क्रीडा क्षेत्रातील धगधगतं ‘माणिक’
सुहास पाठारे यांच्या ‘मी नाना बोलतोय’ आत्मचरित्राचा होणार
दिमाखदार प्रकाशन सोहळा!
मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक्सचा महाराष्ट्रातला ‘पाया’
रचणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास ग्रंथरूपात
क्रीडा पंढरीतला महामानव
मुंबई : क्रीडा पंढरी मुंबईतून अवघ्या महाराष्ट्राला आणि
देशाला घडवणाऱ्या एका महामानवाचा संघर्ष, साधना आणि यशाचा प्रवास आता शब्दबद्ध झाला आहे. ज्या
हातांनी हजारो खेळाडूंना मल्लखांबावर उभं केलं, ज्यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्राच्या मातीत १५
हून अधिक छत्रपती पुरस्कार विजेते आणि १ अर्जुन पुरस्कार विजेता घडला, त्या
क्रीडा महर्षी श्री. सुहास रामनाथ पाठारे (नाना) यांच्या
आयुष्याचा देदीप्यमान प्रवास ‘मी
नाना बोलतोय’ या आत्मचरित्रातून उलगडणार आहे. हे पुस्तक केवळ आत्मकथन
नसून भारतीय क्रीडा विश्वासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
संघर्षातून यशाकडे : पवनपुत्र व्यायाम मंदिराची यशोगाथा
स्वातंत्र्यसेनानी कै. रामनाथ हरिराम
पाठारे यांनी १९६५ साली स्थापन केलेल्या श्री
पवनपुत्र व्यायाम मंदिराचा
वारसा सुहास पाठारे सरांनी अत्यंत निष्ठेने
पुढे नेला. मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग आणि योगासन अशा विविध क्रीडा
प्रकारांनी ही व्यायामशाळा सदैव गजबजलेली असते. येथून आजवर १५
पेक्षा अधिक छत्रपती पुरस्कार विजेते आणि १
अर्जुन पुरस्कार विजेता देशाला लाभला आहे. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाची कौशल्ये
देणारी ‘टाकसाळ’ म्हणून या संस्थेची ओळख निर्माण करण्यात नानांचा
सिंहाचा वाटा आहे.
संघटनेची बांधणी : जिम्नॅस्टिक्सचे जनक
सत्तरच्या दशकात मल्लखांब व जिम्नॅस्टिक्स मर्यादित असताना, चेंबूर
हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक
म्हणून कार्यरत असलेल्या सुहास सरांनी या खेळांचा महाराष्ट्रभर प्रसार
केला. श्री. रामदास कल्याणपुरकर आणि श्री.
पंत सर यांच्या सहकार्याने त्यांनी राष्ट्रीय
जिम्नॅस्टिक संघटनेची स्थापना केली. मुंबई व महाराष्ट्रात मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक्स
संघटनांची भक्कम उभारणी करताना नानांचे योगदान अमूल्य ठरले. महाराष्ट्रातील या
खेळांतील पहिले छत्रपती पुरस्कार विजेते आणि राष्ट्रीय पदक विजेते घडवण्याचे श्रेय
निर्विवादपणे पवनपुत्र व्यायाम मंदिर आणि नाना यांनाच जाते.
स्पोर्ट्स सायन्सचा आग्रह : उद्याच्या विजयाचा मंत्र
“स्पोर्ट्स
सायन्स आणि क्रीडा वैद्यकशास्त्राशिवाय आंतरराष्ट्रीय पदके अशक्य आहेत,” हे सुहास पाठारे सरांचे ठाम मत आहे. केवळ
ताकद नव्हे, तर विज्ञानाच्या आधारे खेळाडू घडवण्याची त्यांची दूरदृष्टी
आजच्या आधुनिक क्रीडा युगात मार्गदर्शक ठरत आहे. राज्य शासनाने छत्रपती
पुरस्काराने गौरवले असले तरी त्यांच्या बहुआयामी कार्यासाठी ते ‘जीवन गौरव’ पुरस्काराचे खरे मानकरी असल्याची भावना
क्रीडा विश्वात व्यक्त होत आहे.
शब्दांचा उत्सव : दिग्गजांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा
२३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वा. चेंबूर जिमखाना (फेज २) येथे ‘मी नाना बोलतोय’ या आत्मचरित्राचा भव्य प्रकाशन
सोहळा होणार आहे. फिटनेस गुरू मा. मधुकर तळवळकर यांच्या शुभहस्ते
आणि ज्येष्ठ पत्रकार मा. कुमार केतकर, मा.
दिनकर गांगल, प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर तसेच पद्मश्री
मा. उदय देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. या ग्रंथात
नानांच्या प्रवासासोबतच त्यांनी घडवलेल्या नामवंत खेळाडूंची मनोगते वाचायला मिळणार
आहेत. क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे
आवाहन मा. सुदेश हिंगलासपूरकर, ॲड.
शरद भोसले, मा. देवदत्त म्हात्रे आणि मा.
प्रदीप चेंबूरकर यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments