Type Here to Get Search Results !

बॅडमिंटनचे भगीरथ मनोहर गोडसे : सहा दशकांची तपस्वी वाटचाल - ज्येष्ठ क्रीडा‌ पत्रकार, सुहास जोशी


बॅडमिंटनचे भगीरथ मनोहर गोडसे : सहा दशकांची तपस्वी वाटचाल - ज्येष्ठ क्रीडा‌ पत्रकार, सुहास जोशी

 

खेळाडू, प्रशिक्षक, आयोजक… आयुष्यभर बॅडमिंटनला अर्पण केलेला एक जीवनप्रवास

 

बॅडमिंटन आणि मनोहर गोडसे—ही दोन नावे वेगवेगळी उच्चारताना जणू काही एकाच श्वासाची लय लागते. नुकतेच ८६  व्या वर्षात पदार्पण केलेले आणि तब्बल सहा दशकांहून अधिक काळ बॅडमिंटनची निस्वार्थ सेवा करणारे मनोहर गोडसे हे या खेळाचे तपस्वी व्यक्तिमत्त्व मानले जातात. बॅडमिंटन हा त्यांचा ध्यास… त्यांचे साधन… आणि त्यांचे आयुष्य!

 

लहान गावातून महानगरात… बॅडमिंटनची ओळखही नव्हती

रायगड जिल्ह्यातील पेणजवळील वरसई या छोट्याशा गावात गोडसे यांचा जन्म. चौथीपर्यंतचे शिक्षण तिथेच. तेव्हा बॅडमिंटन म्हणजे काय—याची कल्पनाही नव्हती. नंतर कुटुंब मुंबईला आले आणि माटुंगा येथील लोकमान्य नगरात स्थायिक झाले. इथल्या मातीच्या बॅडमिंटन कोर्टामुळे छोट्या मनोहरच्या आयुष्यात बॅडमिंटनचे बीज रुजले. मोठ्यांच्या खेळातून फेकण्यात येणाऱ्या ‘कॉक्स’ उचलत ते टेबल टेनिस बॅटने नवशिका खेळ खेळायचे… पण हा छंद पुढे ध्यास झाला.

 

प्रवेश फीचे सहा रुपयेही मोठे… पण इरादा अढळ!

मध्य रेल्वे बॅडमिंटन क्लबमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न होते, फी अवघी सहा रुपये… पण घरची परिस्थिती परवडणारी नव्हती. तरीही मनोहर थांबले नाहीत. मॅट्रिक (पूर्वीची एस.एस.सी.) शिक्षणानंतर त्यांनी १९ व्या वर्षी प्रीमियर ऑटोमोबाईल कंपनीत नोकरी सुरू केली. इथूनच त्यांच्या बॅडमिंटन करिअरला खरी चालना मिळाली. स्पर्धात्मक बॅडमिंटनला जरी थोडा उशीर झाला, तरी त्यांनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच अखिल भारतीय पातळीवर अनेक विजेतेपदे पटकावली.

 

ऑल इंग्लंड स्पर्धेतही प्रतिनिधित्व

नरेश नार्वेकर यांच्या जोडीने त्यांनी अनेक स्पर्धांत चमक दाखवली. वयस्कर गटात जागतिक कीर्तीच्या ऑल इंग्लंड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांनी मिळवली. भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्यासोबत दुहेरीत खेळण्याची संधी मिळणे हे तर त्यांच्या कारकीर्दीचे सर्वोच्च यश मानले जाते.

 

३५ व्या वर्षी खेळाडूपासून प्रशिक्षक… आणि ५६ व्या वर्षी संस्थापक!

या खेळाचे काही तरी देणे लागते’ या भावनेतून त्यांनी प्रशिक्षणाकडे वळवले. अनेक प्रतिभावान खेळाडूंना त्यांनी दिशा दिली. माजी राष्ट्रीय विजेता अमोल शहा, क्रीडावैद्यक तज्ञ डॉ. आनंद जोशी हे त्यांच्या शिष्यांपैकी.

 

१९९६ मध्ये वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी ‘मनोरा बॅडमिंटन अकादमी’ची स्थापना केली. युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी हा उपक्रम सुरू झाला. सुरुवातीला १० ते १६ वर्षांपर्यंतचे गट… आज ९ ते १७ वर्षांखालील ६ गटांमध्ये सामने घेतले जातात.

 

११७ स्पर्धांचे आयोजन… शेकडोंना व्यासपीठ

१९९७ मध्ये पहिल्या स्पर्धेत फक्त ५२ खेळाडू सहभागी झाले. आज ती संख्या पाचशेच्या पुढे गेली आहे. आर्थिक मदत जवळजवळ नसतानाही, केवळ खेळावरील असलेले प्रेम आणि स्वतःच्या खिशातून खर्च करत गोडसे यांची अकादमी उभी आहे. सदस्यत्व फी आजही फक्त ५१ रुपये आहे!

 


बड्या जिमखान्यांची साथ – खेळाडूंना मोठे व्यासपीठ

एनएससीआय, माटुंगा जिमखाना, सीसीआय, बॉम्बे जिमखाना, विलिंग्डन, खार जिमखाना यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांनी अनेकदा विनामूल्य कोर्ट उपलब्ध करून दिले. आज राज्यभरातील खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होतात.

 

इथून घडले अनेक मानांकित खेळाडू

जिश्नु सान्याल, अजय जयराम, हर्षील दाणी, प्राजक्ता सावंत, तन्वी लाड, अदिती मुटाटकर यांसारखे अनेक खेळाडू मनोरा स्पर्धांमधून चैतन्य घेत राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहेत.

 


गोडसे यांचा सन्मान – बॅडमिंटन  खेळातील दिग्गज

प्रकाश पाडुकोण, नंदू नाटेकर यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव  केला. ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनकडून 'जीवन गौरव पुरस्कार' प्रदान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे माजी खासदार स्व.प्रकाश परांजपे तसेच अनेक क्रीडा संस्थांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या उज्वल कामगिरीचा गौरव केला आहे.

 


मितभाषी व्यक्तिमत्त्व… पण उत्साह आजही तितकाच तेजस्वी

एसएससीपर्यंतचे शिक्षण असूनही प्रीमियर ऑटोमोबाईलमध्ये अकाउंट ऑफिसर पदापर्यंत प्रवास. बॅडमिंटनने त्यांना मोठे मित्रपरिवार, वेगळी ओळख दिली. पत्नी माधवी आणि मुलगा जयंत यांनी दिलेली साथ त्यांच्या संपूर्ण प्रवासात भक्कम पाठीशी राहिली.

 

बॅडमिंटनचा ‘मनोरा’ उद्याही तितकाच उंच राहो…

सहा दशकांची वाटचाल, समर्पण, त्याग आणि असामान्य सातत्य—मनोहर गोडसे यांनी बॅडमिंटन क्षेत्रात उमटवलेली छाप अमिट आहे. आजही त्यांचा उत्साह अनेकांना प्रेरणा देतो.

 

गोडसे यांचा हा ‘मनोरा’ पुढेही अधिक उंची गाठू दे—हीच क्रीडाप्रेमींची मनापासूनची शुभेच्छा!


Post a Comment

0 Comments