Type Here to Get Search Results !

मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष! ऐतिहासिक ६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी गेटवे ऑफ इंडियावर स्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या महापौर मा. रितू तावडे यांच्या हस्ते होणार महाराष्ट्रातील जलतरणपटू सज्ज

 


मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष!

ऐतिहासिक ६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी गेटवे ऑफ इंडियावर

स्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या महापौर मा. रितू तावडे यांच्या हस्ते होणार

महाराष्ट्रातील जलतरणपटू सज्ज

मुंबई (क्री. प्र.) : अथांग अरबी समुद्राच्या निळ्याशार लाटांवर जलतरणपटूंच्या जिद्दीचा आणि साहसाचा थरार अनुभवण्याची वेळ आली असून, प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक ६२ वी संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिमाखात पार पडणार आहे. मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया परिसरात रंगणाऱ्या या महास्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मा. रितू तावडे यांच्या हस्ते होणार आहे. जलतरणपटूंच्या जिद्दीला आणि समुद्राच्या लाटांना आव्हान देणारी ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून धाडस, चिकाटी आणि कौशल्याचा उत्सव ठरणार आहे. गेटवे ऑफ इंडिया परिसरात होणाऱ्या या महास्पर्धेकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जलतरणप्रेमींचे लक्ष लागले असून, शेकडो खेळाडू समुद्राच्या लाटांवर आपले सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

 


ऐतिहासिक परंपरेचा जलतरण महोत्सव : प्रतिष्ठित संस्थांच्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्र स्टेट अमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशन’ (MSAAA) यांच्या वतीने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक स्पर्धेचे नियोजन असोसिएशनचे अध्यक्ष आनंद माने आणि सरचिटणीस राजेंद्र पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी खेळाडूंनी रविवारी सकाळी ७:३० वाजता रिपोर्टिंग करणे आवश्यक असून, प्रत्यक्ष शर्यतीची सुरुवात साधारणपणे १०:३० ते ११:३० या वेळेत होणार आहे. सर्व सहभागी खेळाडूंना सकाळी ९:०० वाजता बोटीने प्रस्थान करणे अनिवार्य आहे.

 


तीन अंतरांच्या आव्हानात्मक शर्यती

विविध वयोगटांसाठी १ किमी, २ किमी आणि ५ किमी अंतरांचा थरार

या सागरी स्पर्धेत जलतरणपटूंना त्यांच्या क्षमतेनुसार १ किमी, २ किमी आणि ५ किमी अशा तीन अंतरांच्या शर्यतींमध्ये सहभागी होता येणार आहे.


१ किमी अंतराची शर्यत ८–९ वर्षे वयोगटातील बालजलतरणपटू आणि दिव्यांग खेळाडूंसाठी (खुला वयोगट) राखीव आहे.


२ किमी अंतराची शर्यत १०–११ वर्षे, १२–१३ वर्षे आणि ४६–५५ वर्षे वयोगटातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आली आहे.


तर सर्वात आव्हानात्मक ५ किमी अंतराच्या शर्यतीत १४–१५ वर्षे, १६–२५ वर्षे आणि २६–४५ वर्षे वयोगटातील पुरुष व महिला जलतरणपटू समुद्राच्या लाटांशी दोन हात करताना दिसतील.

या सर्व शर्यतींमुळे अनुभव, सहनशक्ती आणि वेग यांचा संगम पाहायला मिळणार आहे.

 

विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिकांचा वर्षाव : रोख बक्षिसे, पदके आणि प्रतिष्ठेच्या ‘फास्टेस्ट स्विमर’ ट्रॉफी

स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख पारितोषिके, गुणवत्ता ई-प्रमाणपत्र, आकर्षक भेटवस्तू आणि पहिल्या तीन क्रमांकांसाठी पदके देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय, १ किमी, २ किमी आणि ५ किमी अंतरातील सर्वात वेगवान पुरुष आणि महिला जलतरणपटूंना प्रतिष्ठेची फास्टेस्ट स्विमर ट्रॉफी’ आणि रोलिंग ट्रॉफी’ प्रदान करून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान केला जाणार आहे. ही ट्रॉफी जिंकणे म्हणजे जलतरणपटूंसाठी सर्वोच्च गौरव मानला जातो.

 

सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य : वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था

स्पर्धेदरम्यान सहभागी सर्व जलतरणपटूंच्या सुरक्षिततेसाठी विशेष वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षित बचाव पथके आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. समुद्रातील आव्हानात्मक परिस्थिती लक्षात घेता आयोजकांनी अत्यंत काटेकोरपणे नियोजन केले आहे, ज्यामुळे खेळाडूंना सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण वातावरणात स्पर्धा करता येईल.

 

जलतरणपटूंना मोठी संधी; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

महाराष्ट्राच्या जलतरण कौशल्याचे प्रदर्शन होणार असल्यामुळे या ऐतिहासिक स्पर्धेत महाराष्ट्रातील जलतरणपटूंना समुद्रात आपले कौशल्य सिद्ध करण्याची आणि राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. सरचिटणीस राजेंद्र पालकर यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “या भव्य स्पर्धेला उपस्थित राहून जलतरणपटूंचा उत्साह वाढवावा आणि त्यांच्या धाडसी प्रयत्नांना पाठिंबा द्यावा.”

 

संक रॉक ओशन स्विमॅथॉन’ ही केवळ स्पर्धा नसून, महाराष्ट्राच्या जलतरण परंपरेचा गौरवशाली वारसा जपणारा आणि नवीन जलतरणपटूंना प्रेरणा देणारा एक भव्य क्रीडा महोत्सव ठरणार आहे. रविवारी गेटवे ऑफ इंडियावर लाटांशी झुंज देणाऱ्या जलतरणपटूंच्या साहसाचा थरार अनुभवण्यासाठी संपूर्ण मुंबई सज्ज झाली आहे.


Post a Comment

0 Comments