३५ वी किशोर–किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धा
महाराष्ट्राचे किशोर–किशोरी संघ
उपांत्य फेरीत
कुरुक्षेत्रच्या थीम पार्क
मैदानावर वेग, चपळाई आणि डावपेचांचा महाउत्सव
हरियाणा, क्री. प्र. : कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे सुरु असलेल्या
३५ व्या किशोर व किशोरी राष्ट्रीय
खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अफलातून,
आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ साकारत उपांत्य फेरीत दणदणीत प्रवेश केला. थीम पार्क मैदानावर उपउपांत्य फेरीतील सामन्यांत
महाराष्ट्राने प्रतिस्पर्ध्यांना संधी न देता वेगवान आक्रमण,
भक्कम संरक्षण आणि अचूक डावपेचांचा प्रत्यय दिला. उपांत्य
फेरीत किशोर
गटात महाराष्ट्र विरुद्ध ओडिसा, कोल्हापूर विरुद्ध उत्तरप्रदेश,
तर किशोरी गटात महाराष्ट्र विरुद्ध पंजाब,
राजस्थान विरुद्ध
हरयाणा अशी थरारक लढती रंगणार आहे.
किशोर गट : महाराष्ट्राची मणिपूरवर दणदणीत सरशी
उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राने मणिपूरचा ३०–२१ असा ५.३५ मि. राखून ९ गुणांनी
दणदणीत पराभव केला. महाराष्ट्राकडून वरद पोळ (२.५०, १.२० मि. संरक्षण व २ गुण),
सुरज खाडे (१.१०,
१.५५ मि. संरक्षण),
प्रफुल्ल वसावे (१.२० मि. संरक्षण
व ४ गुण), विक्रम
राठोड (१.२० मि. संरक्षण व २ गुण) यांनी सलग उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. मणिपूरकडून
एल. सिंग (१.१० मि. संरक्षण व ४
गुण),
पी. पोहिंबा (१.२० मि. संरक्षण व ४
गुण) यांनी झुंज दिली.
किशोरी गट : महाराष्ट्राचा विदर्भावर एकतर्फी डावाने विजय
किशोरी गटात महाराष्ट्राने विदर्भावर एक डाव आणि १२ गुण राखून (२८–१६)
विजय मिळवला. महाराष्ट्राकडून अनुषा तामखडे (२.५० मि. संरक्षण व ४ गुण),
अपर्णा वर्दे (२.४० मि. संरक्षण व
४ गुण), राही
पाटील (२.१० मि. संरक्षण), कार्तिकी यलमार (१.५० मि. संरक्षण),
ऋतुजा सुरवसे (१.३० मि. संरक्षण),
पियुशा पानमळकर (नाबाद १.२० मि.
संरक्षण) यांनी सलग दमदार कामगिरी केली. विदर्भकडून नव्या दुग्गा (१ मि. संरक्षण),
मनवी राजू (१ मि. संरक्षण व ४ गुण),
कोमल ठाकरे (४ गुण)
यांनी चांगला खेळ केला.
किशोर गट : ओडिसाची तामिळनाडूवर एकतर्फी धडक
ओडिसाने तामिळनाडूचा २३ गुणांनी (४८–२५) पराभव
केला. ओडिसाकडून सत्या (२.३०, २ मि. संरक्षण व १२ गुण), अमरज्योत (१.२०, १ मि. संरक्षण व १० गुण), धनंजय दास (१.१० मि. संरक्षण व ४ गुण)
यांनी अष्टपैलू खेळ साकारला. तामिळनाडूकडून
कौशिक (१.५० मि. संरक्षण व २ गुण)
याने किल्ला लढवला.
किशोर गट : उत्तरप्रदेशची विदर्भवर दणदणीत बाजी
उत्तरप्रदेशने विदर्भवर २९ गुणांनी (५३–२४) मात
केली. उत्तरप्रदेशकडून देव कुमार (१.४० मि. संरक्षण व ८ गुण),
बिट्टु यादव (१.४५,
१.१० मि. संरक्षण व ६
गुण),
इशान (१,
२ मि. संरक्षण व ८
गुण) यांनी प्रभावी कामगिरी केली. विदर्भकडून रोशन पालटे (१ मि. संरक्षण व ४ गुण)
याने प्रतिकार केला.
किशोर गट : कोल्हापूरचा थरारक विजय
कोल्हापूरने तेलंगणाचा अवघ्या १ गुणाने (३७–३६) पराभव
केला. मध्यंतराला कोल्हापूरकडे २ गुणांची (२०–१८) आघाडी होती. ड्रीम रनचा गुण विजयासाठी निर्णायक ठरला. कोल्हापूरकडून
देवराज येड्राव (१.३०,
१.१० मि. संरक्षण व ८
गुण),
गौरव माने (१४ गुण),
सोहम भाटमारे (८ गुण)
यांनी चमकदार खेळ केला. तेलंगणाकडून महेश (१ मि. संरक्षण व ४ गुण),
अरविंद (१.१० मि. संरक्षण व ४ गुण)
यांनी चांगला खेळ केला.
किशोरी गट : राजस्थानची गुजरातवर काठावरची बाजी
राजस्थानने गुजरातचा ७ गुण आणि ०.५० सेकंद राखून (२९–२२)
पराभव केला. राजस्थानकडून तुलसी (२.५०, १.१० मि. संरक्षण व ४ गुण),
गुंजन (१,
१ मि. संरक्षण व १०
गुण),
तन्नु (१.१० मि. संरक्षण व १० गुण)
यांनी मोलाची कामगिरी केली. गुजरातकडून
करीना (१.३० मि. संरक्षण व ४ गुण),
दिव्यांशी (नाबाद १.५० मि.
संरक्षण) यांनी झुंज दिली.
किशोरी गट : पंजाबची कोल्हापूरवर निर्णायक सरशी
पंजाबने कोल्हापूरवर ७ गुणांनी (३१–२४) मात
केली. पंजाबकडून खुशविर कौर (५, नाबाद १ मि. संरक्षण व २ गुण),
प्रणाली (१.१०,
१.४० मि. संरक्षण व ६
गुण),
लखवीर कौर (१० गुण)
यांनी उत्कृष्ट खेळ केला. कोल्हापूरकडून
सायली हिंदुलकर (१.४०,
२.५० मि. संरक्षण व २
गुण),
स्वरा दौंडे (१.५०,
१.२० मि. संरक्षण व २
गुण),
प्रणाली शेवाळे (१.१० मि. संरक्षण)
यांनी चांगला खेळ केला; मात्र विजय हुकला.
किशोरी गट : हरयाणाची कर्नाटकवर बाजी
हरयाणाने कर्नाटकला ५ गुणांनी (२९–२४) पराभवाचा धक्का
दिला. हरयाणाकडून मोनिका (२.१०, २.१० मि. संरक्षण व ८ गुण),
दिपिका (२ मि. संरक्षण व २ गुण)
यांनी प्रभावी कामगिरी केली. कर्नाटककडून
द्रृती (१.२०,
१ मि. संरक्षण),
वर्षा (१० गुण)
यांनी चांगला खेळ केला.

Post a Comment
0 Comments