युवकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरणारी वेंगसरकर सरांची क्रिकेट
गाथा!
‘ग्रासरूट क्रिकेटसाठी आजही कार्यरत असलेले भारतातील एकमेव
कसोटीपटू’ – संजय पाटील
मुंबई : भारतीय क्रिकेटच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार असलेल्या
दिलीप वेंगसरकर
यांच्या नेतृत्व, शिस्त आणि जिद्दीने भरलेल्या क्रिकेट कारकीर्दीने आजही
युवकांना प्रेरणा देत राहिली आहे, असे ठाम मत मुंबईचे माजी फिरकी गोलंदाज व मुंबई रणजी निवडसमितीचे
चेअरमन संजय पाटील यांनी व्यक्त केले. माहुल, चेंबूर येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक
वितरण समारंभात ते बोलत होते.
ड्रेसिंग रूममधील शिकवण आजही मार्गदर्शक
संजय पाटील पुढे म्हणाले की, “आम्ही वेंगसरकर सरांसोबत खेळत असताना त्यांच्या
व्यक्तिमत्त्वाबद्दल मनात भीतीयुक्त आदर होता. त्यांच्या सह ड्रेसिंग रूमचा भाग
असताना शिस्त, मानसिक कणखरपणा आणि नेतृत्वाचे धडे आम्हाला अनुभवातून
मिळाले.” क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही ग्रासरूट लेव्हल क्रिकेटसाठी सातत्याने कार्यरत राहणारे
वेंगसरकर हे भारतातील एकमेव कसोटीपटू आहेत, हे त्यांनी आवर्जून नमूद केले.
पटेल क्रिकेट कोचिंग सेन्टरचे वर्चस्व,
विजेतेपदावर
शिक्कामोर्तब
या स्पर्धेत पटेल क्रिकेट कोचिंग सेन्टर संघाने सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट अकादमी संघावर २०६ धावांनी दणदणीत विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात पटेल
संघाने सर्वच विभागांत वर्चस्व गाजवत स्पर्धेवर अधिराज्य गाजवले.
रजा मिर्झाची ऐतिहासिक खेळी,
धावांचा पाऊस
प्रथम फलंदाजी करताना पटेल क्रिकेट कोचिंग सेन्टरकडून रजा मिर्झा याने अवघ्या ११२ चेंडूत २२ चौकार आणि ८ षटकारांसह १९० धावांची अफलातून
मॅरेथॉन खेळी साकारत प्रेक्षकांना थक्क केले. त्याने उमर खुटे (३९) याच्यासह ७५ धावांची सलामी, तर हमझा खान (५४) याच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी १८१ धावांची भक्कम भागीदारी
रचली. युवान शर्मा (२५) आणि रोशन चौहान (१६ नाबाद) यांनीही धावसंख्येत मोलाची भर घातली. मान कोळी याने ५५ धावांत २ बळी घेतले. निर्धारित ४० षटकांत ८ बाद ३७४ धावांचा डोंगर
उभा राहिला.
साहिल पठाणचा फिरकी जलवा,
सुलक्षण अकादमीचा डाव
कोसळला
या आव्हानाचा पाठलाग करताना सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट अकादमीकडून अथर्व अधिकारी (३०), राज जैन (२१), यश दुसी (४६) आणि ईशान (२१) यांनी थोडाफार प्रतिकार केला; मात्र संघाचा डाव २७.५ षटकांत १६८ धावांत आटोपला. ऑफ स्पिनर साहिल पठाण याने ३६ धावांत ४ बळी घेत निर्णायक भूमिका बजावली. त्याला शोएब अन्सारी (२७/२), रैवत यादव (३४/२) आणि युवान शर्मा (२७/२) यांनी प्रत्येकी २ बळी घेत उत्तम साथ दिली.
वैयक्तिक पुरस्कारांवर युवा खेळाडूंची मोहोर
अंतिम सामन्यातील तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून रजा मिर्झा (१९० धावा) याची निवड झाली. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून साहिल पठाण (११ बळी), तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून युवान शर्मा (५ झेल) याला गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू हा मान शोएब अन्सारी (१० बळी) याने पटकावला. या स्पर्धेत तीन फलंदाजांनी शतके झळकावत स्पर्धेची रंगत अधिक वाढवली.
वेंगसरकर–पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
विजेत्या संघाला भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर
आणि मुंबई रणजी निवडसमितीचे चेअरमन संजय पाटील
यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. युवा
क्रिकेटपटूंसाठी ही स्पर्धा केवळ सामना नव्हे, तर भविष्यातील स्वप्नांकडे नेणारा आत्मविश्वासाचा टप्पा
ठरली.
संक्षिप्त धावफलक
पटेल क्रिकेट कोचिंग सेन्टर
– ४० षटकांत ८ बाद ३७४
(रजा मिर्झा १९०,
उमर खुटे ३९,
हमझा खान ५४,
युवान शर्मा २५;
मान कोळी ५५ धावांत २
बळी)
वि.वि. सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट
अकादमी – २७.५
षटकांत सर्वबाद १६८, (अथर्व अधिकारी ३०, राज जैन २१, यश दुसी ४६, ईशान २१; साहिल पठाण ३६ धावांत ४ बळी,
शोएब अन्सारी २७/२,
रैवत यादव ३४/२,
युवान शर्मा २७/२)
सामनावीर : रजा मिर्झा
फोटो ओळ : दिलीप
वेंगसरकर फौंडेशनतर्फे माहुल, चेंबूर येथे आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत विजेते ठरलेला
पटेल क्रिकेट कोचिंग सेन्टर संघ. सोबत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर,
मुंबई रणजी निवडसमितीचे चेअरमन
संजय पाटील आणि प्रशिक्षक अमित जाधव.

Post a Comment
0 Comments