Type Here to Get Search Results !

उद्यानगणेश शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे अजिंक्य अंतिम फेरीत उमैर पठाणवर दणदणीत विजय; विजेत्यांचा जल्लोषात सन्मान


 

उद्यानगणेश शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे अजिंक्य

अंतिम फेरीत उमैर पठाणवर दणदणीत विजय; विजेत्यांचा जल्लोषात सन्मान

 

मुंबई : कॅरमपटूंच्या अचूक नेम, प्रेक्षकांची उसळलेली दाद आणि अंतिम फेरीतील थरार अशा वातावरणात श्री उद्यानगणेश मंदिर चषक राज्यस्तरीय विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेचा समारोप झाला. या स्पर्धेत राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे याने दमदार खेळाचे दर्शन घडवत अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.

 

अंतिम फेरीत एकतर्फी सामना

शेठ जगीलाल पोद्दार अकॅडमी–मालाड स्कूलच्या प्रसन्न गोळेने अंतिम फेरीत श्री नारायण गुरु हायस्कूल–चेंबूरच्या उमैर पठाणचा २१–१ असा दणदणीत पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिल्या दोन बोर्ड हातून निसटल्यामुळे उमैर पठाणला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

 

बक्षीस वितरणात मान्यवरांची उपस्थिती

पहिल्या १६ विजेत्या–उपविजेत्यांना आकर्षक चषक, स्ट्रायकर व टी-शर्ट देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान समितीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार वैद्य, कार्यवाह मधुकर प्रभू, व्यवस्थापक संजय आईर तसेच शिवछत्रपती पुरस्कारविजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

 

उपांत्य फेरीतील निर्णायक विजय

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील श्री उद्यानगणेश मंदिर मंडपात झालेल्या उपांत्य फेरीत प्रसन्न गोळेने पुष्कर गोळेचे आव्हान २१–९ असे संपुष्टात आणले, तर उमैर पठाणने ग्रीष्मा धामणकरला १४–७ असे पराभूत करून अंतिम फेरीत धडक दिली होती.

 

उपांत्य व उपांत्यपूर्व विजेते

पोद्दार अकॅडमी स्कूल–मालाडचा पुष्कर गोळे व्ही.एन. सुळे गुरुजी हायस्कूल–दादरची ग्रीष्मा धामणकर हे उपांत्य उपविजेते ठरले. महात्मा गांधी विद्या मंदिर–वांद्रेची तनया दळवी, महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा विराज बर्वे, पार्ले टिळक विद्यालयाचा दुर्वेश चव्हाण, शेठ करमशी कानजी स्कूल–मुलुंडचा केवल कुळकर्णी यांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपद पटकावले.

 

उपउपांत्यपूर्व फेरीतील मानकरी

जनरल एज्युकेशन स्कूलचा वेदांत लोखंडे, पाटकर विद्यालय–डोंबिवलीचा शिवांश मोरे, शिवाजी नगर हायस्कूलचा अद्वैत महाडिक, कुमुदिनी विद्यामंदिर–गोवंडीचा प्रज्वल गेडाम व आयुष मुल्लाम, ब्लॉसम इंग्लिश स्कूल–मरीन लाईनचा संचित जगताप, श्री नारायण गुरु हायस्कूलचा शाहीद खान, शारदाश्रम विद्यामंदिरचा सोहम जाधव यांनी उपउपांत्यपूर्व उपविजेतेपद मिळवले.

 

४८ खेळाडूंची रंगतदार स्पर्धा

विविध जिल्ह्यांतील ४८ शालेय कॅरमपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. अटीतटीच्या लढती, दर्जेदार खेळ आणि नवोदितांची चमकदार कामगिरी यामुळे उद्यानगणेश शालेय कॅरम स्पर्धा यशस्वी व संस्मरणीय ठरली.

Post a Comment

0 Comments