप्रेमी वृत्ती, जिंकला तर नम्र, हरला तरही नम्र, ‘फिकीर नॉट’ वृत्तीचा हा खेळाडू जगभराच्या आदराचा मानकरी ठरला.

 

दुखापतींना हरवून वारंवार कमबॅक करणे, बदलत राहणाऱ्या सहकाऱ्यांबरोबर ताल जुळवणे, खराब फॉर्मशी असलेला संघर्ष सगळे पेलून तो पुन्हा पुन्हा उभा राहिला. त्यामुळेच तरुण खेळाडूंसाठी तो खरा आयकॉन ठरला.

 

भारतीय टेनिस घडवणारा मार्गदर्शक, खेळाला परतफेड — ‘बोपन्ना फाऊंडेशन’

खेळाचं देणं फेडायलाच हवं” या भावनेतून त्याने स्थापन केलेल्या
बोपन्ना टेनिस डेव्हलपमेंट फाउंडेशन’ मुळे असंख्य युवा खेळाडू घडले, मार्गदर्शन मिळाले, टेनिसमधील नवी पिढी तयार झाली. युवा खेळाडूंना आर्थिक मदत आणि प्रशिक्षण सुध्दा देत आहे. युवकांच्या सुख-दुःखात सहभागी होत ते उभे राहणे हा रोहनचा सर्वात मोठा मानवी गुण. त्याची पत्नी सुप्रिया, कन्या त्रिधा आणि बहिण रश्मी यांनी खडतर काळात दिलेली मोलाची साथ कायम उभी राहिली.

 


राष्ट्रीय सन्मानाचा मानकरी

खेळातील अमूल्य योगदानासाठी केंद्र सरकारने रोहनला अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री देऊन गौरवले. भारतीय टेनिस महासंघाने भविष्यात आणखी मोठा सन्मान करावा, ही टेनिसविश्वाची एकमुखाने व्यक्त होणारी अपेक्षा!

 

समाप्ती नाही… नव्या सुरुवातीचा क्षण

कोर्टवरून उतरताना त्याच्या कारकिर्दीचा शेवट होतो, पण त्याने दिलेली ऊर्जा, नवी दिशा आणि भारतीय टेनिसचे बदललेले रूप कायम स्मरणात राहील. रोहन बोपन्ना,
तू केवळ टेनिसपटू नाहीस; तू भारतीय टेनिसचा पाया, प्रेरणा आणि अमर अध्याय आहेस!


Post a Comment

0 Comments