Type Here to Get Search Results !

७२ वी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्राची झुंजार लढत; महाराष्ट्राला उपविजेतेपद भारतीय रेल्वेचा २५व्यांदा अजिंक्य! दमदार सुरुवात असूनही रेल्वेचा पलटवार निर्णायक पंकज मोहिते १२ गुण, अशू मलिक ८ गुणांसह चमकले सागा बंदिस्त क्रीडा संकुलात थरारक अंतिम सामना

 


७२ वी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

महाराष्ट्राची झुंजार लढत; महाराष्ट्राला उपविजेतेपद

भारतीय रेल्वेचा २५व्यांदा अजिंक्य!

दमदार सुरुवात असूनही रेल्वेचा पलटवार निर्णायक

पंकज मोहिते १२ गुण, अशू मलिक ८ गुणांसह चमकले

सागा बंदिस्त क्रीडा संकुलात थरारक अंतिम सामना

 

वडोदरा : ७२वी वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा २०२६ मध्ये महाराष्ट्राच्या पुरुष संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारत दिमाखदार कामगिरी केली; मात्र अंतिम सामन्यात भारतीय रेल्वे कडून ३१–४९ असा पराभव पत्करावा लागला. वडोदरा, गुजरात येथील सागा बंदिस्त क्रीडा संकुलात रंगलेल्या या लढतीत महाराष्ट्राने झुंजार खेळ केला, पण रेल्वेच्या आक्रमक पलटवाराने सामना हातातून निसटला.

 


दमदार सुरुवात; रेल्वेचा प्रत्युत्तरात लोण

महाराष्ट्राने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत रेल्वेवर पहिला लोण चढवत १८–१३ अशी आघाडी घेतली. मात्र रेल्वेने तत्काळ लोणची परतफेड करत २२–१८ अशी आघाडी मिळवली आणि त्याच गुणसंख्येवर मध्यंतर झाले. दुसऱ्या डावात रेल्वेने चढाईत २१ गुण, यशस्वी पकडीत १४ गुण आणि ५ बोनस गुण मिळवत सामन्यावर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले. महाराष्ट्राला चढाईत १२, पकडीत १३ आणि ३ बोनस गुणांवर समाधान मानावे लागले.

 

रेल्वेच्या विजयात पंकज–शुभम–अजिंक्य चमकले

रेल्वेच्या विजयात पंकज मोहिते, शुभम शिंदे आणि अजिंक्य पवार यांच्या प्रभावी खेळाचा मोठा वाटा ठरला. महाराष्ट्राकडून शिवम पठारे आणि असलम इनामदार यांनी झुंज देत संघाचा मान राखण्याचा प्रयत्न केला; मात्र रेल्वेची एकसंध कामगिरी अधिक प्रभावी ठरली.

 

इतिहासाची नोंद; रेल्वेचे २५वे जेतेपद

१९५९ पासून स्पर्धेत सहभाग घेतलेल्या भारतीय रेल्वेचे हे तब्बल २५वे जेतेपद ठरले. १९६१ पासून महाराष्ट्राची अंतिम फेरी गाठण्याची ही २१वी वेळ होती; मात्र त्यांना आतापर्यंत केवळ ८ वेळा विजेतेपद मिळवता आले आहे. हरियाणा येथे २०२२ मध्ये झालेल्या ६८व्या स्पर्धेतही महाराष्ट्राला पराभव पत्करावा लागला होता. २०१७ मध्ये हैदराबाद येथे मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती यंदा साधता आली नाही.

 

संघटनात्मक बदलांचा सकारात्मक परिणाम

मागील २ वर्षांत राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्राची कामगिरी खालावली होती. राज्य संघटनेतील राजकारण आणि निवड प्रक्रियेवरील दबाव यामुळे संघ सुमार ठरत होता. मात्र अलीकडील फेरबदलांनंतर निवड समितीला मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे यंदा संघाची कामगिरी लक्षणीयरीत्या उंचावल्याचे स्पष्ट झाले. संघाच्या या कामगिरीबद्दल राज्य कबड्डी संघटनेचे प्रभारी अध्यक्ष गजानन कीर्तिकर व कार्यकारी मंडळाने समाधान व्यक्त केले असून कबड्डीप्रेमींमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

 


उपविजेतेपदातही अभिमान

जरी अंतिम टप्प्यात पराभव झाला असला तरी महाराष्ट्राच्या संघाने स्पर्धेत दाखवलेली जिद्द, लढाऊ वृत्ती आणि संघभावना कौतुकास्पद ठरली. उपविजेतेपद हा पराभव नसून नव्या उंचीची नांदी असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आगामी स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पुन्हा विजेतेपदासाठी सज्ज होईल, यात शंका नाही.



Post a Comment

0 Comments