Type Here to Get Search Results !

५२ वी कुमार–कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२५ रोमहर्षक लढतीत ठाणे ग्रामीणचा विजयाचा शंखनाद; कुमारी गटात पालघरचा दमदार पराक्रम


५२ वी कुमार–कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२५


रोमहर्षक लढतीत ठाणे ग्रामीणचा विजयाचा शंखनाद; कुमारी गटात पालघरचा दमदार पराक्रम

 

ठाणे ग्रामीणचा ३९–३७ ने केला अहमदनगरचा पराभव

पालघरने पिंपरी चिंचवडला ५३–४५ ने नामोहरम करत पहिल्याच प्रयत्नात आमदार चषक पटकाविला

 

पुणे : पिंपरी चिंचवड, बोपखेल येथील दिवंगत श्रीरंग धोदाडे क्रीडानगरीत पार पडलेल्या ५२ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ठाणे ग्रामीण व पालघर या संघांनी अनुक्रमे कुमार व कुमारी गटाचे विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे व राकेशभाऊ घुले कबड्डी संघ व युवा प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने ही आमदार चषक स्पर्धा उत्साहात पूर्ण झाली. गेल्या वर्षी ठाण्याने हा चषक पटकावला होता, मात्र यंदा ठाणे ग्रामीण संघाने तो इतिहास पुन्हा लिहिला.

 


कुमार विभाग : ठाणे ग्रामीणचा अंतिम मिनिटातील ऐतिहासिक विजय

अत्यंत रोमहर्षक अशा शेवटच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात ठाणे ग्रामीणने अहमदनगरचा ३९–३७ अशा निसटत्या फरकाने पराभव करून स्व. प्रभाकर नागो पाटील फिरता चषक व आमदार चषक जिंकला.

 

मध्यंतराला ठाणे ग्रामीण १६–२२ अशा सहा गुणांनी पिछाडीवर होता. मात्र दुसऱ्या सत्रात जीतसिंग सैनी व स्मित पाटील यांनी जोरदार आक्रमण करत अहमदनगरच्या अभिजित साळुंखे व सार्थक शिंदे यांचा भक्कम बचाव भेदला. समन हरिजन यांच्या सुरेख पकडींनी विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

अहमदनगरकडून वैदांत उंदरे व प्रशांत उपलकर यांनी सुरुवातीला जोरदार हल्ले करीत आघाडी मिळवली. तर अभिजित साळुंखे व सार्थक शिंदे यांनी जीतसिंग सैनीवर सलग चार पकडी घेत दबाव वाढविला, परंतु उत्तरार्धात सैनीने निडर प्रतिहल्ला करून संघाला विजय मिळवून दिला.

 

उपांत्य फेरी

  • अहमदनगरने परभणीचा ५१–५० ने
  • ठाणे ग्रामीणने पुणे ग्रामीणचा ३७–३६ ने पराभव

 

कुमारी विभाग : पालघरचा विजयी जल्लोष – संजना, हनी व काजलची विजयी त्रयी

कुमारी गटाच्या अंतिम सामन्यात पालघरने पिंपरी चिंचवड संघाचा ५३–४५ असा पराभव करून स्व. चंदन सदाशिव पांडे फिरता चषक आणि आमदार चषक पहिल्यांदाच पटकाविला.

 

मध्यंतराला पालघरकडे ३१–२० अशी भक्कम आघाडी होती. संजना भोईर हिने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत दोन लोन लावत प्रचंड दबाव निर्माण केला. हनी सोलमुत्तूच्या वेगवान चढाया आणि काजल भोईरच्या पकडींनी विजया कडे प्रवास सुलभ केला.

 

पिंपरी चिंचवडकडून संतोषी थोरवे, किर्ती कडगंची यांनी प्रयत्न केले, तर सिध्दी गायकवाड हिने पकडी घेतल्या, परंतु पालघरचा बचाव भेदता आला नाही.

उपांत्य फेरी

 

  • पालघरने सांगलीचा ४४–२३
  • पिंपरी चिंचवडने गतविजेत्या पुणे ग्रामीणचा ४८–४३ असा पराभव

 

पारितोषिक वितरण

स्पर्धेचे पारितोषिक वितरण विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शशिकांत घुले, दिनेश धावडे, मंगल पांडे, मालोजी भोसले, दत्तात्रय कळमकर, हिरीबाई घुले, निलेश पांढरकर, राजू घुले, राकेशभाऊ घुले व युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

कबड्डीप्रेमींसाठी सुवर्णक्षण – दोन्ही अंतिम लढतींना प्रेक्षकांची दाद दिली

खऱ्या अर्थाने कबड्डीच्या कौशल्य, ताकद, वेग आणि रणनीतीचे उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या या स्पर्धेने महाराष्ट्रातील युवा खेळाडूंची दमदार ताकद सिद्ध केली.

 


Post a Comment

0 Comments