Type Here to Get Search Results !

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ६२ वी खो-खो स्पर्धा ​ व्यावसायिक गटात रेल्वेचा दबदबा, ‘रचना’चा विजयनाद; ४ फूट ११ इंच गटात ओम साईश्वरचा दणका मैदानात घुमला विजयाचां 'धमाका'; दिमाखात गाठली उपांत्य फेरी!

 


विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ६२ वी खो-खो स्पर्धा

व्यावसायिक गटात रेल्वेचा दबदबा, ‘रचना’चा विजयनाद; ४ फूट ११ इंच गटात ओम साईश्वरचा दणका

मैदानात घुमला विजयाचां 'धमाका'; दिमाखात गाठली उपांत्य फेरी!

मुंबई (क्री. प्र.): मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि विद्यार्थी क्रीडा केंद्र यांच्या आयोजनाखाली सुरु झालेल्या ६२ व्या जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेने परळच्या लाल मैदानावर अक्षरशः थरार उडवून दिला. खेळाडूंचा तुफानी वेग, अचूक चढाया, दीर्घ संरक्षण आणि शेवटच्या क्षणापर्यंत चाललेली अटीतटीची झुंज यामुळे थंडीच्या वातावरणातही मैदानात उष्णता पसरली. सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, रचना नोटरी वर्क्स आणि ओम साईश्वर सेवा मंडळ या संघांनी प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करत दिमाखात पुढील फेरी गाठली.

 

पश्चिम रेल्वेचा सुसाट विजयरथ – महाराष्ट्र पोस्टवर डावाने मात

महिलांच्या व्यावसायिक उपांत्यपूर्व फेरीत पश्चिम रेल्वेने महाराष्ट्र पोस्ट संघावर ०९-०६ असा एक डाव व ३ गुणांनी दणदणीत विजय नोंदवला. पश्चिम रेल्वेकडून अर्चना माझी (१:५०, ३ मि. संरक्षण व १ गुण), दिव्या गायकवाड (नाबाद २, १:३० मि. संरक्षण), संध्या सुरवसे (२:४०, ३:३० मि. संरक्षण व १ गुण), किशोरी मोकाशी (२:३० मि. संरक्षण), कल्याणी कंक (नाबाद १ मि. संरक्षण व ३ गुण) यांनी सामन्यावर संपूर्ण पकड मिळवली. पराभूत महाराष्ट्र पोस्टकडून पूजा फरगडे (१:५० मि. संरक्षण), कांचन पवार (१:१० मि. संरक्षण), पायल भांगे (१ मि. संरक्षण), श्रुतिका नाईक (१:२० मि. संरक्षण) यांनी झुंज दिली.

 

मध्य रेल्वेचा थरारक विजय – नेव्हल डॉकला रोखले

पुरुषांच्या लढतीत मध्य रेल्वेने नेव्हल डॉक संघावर १४-१३ असा ७:३० मिनिटे शिल्लक राखून १ गुणाने थरारक विजय मिळवला. मध्य रेल्वेकडून अर्णव पाटणकर (नाबाद १:१०, १:३० मि. संरक्षण व ३ गुण), रामजी कश्यप (१:२० मि. संरक्षण व २ गुण), विजय हजारे (२:१० मि. संरक्षण व २ गुण), मिलिंद चावरेकर (१:५० मि. संरक्षण व २ गुण), सौरभ घाडगे (१:४० मि. संरक्षण व २ गुण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. नेव्हल डॉककडून पवन नाचणकर (१:२० मि. संरक्षण), सुजल मोरे (१ मि. संरक्षण व १ गुण), अनंत साटले (१:२० मि. संरक्षण), वैभव मोरे (१:५० मि. संरक्षण) यांनी कडवी लढत दिली.

 

रचना नोटरीचा डंका – महावितरणवर मात

रचना नोटरी वर्क्स संघाने महावितरण कंपनी संघावर १८-१६ असा २ गुणांनी विजय मिळवत मैदानात विजयनाद घुमवला. रचनाकडून सदाशिव पालव (२, १:१० मि. संरक्षण व २ गुण), ओमकार मिरगळ (नाबाद १, १:२० मि. संरक्षण व १ गुण), रुपेश कोंडाळकर (१:४०, १:४० मि. संरक्षण व ४ गुण), सिद्धेश चिकने (१:१० मि. संरक्षण व ३ गुण), राहुल जावळे (१:२०, २ मि. संरक्षण व २ गुण) यांनी संघाला विजयाकडे नेले. महावितरणकडून सम्यक जाधव (२ मि. संरक्षण व १ गुण), विराज कोठमकर (१:२० मि. संरक्षण), प्रतिक वाईकर (१:२०, ३:३० मि. संरक्षण व ४ गुण), आयुष (१ मि. संरक्षण व ३ गुण) यांची कामगिरी लक्षवेधी ठरली.

 

४ फूट ११ इंच गट – ओम साईश्वरचा दणका

४ फूट ११ इंच गटातील सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने यजमान विद्यार्थी क्रीडा केंद्रावर ०५-०४ असा १ गुणाने आणि २:३० मिनिटे राखून दणदणीत विजय मिळवला. ओम साईश्वरकडून आरव साटम (३:२०, १:५० मि. संरक्षण), अधिराज गुरव (दोन्ही डावात नाबाद ३:२०, २:५० मि. संरक्षण व २ गुण), सार्थक गामी (२:२० मि. संरक्षण व १ गुण) यांनी सामन्यात विजयी कामगिरी केली. तर पराभूत विद्यार्थी क्रीडा केंद्रकडून विघ्नेश जाधव (१:१०, ४ मि. संरक्षण), ओंकार जाधव (४:५० मि. संरक्षण व २ गुण), आर्यन पावडी (नाबाद १ मि. संरक्षण) यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला.


Post a Comment

0 Comments