Type Here to Get Search Results !

महर्षी दयानंद कॉलेज आंतर-विद्यापीठ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा कबड्डीचा रणसंग्राम सुरू मुलांमध्ये रिझवी, मुलींमध्ये वारणा, कीर्ती व रिझवीची विजयी सलामी धमाकेदार सुरुवात! परळमध्ये कबड्डीचा जल्लोष!!


महर्षी दयानंद कॉलेज आंतर-विद्यापीठ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

कबड्डीचा रणसंग्राम सुरू

मुलांमध्ये रिझवी, मुलींमध्ये वारणा, कीर्ती व रिझवीची विजयी सलामी

धमाकेदार सुरुवात! परळमध्ये कबड्डीचा जल्लोष!!

 

मुंबई : परळ येथील महर्षी दयानंद कॉलेजच्या प्रांगणात आजपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय आंतर-विद्यापीठ कबड्डी स्पर्धेने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना थरार, ताकद आणि तंत्राचे अप्रतिम दर्शन घडवले. मुला-मुलींच्या गटात झालेल्या उद्घाटनीय सामन्यांत रिझवी, वारणा, कीर्ती महाविद्यालयांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेची विजयी सलामी दिली. ढोल-ताशांच्या गजरात आणि खेळाडूंच्या जोशात संपूर्ण मैदान कबड्डीमय झाले होते.

 

मुलांचा उद्घाटनीय सामना; रिझवीची दमदार आघाडी

मुलांच्या उद्घाटनीय सामन्यात रिझवी महाविद्यालयाने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. सनी कोळी व ओमकार येनपुरे यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर रिझवीने डॉ. आंबेडकर कॉलेज संघाचा ४३–२६ असा पराभव केला. मध्यंतरास रिझवी महाविद्यालय २३–०६ अशा भक्कम आघाडीवर होते.

 

महर्षी दयानंद (ब) ची एकतर्फी सरशी

दुसऱ्या सामन्यात महर्षी दयानंद (ब) महाविद्यालयाने सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवले. एस. के. सोमय्या कॉलेजवर ४८–२० अशी एकतर्फी मात करत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. मध्यंतरास महर्षी दयानंद (ब) २८–१० अशी आघाडीवर होते. महर्षी दयानंदकडून सुजन दळवी (चढाई) तर रितेश (पकड) मध्ये चमकले.

 

मुलींच्या गटात वारणा युनिव्हर्सिटीचा धडाका

मुलींच्या उद्घाटनीय सामन्यात वारणा युनिव्हर्सिटीने आर. एन. स्वामी, वडाळा संघावर ३४–०४ अशी ३० गुणांची दणदणीत विजयाची नोंद केली. वारणाकडून शुभदा खोत, गायत्री लोळगे (चढाई) तर अक्षदा पाटील (पकड) मध्ये विशेष ठरल्या.

 

सेजल पेडामकरचा झंझावात; रिझवीचा विजय

दुसऱ्या सामन्यात रिझवी महाविद्यालयाने महर्षी दयानंद (ब) महाविद्यालयावर ४६–३६ अशी मात केली. मध्यंतरास रिझवी महाविद्यालय २७–१६ अशी आघाडीवर होते.
रिझवीकडून सेजल पेडामकर हिने अफलातून खेळ केला, तर महर्षी दयानंदकडून पूर्वा  बानकर हिने झुंजार खेळ दाखवला.

 

कीर्ती महाविद्यालयाची विजयगाथा

तिसऱ्या सामन्यात कीर्ती महाविद्यालयाने नाणेफेक जिंकून आक्रमण स्वीकारले आणि चढाई-पकडीतील संतुलित खेळाच्या जोरावर एस. एन. डी. टी., चर्चगेट संघावर ५१–२८ असा दणदणीत विजय मिळवला.

 

मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन

स्पर्धेचे उद्घाटन महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राजेश पारकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री अनिल घाटे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री राजेश पाडावे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कु. पूजा यादव यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी क्रीडा शिक्षिका सौ. निकिता लाड प्रो. श्री बी. टी. निकम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.


Post a Comment

0 Comments