Type Here to Get Search Results !

एमजेएससी कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे अजिंक्य निर्णायक बोर्डवर अप्रतिम फिनिश, शिवाजी पार्कवर शालेय कॅरमचा थरारक समारोप

 


एमजेएससी कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे अजिंक्य

निर्णायक बोर्डवर अप्रतिम फिनिश, शिवाजी पार्कवर शालेय कॅरमचा थरारक समारोप

 

मुंबई : कॅरम बोर्डावर शेवटच्या फटक्यापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारा थरार, अचूक स्ट्रायकर आणि विजेतेपदासाठीची जिद्द अशा धमाकेदार वातावरणात एमजेएससी ट्रॉफी राज्य स्तरीय विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेचा शानदार समारोप झाला. पोद्दार अकॅडमी स्कूल–मालाडचा राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे याने निर्णायक बोर्डावर अप्रतिम फिनिश करत अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.

 

अंतिम लढत – निर्णायक बोर्डवर प्रसन्नची बाजी

अंतिम सामन्यात १०–९ अशी आघाडी घेतलेल्या प्रसन्न गोळे याने न्यू इंग्लिश स्कूल–जैतापूरच्या आर्यन राऊत याला निर्णायक बोर्डातील अचूक आणि संयमी खेळाच्या जोरावर १५–९ असे पराभूत केले. शेवटचा बोर्ड हातचा निसटल्यामुळे आर्यन राऊत याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

 

मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण

पारितोषिक वितरण सोहळा नगरसेवक यशवंत किल्लेदार, क्लबचे पदाधिकारी सुनील पाटील, महेश शेट्ये आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.

 

उपांत्य फेरीतील निर्णायक विजय

शिवाजी पार्क येथील एमजेएससी मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीत आर्यन राऊत याने शिर्के हायस्कूल–रत्नागिरीच्या स्वरा मोहिरे हिचे आव्हान संपुष्टात आणले, तर प्रसन्न गोळे याने शारदाश्रम विद्यामंदिरच्या सोहम जाधव याला नमवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

 

उपविजेते व पारितोषिक विजेते

विविध जिल्ह्यांतील ४२ शालेय खेळाडूंमध्ये झालेल्या या स्पर्धेत होली फॅमिली हायस्कूल–अंधेरीची चैतन्या पोमेंडकर, पाटकर हायस्कूल–डोंबिवलीचे प्रसाद माने व शिवांश मोरे, महात्मा गांधी विद्यामंदिरची तनया दळवी यांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपद मिळवले.


कळसुलकर इंग्लिश स्कूल–सावंतवाडीचा भरत सावंत, सुळे गुरुजी हायस्कूल–दादरची ग्रीष्मा धामणकर, श्री नारायण गुरु हायस्कूल–चेंबूरचा उमैर पठाण, महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा विराज बर्वे, पार्ले टिळक विद्यालयाचा दुर्वेश चव्हाण, सीएनएम स्कूलचे अर्णव शाह व दैविक जैन, पाटकर विद्यालय–डोंबिवलीची सारा देवन यांनी उपउपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा स्ट्रायकरसह पुरस्कार पटकाविला.

 

प्रोत्साहनपर उपक्रमाला पालक-शिक्षकांची दाद

स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना रुपये ५०० विशेष पुरस्कार देण्यात आला. शालेय कॅरमपटूंना सातत्याने आणि सर्वतोपरी प्रोत्साहन देणाऱ्या या मोफत क्रीडा उपक्रमाबद्दल पालक व शिक्षक वर्गाने आयोजकांचे मनापासून आभार मानले.


Post a Comment

0 Comments