Type Here to Get Search Results !

चॅलेंजर्स कॅरममध्ये सागर वाघमारेला मानांकन! दादरमध्ये गुरुवार पासून कॅरमचा थरार ४८ बोर्डांवर एकाचवेळी महासंग्राम दादरमध्ये होणार कॅरमचा जल्लोष!

 


चॅलेंजर्स कॅरममध्ये सागर वाघमारेला मानांकन!

दादरमध्ये गुरुवार पासून कॅरमचा थरार

४८ बोर्डांवर एकाचवेळी महासंग्राम

दादरमध्ये होणार कॅरमचा जल्लोष!

 

मुंबई : देशातील नामवंत कॅरमपटू, आंतरराष्ट्रीय रंगत, अत्याधुनिक सुविधा आणि जबरदस्त स्पर्धात्मक वातावरण अशा सगळ्या घटकांनी सजलेली ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५–२६ गुरुवार २९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता दादरच्या वातानुकूलित सभागृहात सुरू होत असून या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सागर वाघमारे यांना प्रथम मानांकन देण्यात आले आहे.

 

उद्घाटन सोहळा : मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत या स्पर्धेचे उद्घाटन श्री हालारी विसा ओसवाल समाज वातानुकूलित हॉल, दादर येथे होणार आहे. उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव श्री संजय शेटे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव श्री निलेश भोसले, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप मयेकर, तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह व कार्याध्यक्ष भारत देसडला उपस्थित राहणार असून त्यानंतर सामन्यांना सुरुवात होणार आहे.

 

स्पर्धेची रचना : ४८ बोर्डांवर १० सत्रांचा थरार

पहिल्या दिवशी एकावेळी ४८ बोर्डांवर एकंदर १० सत्रे खेळविण्यात येणार आहेत. सामने वेळेवर पार पडावेत यासाठी ५० बोर्ड पंच व सामना निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेचा ड्रॉ व खेळाडूंच्या सामन्याची माहिती थेट हॉलमधील स्क्रीनवर दाखवली जाणार असल्याने ध्वनिक्षेपकाचा वापर मर्यादित ठेवण्यात येणार आहे.

 

नाणेफेक व पंचव्यवस्था : अधिकृत प्रक्रियेनुसार निर्णय

स्पर्धेच्या उद्घाटन सामन्याची नाणेफेक आयोजक व पंचांच्या उपस्थितीत होणार असून नाणेफेक जिंकणारा खेळाडू संरक्षण किंवा आक्रमण यापैकी आपला पर्याय निवडणार आहे. सर्व सामने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाच्या पंचांच्या देखरेखीखाली पार पडणार असून स्पर्धेवर नियुक्त प्रमुख पंच काम पाहणार आहेत.

 

प्रायोजक व साहित्य : सिस्काच्या बुलेट शॉट सोंगट्यांचा पहिल्यांदाच वापर

बँक ऑफ इंडिया, आय डी बी आय बँक, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र व हिंदुस्थान पेट्रोलियम हे स्पर्धेचे गोल्ड प्रायोजक असून सिस्का कॅरम कंपनी साहित्य पार्टनर आहे. विशेष बाब म्हणजे सिस्का कंपनीच्या बुलेट शॉट कॅरम सोंगट्यांचा प्रथमच या स्पर्धेत वापर करण्यात येणार आहे.

 

सुव्यवस्था व सुरक्षा : खेळाडूंसाठी विशेष सुविधा

स्पर्धेच्या दर्जानुसार गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा रक्षकांची तैनाती, प्रवेशासाठी पासेसची विशेष व्यवस्था, पहिल्या दिवशी मर्यादित पास वितरण, तर दुसऱ्या दिवशी वाढीव पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी वी आय पी भोजन कक्ष, स्पर्धास्थळी डॉक्टरची विशेष व्यवस्था, तसेच सर्व सहभागी खेळाडूंना गणवेश / टी-शर्ट देण्यात आले आहेत.

 

थेट प्रक्षेपण व समालोचन : रसिकांसाठी पर्वणी

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेलवरून एकाच वेळी ६ सामने लाईव्ह दाखवण्यात येणार असून प्रसन्ना संत, एस. किशोर व मंदार बर्डे हे मराठी, हिंदी व इंग्रजीतून सामन्यांचे धावते समालोचन करणार आहेत.

 

मानांकन जाहीर : सागर वाघमारे अव्वल

मागील चॅलेंजर्स ट्रॉफी विजेता सागर वाघमारे (महाराष्ट्र) यांना या स्पर्धेत प्रथम मानांकन, तर उपविजेता महम्मद घुफ्रान (महाराष्ट्र) यांना द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. महिला व पुरुष खेळाडू एकत्रित खेळत असल्याने महिलांकडून पुरुषांना मिळणारे आव्हान ही स्पर्धेची आणखी एक आकर्षक बाब ठरणार आहे. प्रत्येक सामना जिंकणाऱ्या महिलेला विशेष रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

 

खुली एकेरी मानांकन यादी :

१) सागर वाघमारे (महाराष्ट्र), २) महम्मद घुफ्रान (महाराष्ट्र), ३) झेद अहमद (महाराष्ट्र), ४) रहिम खान (महाराष्ट्र), ५) शाहिद हिलमी (श्रीलंका), ६) अभिषेक भारती (महाराष्ट्र), ७) संदीप देवरुखकर (महाराष्ट्र), ८) संजय मांडे (महाराष्ट्र).


Post a Comment

0 Comments