Type Here to Get Search Results !

बोपखेलमध्ये राज्य कबड्डीचा महाधडाका रंगणार; २५ नोव्हेंबरपासून कुमार-कुमारी निवड चाचणीला सुरुवात होणार ६२ संघांची दमदार जुगलबंदी पाहायला मिळणार राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ निवडीची प्रतिष्ठेची लढत


बोपखेलमध्ये राज्य कबड्डीचा महाधडाका रंगणार; २५ नोव्हेंबरपासून कुमार-कुमारी निवड चाचणीला सुरुवात होणार


६२ संघांची दमदार जुगलबंदी पाहायला मिळणार

राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ निवडीची प्रतिष्ठेची लढत

 

पुणे, २२ नोव्हेंबर : पिंपरी-चिंचवडच्या बोपखेल येथील श्रीरंग धोदाडे क्रीडानगरीत ५२वी कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २५ नोव्हेंबरपासून जल्लोषात सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानत्त्वाखाली, राकेशभाऊ घुले कबड्डी संघ, युवा प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

 

२९ नोव्हेंबरपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत २५ जिल्ह्यांचे ३१ कुमार व ३१ कुमारी गटातील एकूण ६२ संघ उतरतील. या माध्यमातून महाराष्ट्राचे दोन्ही गटांचे राज्य संघ निवडले जाणार असून कुमारी गटाचा संघ डिसेंबर २०२५ अखेरीस पश्चिम बंगालमधील राष्ट्रीय स्पर्धेत तर कुमार गटाचा संघ जानेवारी २०२६ मध्ये आंध्र प्रदेशातील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

 

गतवर्षी सांगलीत झालेल्या स्पर्धेत कुमार गटात ठाणे शहर संघ विजेता, तर पुणे ग्रामीण उपविजेता ठरला होता. कुमारी गटात पुणे ग्रामीणने जेतेपद, तर पिंपरी-चिंचवड संघाने उपविजेतेपद पटकावले होते. यंदा स्पर्धाच पुण्यात असल्याने पुणे शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी-चिंचवडया तिन्ही संघांतील संघर्ष अधिक रोमांचक ठरणार आहे.

 

स्पर्धेसाठी ६ मॅट क्रीडांगणे तयार करण्यात येत असून सामने सायंकाळच्या सत्रात प्रकाशझोतात खेळविण्यात येतील. हिवाळ्यातील दव लक्षात घेऊन सकाळच्या सत्रातही लढती होणार आहेत. स्पर्धेची तयारी उत्साहात सुरू असून लवकरच गटवारी जाहीर केली जाईल, अशी माहिती राज्य संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी दिली.


Post a Comment

0 Comments